Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मृगाचा पहिला आठवडा कोरडाच!
नागपूर, १५ जून / प्रतिनिधी

 

मृग नक्षत्र लागून आठवडा उलटला तरी पाऊस नसल्याने मोठे संकट उभे झाले असून पाण्यासाठी सारी जीवसृष्टी तडफडत आहे. पाऊस सतत हुलकावणी देत असल्याने उन्हाळाभर पाणीटंचाईला तोंड देणारे ग्रामस्थ रडकुंडीला आले आहेत. आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांची अवस्था सर्वात बिकट झाली आहे. मध्यंतरी विदर्भाच्या काही भागात गारपीटीसह पाऊस झाला. त्यानंतर अनेक दिवस सायंकाळी पावसाची एखादी सर येत होती. त्यामुळे यंदा मान्सून वेळेवर दाखल होणार अशी आशा सर्वानाच लागली होती. मात्र सहसा मृगाच्या पहिल्या आठवडय़ात हजेरी लावणारा मान्सून अजून आलेला नाही. खरीप हंगामातील पीकपेरणीसाठी चांगल्या पावसाची आवश्यकता असताना आता अचानक पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण असले तरी पावसाचा थेंब नाही. पाऊस रूसून बसला आहे. शेतीची तहान भागविणाऱ्या विहिरींना पाणी नाही. सिंचन प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. बोअरवेलची पातळीसुद्धा अत्यंत खोल गेली आहे. सध्या शहरांचे भागत असले तरी ग्रामीण भागात पाण्याच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. शासकीय स्तरावर विहिरी खोल करणे आणि नव्या बोअरवेलची कामे करण्यात आलीत मात्र, हे काम व्यापक स्तरावर झालेले नसल्याने गावखेडय़ातील पाण्याचा प्रश्न पुरता मिटलेला नाही. पाणी टंचाईमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आ-वासून उभा आहे. त्यामुळे दुधाचा धंदाही अडचणीत सापडला आहे.
विदर्भात सर्वत्रच भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली आहे. नद्या, नाले, कोरडे पडत चालले आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी विहिरीचे खोदकाम करून पाहिले. विहिरीत आडवे- उभे बोअर करून प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु, त्याचाही काहीच परिणाम झाला नाही. यातून मार्ग काढण्यासाठी ग्रामीण भागात बोअरवेल घेण्याची स्पर्धा वाढली. दोनशे-तीनशे फूट खोलवर खोदूनही पाणीच लागले नाही. विदर्भातील जलसाठय़ांमध्येही अल्प पाणीसाठा उरला आहे. नागपूर विभागातील प्रकल्पांमध्ये केवळ ३ टक्के पाणीसाठा आहे. प्यायच्या पाण्याची तर सर्वत्रच मारामार आहे. शासकीय स्तरावर पाणीसमस्या निवारणाचे प्रयत्न सुरू असले पावसाअभावी सगळे नियोजनच कोलमडून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाण्याअभावी शेतातील भाजीपाला जळून जात आहे. भाज्यांचे दरही सपाटून वाढले आहेत. ढगाळ वातावरण असले तरी मधूनच डोकावणारा सूर्य अजूनही आग ओकतो आहे. या कोंदट वातावरणात उकाडा वाढून लोकांचे हाल होत आहेत. पाऊस फार काळ लांबला तर दुष्काळाचे संकट ओढवण्याची धास्ती शेतकऱ्यांनी घेतली असून तो काकुळतीला येऊन वरूणराजाची मनधरणी करू लागला आहे.