Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न ‘त्या’ तिघांना गजाआड घेऊन गेले!
मुंबई, १५ जून / प्रतिनिधी

झटपट श्रीमंत होण्याच्या स्वप्नाने झपाटलेल्या तीन तरूणांनी थेट सोन्याच्या कारखान्यातच दरोडा टाकून सुमारे ८० लाख रुपयांचे सोने लंपास केले. मात्र त्यांची ही कृती त्यांना झटपट श्रीमंत

 

करण्याऐवजी गजाआड घेऊन जाईल हे त्यांना स्वप्नातही वाटले नसेल. श्रीमंत होण्याच्या स्वप्नाने झपाटून काळाचौकी येथील सोन्याच्या कारखान्यातून पाच किलो लुटून नेणाऱ्या या तीन तरुणांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट चारने आज अटक करून या प्रकरणाचा छडा लावला.
सनथ मदन नैया (२३), दिनबंधू शंभूनाथ दास (१९) आणि कचारी गोरीचंद कंतल (२०) अशी या तिघा तरुणांची नावे आहेत. काळाचौकी येथील रमेश राणावत यांच्या मालकीच्या सोन्याच्या कारखान्यात ते काम करीत होते. काम करतानाच त्यांनी सोने चोरून झटपट श्रीमंत होण्याचा कट रचला. एक महिना ते सोने कशाप्रकारे चोरावे याची योजना आखीत होते. ठरल्यानुसार त्यांनी गेल्या ८ जून रोजी कारखान्यातून पाच किलो सोने लंपास केले. कारखान्याबाबत तपशीलवार माहिती असलेल्यांनीच ही चोरी केली असावी आणि ते या कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकीच असावेत, असा पोलिसांना संशय होता. त्यादृष्टीने त्यांनी तपासाला सुरूवात केली. चौकशीदरम्यान त्यांना सदर आरोपींचे वर्तन संशयास्पद वाटले आणि त्यांनी त्यांची कसून चौकशी केली असता तिन्ही आरोपींनी त्यांचा गुन्हा कबूल केला. तसेच झटपट श्रीमंत होण्यासाठी आपण हे कृत्य केल्याचा दावा केला. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेले सर्व सोने हस्तगत केले. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान चाटे यांच्या नेतृत्त्वाखाली सुधाकर कटकधोड, पोलीस उपनिरीक्षक पोळ, पोलीस हवालदार किशोर लांडगे, कैलास चव्हाण, वंजारे, रोकडे या युनिट चारच्या पथकाने केला.