Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

आत्राम यांच्याकडून केवळ कराराचा भंग
बांबू-तोड प्रकरण
नागपूर, १५ जून/ प्रतिनिधी

 

माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी जंगलातील बांबू तोडून कराराचा भंग केला असला, तरी वनकायद्यानुसार कुठलाही गुन्हा केला नाही, असे शपथपत्र राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिले आहे. धर्मरावबाबा आत्राम यांनी बांबू उत्पादनांच्या विक्रीसाठी एक कंपनी स्थापन केली. गडचिरोली भागातील जंगलातील बांबू तोडून त्यांचे वेगवेगळे उत्पादन तयार करायचे आणि वापरायचे यासाठी त्यांनी वनविभागासोबत करार केला होता. यात खराब बांबू असतील तर ते खुल्या बाजारात विकण्याची परवानगी त्यांना देण्यात आली होती. मात्र या कराराचे उल्लंघन करून धर्मराव आत्राम हे चांगल्या प्रतीचे बांबूही बाजारात विकतात, अशी तक्रार सत्यनारायण गड्डेवार यांनी याचिकेद्वारे केली होती. त्यावर न्यायालयाने वनविभागाला या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले होते. आत्राम यांनी हे आरोप नाकारले होते. गड्डेवार यांनी राजकीय वैरापोटी ही याचिका दाखल केल्याचे त्यांनी म्हटले आहे. वनविभागाच्या चौकशीनंतर या खात्याच्या सचिवांनी सादर केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे की, चांगल्या बांबूंची विक्री करून आत्राम यांनी वनकायद्यानुसार कुठलाही गुन्हा केलेला नाही. त्यांनी वनविभागाशी झालेल्या कराराचा भंग केला आहे, मात्र त्या संदर्भात कनिष्ठ न्यायालयात दावा प्रलंबित आहे. फौजदारी याचिका दाखल व्हावी असे हे प्रकरण नाही. या शपथपत्रावर याचिकाकर्त्यांना उत्तर देता यावे म्हणून न्या. लवांदे व न्या. वराळे यांच्या खंडपीठाने याचिकेची सुनावणी एका आठवडय़ाने पुढे ढकलली आहे.