Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

नागरी प्रश्नांवर विरोधी पक्ष थंडच!
बेसुमार अतिक्रमणे, कचरापट्टीकडे दुर्लक्ष
गळतीपोटी पालिकेचे ७०० कोटी रुपये पाण्यात

संदीप आचार्य
वाढती अतिक्रमणे, पाणी चोरी, पाणी गळती, अनधिकृत झोपडपट्टय़ांची बेसुमार वाढ, कचऱ्याची समस्या आदी वेगवेगळ्या समस्यांनी मुंबईकर त्रस्त असून राज्यातील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या विरोधात दंड थोपटण्यास सुरूवात केली आहे. त्याचवेळी पालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मात्र थंड बसून आहेत. पालिकेत विरोधी पक्षाची भूमिका ही ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’ अशीच असल्याची मार्मिक टीका पालिका वर्तुळात होताना दिसते.

शिवसेनाप्रमुखांच्या इच्छेतून साकारले शिवशाहिरांचे पोट्रेट!
विनायक परब

दोन आठवडय़ांपूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली तेव्हा शिवस्मारक समितीवरून उठलेल्या वादंगावर विविध तर्कवितर्काना उधाण आले होते. प्रत्यक्षात तसे काही नव्हते, असा खुलासा बाबासाहेबांनी त्यावेळी केला. मात्र त्यावर कुणाचा विश्वास बसला नाही. पण त्या दिवशी ‘मातोश्री’ने अनुभवला होता एक अपूर्व सोहळा. त्याचे कर्तेकरविते होते दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे आणि त्यात सहभागी झाले होते बाबासाहेब पुरंदरे आणि प्रसिद्ध व्यक्तिचित्रकार वासुदेव कामत.

अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी गुरुवारपासून अर्जस्वीकृती
अ‍ॅड‘मिशन’
प्रतिनिधी
‘सामाईक प्रवेश परीक्षे’चा (सीईटी) निकाल जाहीर झाल्यानंतर आता राज्यातील सहा स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांनी एकत्रित प्रवेश प्रक्रिया राबविण्याची अधिसूचना जारी केली आहे. अभियांत्रिकी शिक्षणामध्ये देशभरात नावलौकीक असलेल्या या सहा महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चढाओढ असते.

..अन् दहा दहशतवाद्यांनी मुंबई वेठीस धरली
शिशिर गुप्ता, सागनिक चौधरी, श्वेता देसाई

२६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांच्या हाती अद्ययावत शस्त्रे, तर पोलिसांची हत्यारे गंजलेली, निकामी झालेली; ऐनवेळी दगा देणारी, न चालणारी होती. त्यामुळेच फक्त १० दहशतवाद्यांनी संपूर्ण मुंबई वेठीस धरली. ‘बुलेटप्रूफ जॅकेट’ घातलेले असूनही दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे हे अतिरेक्यांच्या हल्ल्यात मारले गेले. सीएसटी रेल्वे स्थानकावरील हल्ल्याच्या वेळी दहशतवादी अजमल कसाब आणि अबू इस्माईल यांच्यावर गोळ्या झाडण्यासाठी सरसावलेल्या एका रेल्वे पोलीस कॉन्स्टेबलची कार्बाईन चालतच नव्हती. तो खटपट करीत होता; परंतु कार्बाईनमधून गोळ्या बाहेर पडतच नव्हत्या हे दृश्य सीसीटीव्हीवर स्पष्ट दिसत होते.

एक कोटीची सुपारी
डोंबिवलीत राहणाऱ्या पारसमल जैन याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली तेव्हा काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांचे हत्याप्रकरण उघडकीस येईल, असे या पथकाला स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र जैन याने स्वत:च या हत्या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर त्यातील सत्यता पडताळून पाहण्याचा संबंधित अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला तेव्हा त्यांना धक्काच बसला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे नातेवाईक पद्म्सिंह पाटील यांचे नाव जैनने सांगितल्यावर गुन्हे अन्वेषण विभागाचे सहआयुक्त राकेश मारिया यांनी जाहीर वार्ताहर परिषद घेऊन पवनराजे प्रकरणाचा पर्दाफाश केल्याचा दावा केला.

१० हजार विद्यार्थ्यांनी घेतला करिअर व्हिजनचा फायदा!
प्रतिनिधी

नेमकेकरिअर काय निवडावे, कोणत्या शाखेत गेल्यास भविष्य घडू शकते, त्यासाठी प्रवेश कसा घ्यायचा, परदेशात शिकायला जायचे कसे? अशा असंख्य प्रश्नांची अचूक उत्तरे घेत ठाण्यात संपन्न झालेल्या ‘लोकसत्ता करिअर व्हिजन’ कार्यशाळेत १० हजारांवर विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदवून त्यांच्या करिअरबाबत माहिती घेतली. गेले दोन दिवस ठाण्यातील कांती विसरिया सभागृहात झालेल्या करिअर व्हिजन कार्यशाळेला विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही उपस्थित राहून पाल्याच्या करिअरबाबत आस्था दाखविली.

सर्व भाषांतील अक्षर सुलेखनासाठी नवी शाळा सुरू!
प्रतिनिधी

केवळ देवनागरी आणि इंग्रजीच नव्हे तर सर्व भाषांतील अक्षर सुलेखनासाठी वर्षभर मार्गदर्शन करणारी कार्यशाळा नवी मुंबईतील वाशी येथे रविवारपासून सुरू झाली. प्रसिद्ध सुलेखनकार यांच्या कल्पनेतून साकारलेल्या आणि त्यांचेच मार्गदर्शन लाभणार असणाऱ्या ‘अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलीग्राफी’चे उद्घाटन रविवारी खासदार संजीव नाईक आणि राज्याचे प्रभारी कलासंचालक हेमंत नागदिवे यांच्या उपस्थितीमध्ये झाले. यावेळी सुमारे २०० कलाप्रेमी नागरिक उपस्थित होते.

करिअर मार्गदर्शन परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी
आयडियल क्लासेस हे शैक्षणिक कोचिंग क्षेत्रातील आघाडीचे नाव. या क्लासेसच्या वतीने विद्यार्थ्यांना करिअर निवडणे सोपे व्हावे म्हणून दरवर्षी संपूर्ण मुंबईभर करिअर मार्गदर्शन सेमिनार्सचे मोफत आयोजन केले जाते. मुंबई, तसेच मुंबईबाहेरील विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊनदेखील संस्थेचे तज्ज्ञ शिक्षक विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करतात. दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी आयडियल क्लासेसने दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत विविध ठिकाणी सेमिनार्सचे आयोजन केले होते. सांताक्रूझ, गोरेगाव, बोरिवली, भाईंदर या ठिकाणी रविवार दिवशी झालेल्या ‘दहावीनंतर काय?’ या चर्चासत्रात विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. १० वीनंतर कोर्सेसची, कॉलेजची, व्यावसायिक अभ्यासक्रमांची निवड कशी करावी? अशा विविध मुद्दय़ांवर या परिसंवादांमध्ये चर्चा करण्यात आली. या वर्षी या सेमिनार्समध्ये प्रा. मनीषा लोपेझ, प्रा. अशोक तिवारी, प्रा. सुचित पिंपुटकर, प्रा. राजेंद्र लोखंडे, प्रा. नेहल डगली, प्रा. रत्ना नांबिसान, प्रा. अँन्जेलीन अँथनी, प्रा. जयराज जोशी या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थी- पालकांना मार्गदर्शन केले. या वेळी विद्यार्थ्यांना प्रत्येकी करिअर मार्गदर्शन पुस्तिकांचा संच मोफत दिला गेला. या उपक्रमास ‘लोकसत्ता’ माध्यम प्रायोजक होते.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम
प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीची कामे करून थकलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वा:स टाकला नाही तोच आता पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या कामाचा बोजा त्यांच्यावर टाकण्यात आला आहे. शाळा सुरू होण्याच्या तोंडावरच जिल्हाधिकाऱ्यांकडून शाळांतील लिपीकांना व इतर कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामावर हजर राहण्याची पत्रे पाठविण्यात आली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कार्यपद्धतीवर शिक्षक भारतीचे पदाधिकारी आबासाहेब बंडगर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. १५ ते १६ तुकडय़ा असलेल्या अनेक शाळांमध्ये एकच लिपीक असतो. अशा शाळांतील लिपीकालाही जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या कामासाठी बोलविले आहे. जिथे जास्त लिपीक आहेत, तेथेही दोनपेक्षा अधिक लिपीकांना बोलावणे आले आहे. शैक्षणिक वर्षांच्या सुरूवातीचा हा कालावधी असल्याने वर्गाचे वेळापत्रक बनविणे, विद्यार्थ्यांचे दाखले देणे इत्यादी महत्त्वपूर्ण कामे त्यांना करावी लागतात. परंतु, अनेक शाळांमध्ये लिपीक नसल्यामुळे ही कामे शिक्षकांकडून करून घ्यावी लागत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून पाठविण्यात आलेल्या पत्रामध्ये ‘लोकप्रतिनिधी अधिनियम १९५०’ अन्वये निवडणुकीच्या कामावर हजर राहणे बंधनकारक असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात येत असल्यामुळे इतर सर्व कामे बाजूला ठेवून लिपीकांना निवडणुकीच्या कामांसाठी पाठवावे लागले ओह.

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनावर ‘स्लाईड शो’
प्रतिनिधी

मंत्रालय वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्ण महोत्सववानिमित्ताने ‘ संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची यशोगाथा’ या विषयावर स्लाईड शो तयार केला आहे. मराठी भाषिकांचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची कल्पना, महाराष्ट्र नावाचा इतिहास, त्याची महती, राज्य निर्मितीसाठी केंद्र सरकारने वेळोवेळी स्थापन केलेले आयोग, या आयोगाच्या अन्यायकारक शिफारशी, संयुक्त राज्य स्थापनेसाठी झालेल्या आंदोलनाचा आढावा, सरकारने आंदोलनकर्त्यांवर केलेले अन्याय, अत्याचार, त्याचप्रमाणे आंदोलनातील आघाडीच्या नेत्यांच्या सहभागाविषयी, ५० वर्षांत राज्य सरकारने केलेली प्रगती, या सर्व बाबींचा आढावा या स्लाईड शो मध्ये घेण्यात आला आहे. यासाठी ३०० हून जास्त वक्त्यांनी या शो मध्ये सादरीकरण केले आहे.बोरिवलीच्या जय महाराष्ट्र वसंत व्याख्यानमालेत या ‘शो’चे पहिले पुष्प गुंफले गेले आहे. महाराष्ट्राच्या तरुण पिढीला या राज्याच्या निर्मितीची संकल्पना स्पष्टपणे कळावी हा या ‘शो’चा उद्देश असल्याचे वैद्य यांनी स्पष्ट केले. राज्याच्या कानाकोपऱ्यात सादरीकरण व्हावे अशी अनेक मान्यवरांची अपेक्षा आहे. यासाठी श्री वैद्य ११/ ८५४ जय महाराष्ट्रनगर, बोरिवली, (पू.) अथवा ९८२०८२६९७४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

चित्रकार म. कृ. केळकर यांचे निधन
प्रतिनिधी

सुप्रसिद्ध चित्रकार म. कृ. केळकर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. म. कृ. केळकर हे ख्यातनाम निसर्ग चित्रकार- जलरंगाचा सरळ आणि सुगम वापर ही त्यांची खासियत होती. जगभर प्रवास करून वेगवेगळी ठिकाणे त्यांनी आपल्या कुंचल्यातून साकार केली. ते सुप्रसिद्ध चित्रकार कै. सा. ल. हळदणकर यांचे शिष्य होते. गुरूकडून मिळालेल्या जलरंगाचा वारसा पुढील पिढय़ांमध्ये पोहोचावा म्हणून त्यांनी व्रतस्थ वृत्तीने अनेक शिष्य तयार केले. त्यांच्या कला जीवनाचा प्रवास या विषयावर त्यांची एक शिष्या पूर्मिमा व्यास हिने प्रबंध सादर केला आहे. जलरंगातील चित्रकला या विषयावर त्यांची तीन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्या निधनामुळे एका कुंचल्याची भ्रमंती थांबली.

वसई-विरार परिसरात ‘लोडशेडिंग’चा गोलमाल
प्रतिनिधी

वसई - विरार परिसरात १३ जूनपासून अडीच तास लोडशेडिंग केले जाईल, असे आश्वासन विधिमंडळात दिल्यानंतरही ते पाळले जात नसल्याचा अनुभव लोकांना येत आहे. प्रत्यक्षात सव्वातीन तास लोडशेडिंग केले जात असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. वसई येथील वसंत नगरी या परिसरातील एव्हरशाईन सिटीतील लोकांना याचा अनुभव येत आहे. फिडर क्रमांक ११ मध्ये यापूर्वी पावणेतीन तास लोडशेडिंग होत होते. त्यानंतरही लोडशेडिंगचे नवे वेळापत्रक जाहीर केले गेले. मात्र प्रत्यक्षात आता सव्वातीन तास लोडशेडिंग करण्यात आल्याने शासनाने लोकांची दिशाभूल केल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. विधिमंडळात जे आश्वासन दिले जाते ते तरी शासनाने पाळावे, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.