Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सहाव्या वेतन आयोगासाठी शिक्षक परिषदेचे मुंबईला धरणे आंदोलन
नागपूर, १५ जून / प्रतिनिधी

 

महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणेच सहावा वेतन आयोग लागू करावा, त्यात हकीम समितीला शिक्षक परिषदेने सुचवलेल्या त्रुटी दूर करून केंद्राप्रमाणे सहावा वेतन आयोग लागू करण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे मुंबईतील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व शिक्षक परिषदेचे अध्यक्ष बाबासाहेब काळे, सरकार्यवाह श्रीकृष्ण अवचार, कोषाध्यक्ष शंकरराव रावघन, माजी शिक्षक आमदार संजीवनी रायकर यांनी केले. यानंतर कर्मचाऱ्यांचा नोकरभरती संबंधी आकृतीबंध शिक्षण संहितेप्रमाणे लागू करावा, शिक्षक सेवकांना वेतनश्रेणी देण्यात यावी, पायाभूत पदे मंजूर करावी, कायम विनाअनुदानित शाळा मान्यतामधील ‘कायम’ हा शब्द काढण्यात यावा, शिक्षण सेवक योजना रद्द करण्यात यावी, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देवू नयेत, नवीन शाळा धोरण लागू करावे आदी मागण्यांच्या संदर्भात शिक्षणमंत्री राधाकृष्ण पाटील यांना एक शिष्टमंडळ भेटले व त्यांना निवेदन देण्यात आले. सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करण्यात येऊन त्या पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले. धरणे आंदोलनात नागपूर विभागातून कार्यवाह शेषराव बिजावार, शहर कार्यवाह योगेश बन, संघटनमंत्री विनोद पांढरे, प्रकोष्ठ प्रमुख डॉ. उल्हास फडके, उपाध्यक्ष अशोक तेलपांडे प्रामुख्याने सहभागी झाले होते.