Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

राज्यात कुलगुरूंची सहा पदे रिक्त होणार!
नागपूर, १५ जून/ प्रतिनिधी

 

यावर्षी राज्यातील २० कृषी व अकृषी विद्यापीठांपैकी ६ विद्यापीठे नवीन कुलगुरूंच्या प्रतीक्षेत राहणार असून कुलगुरू होण्याची सुप्त इच्छा असणाऱ्यांसाठी मोर्चेबांधणी करायला ही योग्य वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळेच येत्या काही महिन्यांमध्ये विविध विद्यापीठांच्या निवड समित्या स्थापण्याच्या प्रक्रियेलाही वेग येईल.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांचे भारतीय विद्यापीठ संघाचे (एआययू) सरचिटणीसपद अद्याप गेलेले नाही. भलेही त्यांनी दोन दिवसापूर्वीच पुढील एका वर्षांचे वेळापत्रक आखून विद्यापीठ कर्मचारी व विभाग प्रमुखांना रात्री दहा वाजेपर्यंत ‘वर्क कल्चर’चे धडे दिले असले तरी एआययूच्या सरचिटणीसपदाची आशा पार मावळली असे म्हणता येणार नाही.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय खोले, नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृदुला फडके, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर हे यावर्षीच निवृत्त होत आहेत. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांची केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाली आहे. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव हे केंद्रीय नियोजन मंडळाच्या सदस्यपदी रुजू होणार आहेत. अशा परिस्थितीत या सहाही ठिकाणच्या कुलगुरू पदासाठी मोर्चेबांधणी इच्छुकांसाठी पथ्यावर पडू शकते.