Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

बंदुका होत्या पण काडतुसेच जुनी,प्रशिक्षण होते पण शस्त्रेच नव्हती!
कसाबच्या सुनावणीत पोलिसांनी मांडली व्यथा
मुंबई, १५ जून / प्रतिनिधी

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी सीएसटी येथे मृत्यूचे थैमान घालून काही पोलिसांसह अनेक निष्पापांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना त्या वेळेस तेथे कर्तव्यावर असलेल्या

 

पोलिसांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रश्नमाणिक प्रयत्न केला होता. परंतु ज्यांच्याकडे शस्त्र होती, त्यातील काडतुसे जुनी असल्याने, तर ज्यांना शस्त्रास्त्र चालविण्याचे खास प्रशिक्षण देण्यात आले होते त्यांच्याकडे शस्त्रच नसल्याने दोन्ही दहशतवाद्यांचा सामना पोलिसांना करता आला नाही. एवढेच नाहीतर काही पोलिसांचा त्यात हकनाक बळी गेल्याचेही आज विशेष न्यायालयात उघड झाले.
पोलीस हवालदार हर्षद पाटील आणि पोलीस कमांडो गीतांजली गुरव यांच्या साक्षीतून पोलिसांची शस्त्रांबाबतची व्यथा विशेष न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांच्यासमोर मांडली गेली. अभियोग पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी घेतलेल्या सरतपासणीत पाटील यांनी सांगितले की, त्यांच्याकडे एसएलआर रायफल होती. त्यात दहा काडतुसेही होती. मात्र ज्या वेळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला गोळी मारून ठार करण्याची संधी त्यांना मिळाली त्यावेळी त्याच्या बंदुकीने त्यांना दगा दिला. गोळीबार करतानाच काडतुस बंदुकीमध्ये अडकल्याने त्यांना कसाबला कंठस्नान घालणे शक्य झाले नाही. त्यांच्या या उत्तरानंतर न्या. टहलियानी यांनी लगेचच त्यांना बंदूक ‘लॉक’ का झाली अशी विचारणा त्यांच्याकडे केली. त्यांनीही तात्काळ काडतूस जुने असल्याने गोळीबार करताच ते बंदुकीत अडकल्याचे आणि त्यामुळे बंदूक ‘लॉक’ झाल्याचे सांगितले. तसेच त्याच वेळी मागून आलेला पोलीस अंमलदार झुल्लू यादव याला आपण घाबरून दहशतवाद्यांवर गोळीबार करीत नसल्याचे वाटले आणि त्याने आपल्याकडून ती हिसकावून स्वत: गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचाही प्रयत्न जुन्या काडतुसांमुळे फसल्याचे पाटील यांनी सांगितले.
दुसरीकडे गुरव यांनी आपल्या सरतपासणीत, आपण कमांडोचे प्रशिक्षण घेतले असून त्यात जास्तीत जास्त शस्त्रास्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे सांगितले. मात्र सीएसटीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला त्या वेळेस आपल्याकडे शस्त्रच नव्हते, असे सांगितले.
कसाबला रडू येते तेव्हा..
हल्ल्याच्या सुनावणीदरम्यान अनेक साक्षीदारांनी अजमल कसाबवर आक्रोश करीत शाब्दिक हल्ला चढविला. मात्र कसाबच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही दिसला नव्हता. परंतु आज तोच कसाब भोवळ येत असल्याच्या कारणास्वत भर न्यायालयात रडत होता. सुनावणीच्या दुसऱ्या सत्रात आरोपीच्या पिंजऱ्यात मान खाली घालून बसलेला कसाब अचानक रडू लागला आणि तो का रडत आहे याबाबतच्या चर्चेला उधाण आले. न्यायालयाने याबाबत विचारणा केली असता स्वत: कसाबने त्याला भोवळ येत असल्याचे कारण पुढे केले.