Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मेळघाट वनविभाग कार्य आयोजनेच्या मराठी मार्गदर्शिकेचे प्रकाशन
नागपूर, १५ जून/प्रतिनिधी

 

पश्चिम मेळघाट वनविभागाच्या कार्य आयोजनेची ‘क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसाठी संक्षिप्त मार्गदर्शिका’ या मराठी भाषेतील पुस्तिकेचे प्रकाशन राज्याचे सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक बी. मजुमदार यांच्या हस्ते २७ मे रोजी वडाळी येथील सभागृहात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्य आयोजनाचे मुख्य वनसंरक्षक कृष्णमोहन होते. अमरावती प्रादेशिक विभागाचे मुख्यवनसंरक्षक सु.द. सोनटक्के, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक व क्षेत्रसंचालक ए.के. मिश्रा, अमरावतीचे कार्यआयोजनाचे वनसंरक्षक विरेंद्र तिवारी, अमरावतीचे सहसंचालक सु.भा. लिमये तसेच, वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
कार्य आयोजन हा एक तांत्रिक दस्तऐवज असून त्यात वनांच्या निरंतर व्यवस्थापनाकरता उपचार प्रस्तावित केला जातो. वनक्षेत्रात वृक्षगणना, साठाचित्रण, खोडाचे विश्लेषण इत्यादीचा अभ्यास करूनच कार्य आयोजना तयार केली जाते. कार्य आयोजनेस केंद्रसरकार व राज्यसरकारची मंजूरी प्राप्त झाल्यानंतरच अंमलबजावणी होते. कोणत्याही वनक्षेत्रात मंजूर कार्य आयोजनेशिवाय परिपक्व वृक्षांची तोड करता येत नाही. पश्चिम मेळघाट वनविभागाची कार्य आयोजना विरेंद्र तिवारी, एम.के. राव, जी.पी. गरड यांनी लिहिली असून, या कार्य आयोजनेचा कालावधी २००८-०९ ते २०१७-१८ आहे. सदर कार्य आयोजनेच्या महत्त्वपूर्ण तरतुदींचे मराठीत भाषांतर करून क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या वापरासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शिका वनसंरक्षक, कार्य आयोजना विभाग अमरावती यांनी तयार केली आहे. सदर पुस्तिका तयार करण्याकरता कार्य आयोजना विभागाचे वनक्षेत्रपाल सु.वि. बेदरकर यांनी सहकार्य केले.
पुस्तिकेत कुपाचे सीमांकन, झाडाची छापणी, उपचार, नकाशे तयार करण्याची पद्धत तसेच, जल व मृद संधारण, नैसर्गिक व कृत्रिम पुनर्निमिती इत्यादीचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यामध्ये संयुक्त वनव्यवस्थापन, राष्ट्रीय वन नीती तसेच, वन्यजीव व्यवस्थापनाबाबतच्या धोरणाचा देखील समावेश करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त कामाच्या नियंत्रणासाठी तयार करण्यात आलेल्या कूपनियंत्रण प्रपत्राचा देखील समावेश यामध्ये करण्यात आला आहे.
या पुस्तिकेमुळे कार्यआयोजनेच्या तरतुदी वनरक्षकांपर्यंत पोहोचेल व त्यामुळे क्षेत्रीय कामात सुधारणा होईल, अशी अपेक्षा बी. मजुमदार यांनी यावेळी व्यक्त केली.