Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

रेशन दुकानातील ‘गोडवा’ हरवला
नितीन तोटेवार
नागपूर, १५ जून

 

स्वस्त धान्य दुकानातून तीन रुपये किलो भावाने तांदूळ आणि गहू देण्याच्या दिशेने सरकारची वाटचाल सुरू असली तरी, मे मध्ये पूर्व विदर्भातील रेशन कार्डधारकांना मात्र साखरेपासून वंचित रहावे लागले. जूनमध्येही अशीच स्थिती राहण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. साखर कारखाने आणि लेव्ही साखरेच्या परवानाधारकांच्या (नॉमिनी) दुर्लक्षामुळे ही स्थिती उद्भवली. अशा परवानाधारकांवर नोटीसेस बजावण्यात आल्या असून साखर कारखानेदेखील बदलवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सरकारने निश्चित केलेल्या साखर कारखान्यांकडे साखरच नव्हती किंवा निकृष्ट दर्जाची असल्याचा फटका मात्र पूर्व विदर्भातील गोंदिया वगळता पाचही जिल्ह्य़ाच्या हजारो ग्राहकांना बसला. मे महिन्यात नागपूर शहराला तर एकही किलो साखर मिळाली नाही. निराभीमासह पंढरपूरचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना आणि बापुराव देशमुख सहकारी साखर कारखान्यातून साखर मिळणार होती. साखरेची उचल न करणाऱ्या नॉमिनींवर स्थानिक अधिकाऱ्यांनी नोटीसेस बजावल्या आहेत. ग्रामीणसाठी पुणे जिल्ह्य़ाच्या इंदापूर तालुक्यातील निराभीमा सहकारी साखर कारखान्यातून १ हजार ८२७ क्विंटल साखर मिळणार होती. साखर कारखान्यात फक्त एक हजार क्विंटल साखर उपलब्ध असल्याने नागपूरला केवळ ३२० क्विंटल साखर मिळाली. यामुळे सुमारे दीड हजार क्विंटल साखर स्वस्त धान्य दुकानात आलेलीच नव्हती.
राज्यात सर्वात मागासलेल्या आणि नक्षलवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्य़ातील ग्राहकांचा मे महिना साखरेविना गेला. या जिल्ह्य़ात २ हजार २९१ क्विंटल साखरेचा कोटा असून तो अद्याप मिळालेला नाही. यामुळे मे महिन्यात रेशन कार्डधारकांना खुल्या बाजारातील साखर घ्यावी लागली. या जिल्ह्य़ास द्वारकाधीश शुगर, ससाणा, संगमनेर सहकारी साखर कारखाना, अहमदनगर आणि दौंड येथील अनुराज शुगरकडून सारखेचा पुरवठा होणार होता. वर्धा जिल्ह्य़ाला हिंगणघाटमधील बापूराव देशमुख सहकारी साखर कारखान्यातून १ हजार २५ क्विंटल साखर मिळणार होती. मात्र, २००७-०८ हंगामातील साखर उपलब्ध नसल्याने आवश्यक कोटा मिळालाच नाही. पिवळसर साखर, गोण्या फाटलेल्या आणि आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे कारण पुढे करून साखर उचलली नसल्याचे नॉमिनींनी नमूद केल्याचे सूत्रांनी सांगितले.
भंडाऱ्यात ३ हजार ६४४ क्विंटलपैकी २ हजार ६७४ क्विंटल सारखेची उचल करण्यात झाली. या जिल्ह्य़ास बापुराव देशमुख कारखाना, द्वारकाधीश शुगर, गणेश साखर कारखाना, कोपरगाव आणि नेवासा तालुक्यातील ज्ञानेश्वर साखर कारखान्यातून कमी साखर उचलण्यात आली. यामुळे ९७० क्विंटल साखरेपासून जिल्ह्य़ातील ग्राहकांना वंचित रहावे लागले. पाच जिल्ह्य़ाच्या तुलनेत गोंदियात स्थिती बरी आहे. या जिल्ह्य़ात ३ हजार २११ क्विंटल साखर पूर्णपणे उचलण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्य़ात ४ हजार १७६ क्विंटलमधून २ हजार ९९३ क्विंटलच साखर उचलण्यात आली. या जिल्ह्य़ास द्वारकाधीश शुगर, ज्ञानेश्वर साखर कारखाना, नेवासा, नीनाईदेवी साखर कारखाना, कोथरूड आणि अनुराग शुगरकडून साखर येते. या जिल्ह्य़ातील परवानाधारकांवरही नोटीसेस बजावण्यात आल्या आहेत.
कारखाने साखर देत नसल्यास ते बदलवून घेण्यासाठी सरकारला विनंती करा, असे पत्र पुरवठा उपायुक्त जयवंत चौधरी यांनी विभागातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना गुरुवारीच पाठवले. यामुळे आता कारखाने बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. मे मध्ये साखर मिळाली नाही आणि जूनमध्येही अशीच स्थिती राहण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.