Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

स्वराधिराज
कलावंत केवळ कलावंतच असतो!

 

नागपूरच्या काही कलावंतांनी सादर केलेल्या ‘स्वराधिराज’ या कार्यक्रमाचे जे समीक्षण ‘लोकसत्ता’त प्रकाशित झाले त्याविषयी नाराजी व्यक्त करणारी प्रतिक्रिया आणि त्यावर ‘लोकसत्ता’च्या संगीत समीक्षकाचे उत्तर प्रकाशित करून हा वाद येथेच संपवत आहोत. विनोद वखरे यांची प्रतिक्रिया संपादित आहे; त्यांची भाषा जशास तशी प्रकाशित करणे सुसंस्कृतपणाचे ठरले नसते!
कलावंत हा फक्त कलावंत असतो. त्याच्याकडे धर्म- जात-पात-प्रादेशिक अस्मिता -लिंग अशा कोणत्याही रंगाच्या चष्म्यातून न बघण्याचीच ‘लोकसत्ता’ची भूमिका आहे आणि आमच्या समीक्षकाने ती आजवर पाळली आहे.
-निवासी संपादक

वैदर्भीय कलाकारांचे खच्चीकरण
सध्या विदर्भातील सांगीतिक क्षेत्राला चांगले दिवस आले असताना वृत्तपत्रांची भूमिका सकारात्मक असावी असे वाटते. वास्तविक विदर्भातील कलावंतांचे ‘लाईट’ गाण्यांचे कार्यक्रम सोडल्यास शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांसाठी प्रायोजकही मिळत नाही आणि अशाही परिस्थिीतीत आम्ही ‘स्वराधिराज’ हा कार्यक्रम कसा केला हे सांगून तरी काय उपयोग? ‘लोकसत्ता’तील ‘स्वराधिराज’ हे समीक्षण वाचल्यानंतर कोणालाही असेच वाटेल की, आम्ही केवळ येथील, स्थानिक कलावंत होत म्हणून वैदर्भीय संगीत कलाकारांचा मानसिक छळ करण्याच्या पलीकडे काहीही साधलेले नाही. जर समीक्षकाचा हेतू आम्हा कलाकारांना नाराज वा नाऊमेद करण्याचा नसता तर ‘स्वराधिराज’ हा कार्यक्रम अजून चांगला करता आला असता एवढे लिहिले तरी चालले असते; परंतु आम्ही कपाळकरंटे कमनशिबी वैदभर्ाीय कलावंत पडलो ना! आम्हाला चिरडले नाही तर समीक्षकाला कलाकारांना मानसिक दु:ख देण्याचा आनंद कसा मिळणार?
एक बाब प्रामुख्याने नजरेस आणून द्यावयाची आहे ती म्हणजे, ‘स्वराधिराज’ वर लिहिताना हेही नमूद करण्यात आले आहे की, आजवर पं. भीमसेन यांच्यावर जेही कार्यक्रम सादर झाले त्या सर्वच कार्यक्रमांमधून फारसा आनंद मिळाला नाही. मग या सर्वच कार्यक्रमावर समीक्षकाने एवढी टीका केली का? किंबहुना ज्यांनी चार नागपुरातील व एक दोन बाहेरचे कलाकार घेऊन जो कार्यक्रम सादर केला तो मात्र ‘लोकसत्ता’च्या समीक्षकाच्या दृष्टीतून सन्माननीय अपवाद होता. स्थानिक कलावंत व बाहेरील कलावंत असा भेद केला म्हणजे वैदर्भीय कलाकारांविषयी काहीही लिहिले तरी चालते, अशी संगीत समीक्षकाची गोड गैरसमजूत झालेली दिसते एवढे मात्र खरे!
शास्त्रीय संगीताचे कलाकार म्हणून कुठलाही कार्यक्रम करण्यासाठी वैदर्भीय आम्ही जेव्हा पुढाकार घेतो तेव्हा संगीत समीक्षकांना आमच्यावर टीकास्त्र सोडण्यासाठी तर रानच मोकळे मिळते; परंतु पं. भीमसेनवर आतापर्यंत जेवढे कार्यक्रम सादर झाले त्यात किती गायकांनी त्यांच्या संपूर्ण बंदिशी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात सादर केल्या जेवढय़ा ‘स्वराधिराज’ या कार्यक्रमातून एका स्थानिक कलावंताने केल्या आणि वसंत बहार नंतर एवढय़ासाठीच भैरवी घेतली की, कार्यक्रमाच्या समापनाला उशीर होत होता. राहिला प्रश्न माझ्या सुरांचा आणि बेसुरांचा; अन्य वृत्तपत्राचे संगीत समीक्षक आमच्या कार्यक्रमाविषयी व माझ्या स्वरांविषयी स्तुती करून प्रोत्साहन देतात; परंतु ‘लोकसत्ता’चे संगीत समीक्षक मात्र आमच्या चुका काढण्यातच आनंद मानतात! सरतेशेवटी निवेदनाच्या भागाविषयी एवढेच सांगावेसे वाटते की, पं. भीमसेनवर अस्तित्वात असलेल्या ज्या काही क्लिप्स आमच्याजवळ होत्या त्याच आम्ही वापरू शकलो. शेवटी आम्ही काही पुण्या-मुंबईचे तर गायक- निवेदक नाही की आमच्याजवळ सगळीच चांगली क्लिपिंग्ज पटकन उपलब्ध होतात. मी कार्यक्रमाच्या आधीच सांगितले होतं की, शास्त्रीय संगीतातील पंडितजीच्या बंदिशी बेस मानून ही कार्यक्रमाची प्रस्तुती आहे. मग त्यात थोडय़ाफार त्रुटी राहिल्या तर त्यात ‘नाराज वा नाऊमेद न करता’ असे म्हणून शालीतून आम्हाला मारण्याचा उपक्रम फार ‘स्तुत्य’ आहे असेच म्हणाले लागले.
विदर्भाच्या मातीत वाढणाऱ्या आम्हा कलाकारांविषयी जर संगीत समीक्षक टीका करून आमचे मानसिक खच्चीकरण करत असेल व इथली आताशा थोडीफार मूळ धरत असलेली सांस्कृतिक चळवळ दडपली जाईल यात शंकाच नाही, असे ठामपणे वाटते.
विनोद वखरे

‘उपेक्षे’चे भूत उतरावे!
सर्वप्रथम विनोद वखरे यांनी हे लक्षात घ्यावे की, आयोजकांनी केलेल्या निमंत्रणावरूनच मी, एका प्रतिष्ठित वृत्तपत्राची स्तंभलेखिका, या नात्यानेच तेथे उपस्थित होते. पत्राविषयी अन्य वृत्तपत्रांच्या वृत्तांताचा आपण उल्लेख व तुलना केली आहे. माझी हजेरी बातमीसाठी नाही तर कार्यक्रमाच्या समीक्षणासाठीच असते. एक तर वृत्तांत व समीक्षा यात फरक असतो. कार्यक्रमपूर्ण न ऐकता केवळ स्तुती पर लेखन केल्यास कलावंतांची दिशाभूल होऊ शकते. हे आपण आधी लक्षात घ्यावे. म्हणजे आपल्याविषयीचेच आपले अज्ञान दूर होईल.
आपण पत्रातून सतत ‘वैदर्भीय कलाकारांचा मानसिक छळ करून व त्यांचे मानसिक खच्चीकरण’ मी करीत आहे. त्यांच्याबद्दल विशेषत: शास्त्रीय संगीताच्या कलाकारांबद्दल मी चांगले लिहित नाही, असे तुणतुणे वाजविले आहे. त्याबद्दल सांगायचे झाल्यास प्रतिष्ठित संगीत समारोहातून लागलेल्या हजेरीतील अन्य व वैदर्भीय शास्त्रीय संगीतातील कलावंतांविषयी मी सातत्याने म्हणजे जवळ जवळ, दीड तप, संगीत स्तंभातून लिहितच आहे. आपण ‘वैदर्भीय’ हा विशेष उल्लेख केल्यामुळे त्यांच्याबद्दलचा मजकूर देत आहे. नागपूरमध्ये जेवढे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम होत असतात त्यांचे सविस्तर वृत्त समीक्षेसह ‘लोकसत्ता'तून सर्व विदर्भात पोहोचत असते. माझ्या संपूर्ण लेखनातील ८० टक्के लेखन हे वैदर्भीय कलावंतांवरच झालेले आहे. (हे जाणून घेण्यासाठी मात्र आपल्याला आमच्या वृत्तपत्राचे वाचन नियमित करण्याची तसदी घ्यावी लागेल. केवळ आपल्याच कार्यक्रमाचा वृत्तांत वाचून घाईघाईने निर्णय घेऊन मत प्रदर्शन केल्यास अशा चुका होणारच!) एवढय़ा कारकीर्दीत मी ज्यांच्यावर लेखन केले त्या वैदर्भीय कलावंतांची नावे वानगीदाखल सांगायची झाल्यास ज्येष्ठतम गायक पं. राजाभाऊ कोगजे, बबनराव आठल्ये, पं. गोपाळराव वाडेगावकर, पं. मनोहरराव कासलीकर, पं. मनोहर कवीश्वर यांच्यापासून हमीद खान, डॉ. कल्याणी देशमुख, डॉ. चित्रा मोडक, अनिरुद्ध देशपांडे ते अरविंद उपाध्ये, शिरीष भालेराव, डॉ. साधना नाफडे, मीरा चंद्रशेखरन, श्रीमथी माडखोलकर यांच्याबद्दल मी भरपूर लेखन केले आहे. आणि हे सर्वच कलावंत वैदर्भीयच आणि शास्त्रीय संगीताशीच निगडित आहेत.
पं. भीमसेन जोशी यांच्यावरील कार्यक्रमांबद्दल ‘नक्षत्रांचे देणे’ पं. भीमसेन जोशी (शिवधनुष्य पेलले नाही) व गुणवंत घटवाई यांचा स्वराभिनंदन अशा दोनच कार्यक्रमांबद्दल मी लिहिले आहे. त्यांचे समीक्षण आपण वाचले असेलच. आपण उल्लेख केलेल्या व ‘सप्तक’ने सादर केलेल्या पंडितजींवरील कार्यक्रमाच्यावेळी मी नागपूरमध्ये नव्हतेच. त्यामुळे त्याविषयी मी लेखन केलेलेच नाही, ही आपल्या तपशिलातील चूक आहे. ‘सन्माननीय’ अपवाद असा उल्लेख गुणवंत घटवाई यांच्या संदर्भात आहे आणि त्यांची मी स्तुतीच केली आहे. आणि ते वैदर्भीय कलावंतच आहेत. याचे आपणास दु:ख होणार नाही असे वाटते. ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमावर मी टीका केली आहे. आणि त्यातील सर्वच कलावंत पुण्या- मुंबईकडचेच होते. तेव्हा या गोष्टीचाही आपणास आनंद व्हायला हरकत नाही!
‘आस्वादक समीक्षा’ हा माझ्या अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय आहे. आणि त्यासाठी ‘स्वरसम्राट’ असण्याची अजिबातच गरज नाही. तर समीक्षेचा व्यासंग आणि कलावंत सादर करीत असलेल्या कलेचा आस्वाद घेण्याची क्षमता या ठिकाणी लागते. (प्रसंगी तर कोणत्याही दर्जाचे संगीत ऐकण्याची सहनशीलता आणि चिकाटी सुद्धा लागते!) हो, शेवटपर्यंत कार्यक्रम ऐकण्याची शिस्तसुद्धा पाळावी लागते. एवढी श्रवण- तपश्चर्या मी निश्चितच केली आहे. हे वाचल्यावर तरी आपल्या मानगुटीवरील ‘वैदर्भीय कलावंतांच्या होत असलेल्या उपेक्षेचे’ भूत उतरेल ही अपेक्षा आहे. आक्रस्ताळेपणाने ओरबाडून घेतल्या जाणाऱ्या प्रसिद्धीचेही हसेच होत असते, याउलट गुणवत्ता सिद्ध करून झालेली स्तुती शोभादायक असते, ती तुम्हाला लाभो अशी शुभेच्छा!
डॉ. सुलभा पंडित