Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

क्रॅडक रोडचे रुंदीकरण आणखी ६ महिने लांबणीवर
नागपूर, १५ जून/ प्रतिनिधी

 

मध्य नागपुरातील क्रॅडक रोडचे रुंदीकरण करण्यासाठी महापालिकेने उच्च न्यायालयात सहा महिन्यांची वेळ मागून घेतली आहे.
क्रॅडक रोड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गोळीबार चौक ते मारवाडी चौक या मार्गाचे मूळ आराखडय़ाप्रमाणे ६० फूट रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका मध्य नागपूर विकास आघाडीतर्फे भूषण दडवे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात केली आहे. हा रस्ता डी.पी. प्रमाणे ६० फुटांचा करण्यात यावा, असे आदेश खंडपीठाने नोव्हेंबर २००५ मध्ये दिले होते. हे काम १८ महिन्यात पूर्ण करण्यास खंडपीठाने सांगितले होते. या कामाचा कार्यादेश जून २००७ मध्ये निघाला होता आणि त्यात काम पूर्ण होण्यासाठी १८ महिन्यांचा वेळ निश्चित करण्यात आला होता.
रुंदीकरणाचे काम एम.आय.डी.सी.तील फिनिक्स इंजिनियरिंग कंपनीला देण्यात आले होते. १८ महिन्यांची मुदत उलटून २४ महिने झाले तरी हे काम पूर्ण झालेले नाही.
दरम्यानच्या काळात गेल्या मे महिन्यात मध्य नागपूर विकास आघाडीने मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, नागपूरचे पालकमंत्री, सार्वजनिक उपक्रम मंत्री व महापालिका आयुक्त यांना निवेदन देऊन, उच्च न्यायालयाच्या आदेशाची जाणूनबुजून अवहेलना करणारे महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रकाश उराडे व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता एस.बी. माने यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.
ही याचिका नुकतीच न्या. सिन्हा व न्या. भंगाळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणीला आली. या कामाला उशीर झाला आहे ही बाब महापालिकेने मान्य केली. मात्र लवकरच पावसाळा सुरू होत असल्याने कामाला वेळ लागेल. काही ठिकाणी फाटक, तर काही ठिकाणचे विजेचे खांब काढायचे आहेत.
ही सर्व कामे करून विकास आराखडय़ानुसार हा रस्ता ६० फुटांचा केला जाईल, मात्र त्यासाठी ६ महिन्यांची मुदत मिळावी अशी विनंती महापालिकेच्या वकिलांनी केली. ती मान्य करून न्यायालयाने महापालिकेला क्रॅडक रोडचे रुंदीकरण पूर्ण करण्यासाठी आणखी ६ महिन्यांची, म्हणजे येत्या डिसेंबपर्यंत मुदत दिली आहे.