Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

भाज्याही महागल्या..
नागपूर, १५ जून/प्रतिनिधी

 

जून महिन्याचा पंधरवडा संपूनही अजूनही पावसाला सुरूवात न झाल्याने वातावरणावर याचा मोठय़ा प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. पावसाअभावी बाजारात भाज्यांची आवक कमी झाल्याने सध्या भाज्यांच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. त्यातच वातावरणात अजूनही उकाडा कायम असल्याने ज्या काही प्रमाणात भाज्या येत आहेत, त्याही खराब होत असल्याने व्यापाऱ्यांनाही मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे भाजी उत्पादन करणाऱ्या शेतक ऱ्यांसह व्यापारीही पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत.
उन्हाळ्यात भाज्यांची आवक कमी होते. मात्र, यंदा जून महिन्याचे पंधरा दिवस गेल्यानंतरही पाऊस न झाल्याने शेतक ऱ्यांची चिंता वाढली आहे. मृगाचा पहिला आठवडा कोरडाच गेल्याने भाजी बाजारात आणखीच चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे भाजीपाल्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या कॉटन मार्केटमध्ये सर्व भाज्यांचे दर यंदा गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत दुप्पट झाले आहेत. पाऊस आणखी लांबल्यास भाज्या आणखी महागण्याची शक्यता आहे. कॉटन मार्केटमध्ये शहराच्या आसपासच्या परिसरातून आणि इतर राज्यातून बऱ्याच मोठय़ा प्रमाणात भाज्यांची आवक होते. सध्या कोथिंबीर, हिरवी मिरची, टोमॅटो, सिमला मिरची, फुलकोबी, पत्ताकोबी, वांगी, भेंडी या भाज्यांना विशेष मागणी असते. मात्र, सध्या यांची मागणीच्या तुलनेत आवक होत नसल्याने भाव वाढले आहेत. त्यामुळे सध्या ठोक बाजारपेठेत कोथिंबीर १५ ते २०, हिरवी मिरची २५ ते ३०, टोमॅटो २० ते २२, सिमला मिरची ३५ ते ४०, फुलकोबी १० ते १२, पत्ताकोबी ७ ते ८, पालक ७ ते १०, वांगी ७ ते ८, मेथी भाजी २२ ते २५, चवळी भाजी १५ ते २०, गवार शेंगा १५ ते १८, चवळी शेंगा १५ ते २० रुपये प्रति किलोने विकण्यात येत आहे. दर आठवडय़ात या बाजारपेठेत होणारी २०० ट्रक भाज्यांची आवक ७५ वर ट्रकवर येऊन ठेपली असून उष्ण व दमट वातावरणामुळे भाज्या खराब होण्याचे प्रमाणही वाढले आहे.
गेल्या काही दिवसांपासून लग्नकार्यही सुरू असल्याने वांगी, मिरची, कोंथिबीर, टोमॅटो, पालक या भाज्यांना विशेष मागणी आहे. पण, या भाज्यांची विक्री अधिक दराने होत असल्याने नागरिकांचे बजेट चांगलेच विस्कटले आहे. या भाज्यांशिवाय कोहळे ७ ते ८, काकडी १५, गाजर १५-२०, भेंडी १५-२० रुपये किलो असे भाज्यांचे दर आहेत. कांद्याच्या दरातही वाढ झाली आहे. चांगल्या प्रतीच्या लाल कांद्याचे दर १५ रुपये प्रति किलो आहेत. पांढरा कांदा १२ रुपये प्रति किलो प्रमाणे विकला जात आहे.