Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

९० टक्के भावी शिक्षक व्यसनाधीन -प्राचार्य देढे
नागपूर, १५ जून/ प्रतिनिधी

 

व्यसनमुक्तीचा लढा देणारे ९० टक्के भावी शिक्षक व्यसनाधीन झालेले आहेत. त्यांना गुटखा, खर्रा, सिगारेट यांचे व्यसन जडलेले असून दारू पिणे, कॉलेजच्या नावाने सिनेमा वा अन्य ठिकाणी फिरायला जाणे, कित्येक वेळ मोबाईलवर बोलणे व शेवटी पालकांसमोर सभ्य असल्याचे दाखवणे यातही ते मागे नाहीत. त्याकरता वेळीच पालकांनी पाल्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य राजीव देढे यांनी केले.
गणेशनगर येथील व्हीएसपीएम अकादमी ऑफ हायर एज्युकेशन द्वारा संचालित विवेकानंद डी.एड. कॉलेज येथे नुकतीच पालक सभा आयोजित करण्यात आली होती. त्यात ते बोलत होते. या वस्तुस्थितीचा नमुना एल.सी.डी. प्रोजेक्टरद्वारा पालकांना दाखवण्यात आला. चारित्र्य संपन्न शिक्षक बनण्याकरता पालकांची सुद्धा महत्त्वाची भूमिका असते. पाल्य शिस्तप्रिय कसा होईल, पालकांचे नाव कसा उंचावेल व जीवनात यशस्वी कसा होईल, याकडे सुद्धा लक्ष देण्याचा दृष्टीने पाल्यासाठी वेळात वेळ काढलाच पाहिजे. तरुणांची गर्दी पानठेल्यावर जास्त दिसते मात्र, ग्रंथालयात नाही, याकडेही त्यांनी पालकांचे लक्ष वेधले.
यावेळी पालकांना त्यांच्या पाल्याकडून व मुलांना त्यांच्या पालकांकडून काय अपेक्षा आहेत, ते लेखी मागवण्यात आले. पालक प्रतिनिधी अरुण लेंडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. आनंद मोहबे, अरुण सूर्यवंशी, भुवनलाल कटरे, पुरुषोत्तम पुसतकर, वसंत हेमने, अशोक रहिले, रेणुताई भागवतकर, गणेश खवसे आदी यावेळी उपस्थित होते. संचालन निकिता चवरे यांनी केले.