Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

आँखवाली पम-पम.. गोंदिया जिल्हय़ासाठी आगळावेगळा उपक्रम!
नागपूर, १५ जून/प्रतिनिधी

 

‘इम्पॅक्ट इंडिया फाउंडेशन’, ‘साईट सेव्हर्स इंटरनॅशनल व्होलकार्ट फाउंडेशन’ आणि ‘महात्मे आय बँक व आय हॉस्पिटल’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आँखवाली पम-पम’ हा आगळावेगळा उपक्रम प्रथमच गोंदिया जिल्हय़ात राबविण्यात येणार असल्याची माहिती महात्मे आय बँकचे संस्थापक संचालक डॉ. विकास महात्मे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या उपक्रमाअंतर्गत नेत्रतपासणी तसेच, चष्मा बनविण्यासाठी लागणारी सर्व मौल्यवान उपकरणे या गाडीत सुसज्ज राहतील. गोंदिया जिल्हय़ातील खेडोपाडी तसेच, आदिवासी व दुर्गम भागात रुग्णांच्या दारापर्यंत जाऊन सेवा देण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. नेत्रतपासणीनंतर चष्म्याची गरज असलेल्या रुग्णांना गाडीतच चष्मा बनवून देण्याची सोय आहे. हे चष्मे मोफत देण्यात येणार आहेत. ज्या रुग्णांना मोतिबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे त्यांना नागपूर येथे आणून महात्मे नेत्ररुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. या गाडीत लवकरच टेलेमेडिसीनची सुविधा उपलब्ध होईल, जेणेकरून ज्या रुग्णांच्या विशेष तपासणीची गरज आहे त्यांचीही तपासणी होऊ शकेल. ही गाडी उपलब्ध करून देण्याचे श्रेय ‘इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशन’ व ‘व्होलकार्ट फाउंडेशन’ला जाते. उपक्रम चालविण्यासाठी ‘साईट सेव्हर्स इंटरनॅशनल’ निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर प्रत्यक्ष रुग्णांच्या दारापर्यंत सेवा देण्याचे कार्य महात्मे आय बँक हॉस्पिटल करणार आहे. टाळता येऊ शकणाऱ्या अंधत्वावर मात करण्याच्या दृष्टीने विदर्भासाठी हा एक फलदायक उपक्रम राहील, असे डॉ. महात्मे यांनी सांगितले.
‘आँखवाली पम-पम’चा हस्तांतरण सोहोळा उद्या, मंगळवार, १६ जूनला दुपारी १२ वाजता चिंतामणनगर सोमलवाडा येथील महात्मे आय बँक हॉस्पिटल येथे होणार आहे. याप्रसंगी खासदार विलास मुत्तेमवार, जिल्हाधिकारी प्रवीण दराडे, इम्पॅक्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी झेल्मा लाझारस, व्होलकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीनाथ साईट सेव्हर्सच्या विभागप्रमुख एलिझाबेथ कुरीयन यांचे प्रतिनिधी डॉ. राजेश कापसे तसेच, महात्मे आय बँकचे संस्थापक संचालक डॉ. विकास महात्मे उपस्थित राहणार आहेत.
विदर्भातील नेत्रतज्ज्ञ व ऑप्थॉल्मिक ऑफिसर यांची कार्यक्षमता वाढावी या उद्देशाने साईट सेव्हर महाराष्ट्र सरकार व महात्मे आय बँक हॉस्पिटलतर्फे कॅपॅसिटी बिल्डींगची कार्यशाळा घेणे सुरू आहे. याअंतर्गत साधारण विदर्भातील ३०० डॉक्टर्स व कर्मचारी यांना या प्रशिक्षणाचा लाभ होईल.
याशिवाय ‘डोळस प्रवास’ या महात्मे आय बँक हॉस्पिटलच्या स्मरणिकेचे प्रकाशन खासदार विलास मुत्तेमवार यांच्या हस्ते होईल, असे डॉ. महात्मे यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला डॉ. राजेश कापसे, मधुकर काळमेघ, दत्ता चिवाणे, अनिल वैरागडे उपस्थित होते.