Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

भ्रूणहत्या व स्त्रियांवरील अत्याचाराबाबत जनजागृती करणे आवश्यक -सुदेश बेरी
नागपूर, १५ जून / प्रतिनिधी

 

समाजात भ्रूणहत्या व स्त्रियांवर होणारे अत्याचार मोठय़ा प्रमाणात वाढले असून याला आळा बसावा म्हणून चित्रपट, मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून जनजागृती करणे आवश्यक आहे, असे मत अभिनेते सुदेश बेरी यांनी व्यक्त केले. झीटीव्हीवर सुरू असलेल्या ‘अगले जनम मोहे बिटिया ही किजो’ या मालिकेत लोहासिंगची भूमिका करणारे सुदेश बेरी पत्रकारांशी बोलत होते.
आजही अनेक समाजांमध्ये मुलींचा जन्म अशुभ मानला जातो. मुलींना यातना देणाऱ्या घटना समाजात घडत असतात. भ्रूणहत्येचे प्रमाण वाढले आहे पण या सर्व प्रश्नांबाबत मात्र समाजात हवी तशी जागृती दिसून येत नाही. विशेषत ग्रामीण भागातील स्थिती भयानक आहे. अनेक राज्यात ग्रामीण भागात गावातील पाटीलकी गाजविण्याचे प्रकार आजही पहावयास मिळत असले तरी या मालिकेतील पाटीलकी अतिशय वेगळी आहे. लोहासिंग हा एका गावातील कुटुंबप्रमुख दाखविला असला तरी तो समाजात होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढत असतो. समाजात स्त्रियांवर अन्याय अत्याचाराचे प्रकार होऊ नये हा संदेश या मालिकेतून देण्यात आला आहे, असेही सुदेश बेरी यांनी सांगितले.
हिंदी नाटकांपासून अभिनयाची कारकीर्द सुरू केली असली तरी आज मालिका आणि चित्रपटामुळे रंगमंचाकडे दुर्लक्ष झाल्याची खंत बेरी यांनी व्यक्त केली. रंगमंचावर काम करताना पैसा कमी मिळतो आणि वेळ बराच द्यावा लागतो त्यामुळे मालिका आणि चित्रपटाकडे जास्त लक्ष केंद्रित केल्याचे बेरी यांनी सांगितले. सध्या झीटीव्हीवर ‘माता की चौकी’ ही मालिका सुरू आहे. २००१ मध्ये ‘सुराग’ ही मालिका खूप गाजली होती. त्यानंतर काही काळ चित्रपटाकडे वेळ द्यावा लागल्यामुळे मालिकांमध्ये काम करणे कमी केले होते. मालिकेच्या माध्यमातून घराघरात कलाकारांची ओळख होत असते, त्यामुळे मालिकांकडे कलाकारांचा जास्त ओढा असतो, असेही बेरी म्हणाले. अमिताभ बच्चन आवडते कलाकार असले तरी ‘डुप्टीकेट’ अमिताभ म्हणून माझ्याकडे रसिकांनी पहावे हे मला स्वतला पटत नाही. सुदेश बेरी म्हणूनच रसिकांनी माझा अभिनय पहावा. अमिताभ बच्चन मोठे कलाकार असून त्यांच्यासोबत काम करायला मिळणे ही माझ्यासाठी मोठी उपलब्धी असल्याचे बेरी म्हणाले. टीआरपी हा प्रत्येक वाहिनीचा आर्थिक प्रश्न असतो. मालिका चांगल्या की वाईट हा अधिकार प्रेक्षकांना आहे त्यामुळे टीआरपीवर मालिकांचा दर्जा ठरवू नये, असेही बेरी म्हणाले.