Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

शहरातील अनेक वस्त्या पाण्यापासून वंचित
नागपूर,१५ जून/ प्रतिनिधी

 

एकीकडे मान्सूनचे आमगन लांबले असताना दुसरीकडे शहरातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. उत्तर, पूर्व आणि पश्चिम नागपुरातील अनेक वस्त्यांना गेल्या काही दिवसांपासून पाणी मिळत नसल्याने नागरिक संतापले आहेत. नागपूर शहराला पेंच प्रकल्पातून १४० एमएलडी, पेंच टप्पा दोन मधून १४२ एम.एल.डी, पेंच टप्पा तीन मधून ११८ एमएलडी, जुना गोरेवाडा येथून १६ एमएलडी, कन्हान येथून १२६ एमएलडी असा एकूण ५४२ एम.एल.डी. पाणी पुरवठा होत आहे. पुरवठा होत असलेल्या पाण्यापेक्षा शहराची पाण्याची गरज कमी असतानाही पाण्याच्या चोरीमुळे शहारील बहुतांश वस्त्या तहानलेल्या आहेत. पश्चिम नागपुरातील सोनेगाव तलावालगत असलेल्या वस्त्यांमध्ये पाच दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे, लक्ष्मीनगर झोनमधील खामला, रामकृष्णनगर. त्रिमूतीनगर भागातील काही वस्त्या, २४ तास पाणी पुरवठा असलेल्या धरमपेठ झोनमधील धरमपेठ, गोकुळपेठ, रामनगर, तेलंगखेडी , उत्तरनागपुरातील आशीनगर झोनमध्ये येणाऱ्या वस्त्यांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. सोनेगाव तलावाच्या लगत वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना इतर ठिकाणाहून पाणी आणावे लागते. दक्षिण नागपुरातील रेशीमबाग, सोमवारी कॉर्टर या भागातील नागरिकांनाही पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. रामदासपेठसह काही भागात चोवीस तास पाणी मिळत असताना दुसरीकडे शहरातील सीमावर्ती भागातील वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची बोंब आहे. पश्चिम नागपुरातील प्रज्ञानगर, सौदामिनी सोसायटी, जयताळा मार्गावरील वस्त्यामध्येही पाणी टंचाई आहे, या भागातील नागरिकांनी टॅंकरची मागणी केली असता तेही पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
यासंदर्भात जलप्रदाय विभागाशी संपर्क साधला असता तांत्रिक कारणामुळे काही ठिकाणी पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याचे मान्य करण्यात आले, त्या भागात टॅंकर पाठवण्यात आल्याचा दावाही करण्यात आला. या विभागाचे कार्यकारी अभियंता शशिकांत हस्तक यांनी मान्सून लांबला असला तरी शहरासाठी पेंच प्रकल्पात पाणी राखून ठेवण्यात आल्याने विशेष अडचण जाणवणार नाही, असे स्पष्ट केले.