Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

विकासासाठी झटणारा तरुण लोकप्रतिनिधी
सुरेश सरोदे

 

गडचिरोली जिल्ह्य़ातील आरमोरी विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या उमेदवारासाठी राखीव असून या मतदारसंघात आरमोरी, देसाईगंज (वडसा), कुरखेडा व कोरची या तालुक्यांसह धानोरा तालुक्यातील मुरुमगाव महसूल मंडळाचा समावेश आहे.या मतदारसंघाचे नेतृत्व आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी चळवळीत सक्रिय राहून, त्यांच्या समस्यांना वाचा फोडून राजकारणात उडी घेतलेले आनंदराव गेडाम करीत आहेत. आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात राहून शिक्षण घेत असताना आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांचे नेतृत्वगुण, संघटन कौशल्य विकसित झाले. त्यानंतर जिल्ह्य़ाचे ज्येष्ठ काँग्रेस नेते, सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांना राजकीय गुरू मानून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आरमोरी तालुक्यातील वैरागडनजीकच्या वडेगाव या छोटय़ाशा खेडय़ात जन्मलेले आनंदराव गेडाम यांचे संपूर्ण कुटुंब काँग्रेसच्या विचारसरणीचे आहे. त्यामुळे त्यांच्यावर बालपणापासूनच काँग्रेसचे संस्कार झाले.
१९८० पर्यंत आरमोरी विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व होते. १९८५ च्या निवडणुकीत समाजवादी काँग्रेसचे सुखदेव उईके निवडून आले. त्यानंतरच्या तीन विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार निवडून आले.तब्बल १४ वर्षांच्या कालखंडानंतर आनंदराव गेडाम हे काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले. १९९९ च्या निवडणुकीत काँग्रेसने आनंदराव गेडाम यांना उमेदवारी दिली. यावेळी त्यांचा केवळ ४०६ मतांनी पराभव झाला होता. १९९५ च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून लढलेले गेडाम काँग्रेसच्या उमेदवाराला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर होते. २००० मधील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वडसा-सिर्सी मतदारसंघातून जिल्ह्य़ातून सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
मतदारसंघातील विकास कामांसाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करून ते मार्गी लावणे, मतदारसंघात सातत्याने दौरे करणे हे आमदार आनंदराव गेडाम यांच्या कारकिर्दीतील वैशिष्टय़ आहे. त्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळेच कुरखेडा तालुक्यातील येंगलखेडा आणि कोसरी हे दोन महत्त्वाचे लघुसिंचन प्रकल्प मार्गी लागलेले असून या प्रकल्पांच्या बांधकामाच्या निविदा प्रक्रियेत आहेत. येंगलखेडा प्रकल्पापासून ५५६ हेक्टर तर कोसरी प्रकल्पापासून ५९४ हेक्टर क्षेत्रात सिंचनाची सोय होणार आहे. आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव (ठाणेगाव) उपसासिंचन योजनेस पाठपुरावा करून ८० लाख रुपयांचा निधी त्यांनी प्राप्त करून दिला.
याशिवाय इटियाडोह प्रकल्पाच्या झरी-फरी कालव्याच्या बांधकामास मंजुरी, बोडधा उपसिंचन योजना, कुरखेडा तालुक्यातील सोनसरी सिंचन तलावाच्या नूतनीकरणाचे काम, सुरसुंडी सिंचन तलावाचे नूतनीकरण व खोलीकरणाचे काम, पिसेवडधा ते मानापूर मार्गावरील खोब्रागडी नदीवरील मोठय़ा पुलाचे बांधकाम, डोंगरतमाशी-वैरागड मार्गावरील मोठय़ा पुलाचे बांधकाम मंजूर झाले असून यातील काही कामे प्रगतिपथावर आहेत.

मार्गी लागलेली कामे
*कुरखेडा तालुक्यातील येंगलखेडा व कोसरी लघुसिंचन प्रकल्प, डोंगरगाव (ठाणेगाव) उपसासिंचन योजना
*आरमोरी येथील पाणीपुरवठा योजनेसाठी पाठपुरावा करून १ कोटी ६० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करवला
*शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कुरखेडा येथे धान्य विक्रीसाठी खुली बाजारपेठ सुरू केली.
अपूर्ण राहिलेली कामे
* निधीअभावी रखडलेले आरमोरी-रामाळा मार्गावरील मोठय़ा पुलाचे बांधकाम
* अंगारा-खांबाडा रस्त्यावरील खोब्रागडी नदीवरील मोठय़ा पुलाचे बांधकाम
* वडसा ते गडचिरोली रेल्वेमार्ग,
*वनकायद्यामुळे रखडलेले भगवानपूर लघुपाटबंधारे तलाव, कुरखेडा तालुक्यातील सोनेरांगी, बाह्मणी व जांभूळखेडा तलावांचे बांधकाम.
मतदारसंघातील प्रमुख प्रश्न
रेल्वेमार्ग, राष्ट्रीय व राज्य महामार्गाचे रुंदीकरण करणे, वडसा- कुरखेडा-कोरची ते देवरी राज्यमार्गाचे मजबुतीकरण व रुंदीकरण, गडचिरोली-आरमोरी-ब्रह्मपुरी राज्यमार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरण, उद्योगधंदे नसल्याने रोजगाराचा प्रश्न, वनसंवर्धन कायद्यामुळे रखडलेले सिंचन प्रकल्प.
पुन्हा निवडून आल्यास
मंजूर झालेली सर्व कामे मार्गी लावणार, धानाला उत्पादन खर्चानुसार भाव मिळावा यासाठी प्रयत्न करणार.