Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

आता ग्रामीण पोलिसांची छापामार कारवाई
ती ‘रेव्ह पार्टी’ नव्हतीच!
नागपूर, १५ जून / प्रतिनिधी

 

हिंगणाजवळील घोटी येथील एका फार्म हाऊसवर शनिवारी मध्यरात्रीनंतर घातलेल्या छाप्यानंतर ग्रामीण पोलिसांचे डोळे उघडले असून पोलिसांनी आता छापामार कारवाई सुरू केली आहे. मात्र, त्या फार्म हाऊसवर ‘रेव्ह पार्टी’सारखे काहीही आढळले नसल्याचे हिंगणा पोलिसांनी सांगितले.
िहगणाजवळील घोटी परिसरात एका बिल्डरच्या फार्म हाऊसवर ‘रेव्ह पार्टी’ सुरू असल्याचे पोलिसांना समजले होते. मुंगीच्या पावलाने िहगणा पोलीस त्या फार्म हाऊसमध्ये शिरले. मध्यरात्रीही तेथे चढय़ा आवाजात डीजे वाजत होता. दोन तरुणी त्यावर नृत्य करीत होत्या. काहीजण मद्य आणि नृत्याचा आस्वाद घेत होते. ते इतके धुंद होते की पोलीस आल्याची त्यांना चाहुलच लागली नाही. पोलिसांनी ओळख करून दिल्यानंतर कुठे तेथे गोंधळ उडाला. अनेकांची नशा उतरली. मोबाईल वाजू लागले. त्यांच्याजवळ मद्याचा परवाना होता. त्यामुळे केवळ विनापरवानगी तसेच वेळेच्या मर्यादेनंतरही डीजे वाजवल्याप्रकरणी पोलिसांनी मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई केली. ‘रेव्ह पार्टी’सदृश तेथे काहीही आढळले नाही, असे िहगणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक बागुल यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या कारवाईनंतर पोलीस विभागातही खळबळ उडाली. िहगणा पोलीस ठाणे तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे दूरध्वनी खणखणू लागले. मुंबईहून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ग्रामीण पोलिसांना विचारणा केली. त्यामुळे सर्वच हादरून गेले. ग्रामीण भागात असलेल्या धनदांडग्यांच्या फार्म हाऊसवर मद्याच्या पाटर्य़ा, नृत्य सुरू आहे काय, याचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आहे. त्यामुळेच पाटणसावंगीमधील लाहोरी बारवर रात्री छापा मारण्यात आला. ग्रामीण पोलिसांनी छापामार कारवाई सुरू केल्याने असे प्रकार करणाऱ्यांचे आणि त्यांना आश्रय देणाऱ्या काही ठाणेदारांचेही धाबे दणाणले आहे.