Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

शैक्षणिक शुल्क वाढीचा महासंग्राम पार्टीतर्फे निषेध
नागपूर १५ जून/ प्रतिनिधी

 

महाराष्ट्र शासनाने शिक्षणाचा बाजार मांडला असून संस्थेतील विना अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये फी वाढीचे अधिकार संस्थापकांना बहाल करून राज्य शासन गरीब, बहुजन, ओबीसी, आदिवासींच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत त्याचा महासंग्राम पार्टीने निषेध केला आहे.
ही निषेध सभा नुकतीच नरसाळा येथील प्रभातनगर येथे घेण्यात आली. अध्यक्षस्थानी डॉ. अनंत नास्नुरकर होते. शिवाय अ‍ॅड. नामदेव गव्हाळे, महादेव चतारे, ज्ञानेश्वर रक्षक, संतोष कावडकर, अनिल वानखेडे, पांडुरंग शेबे, शंकर माटे, शंकर वाकुडकर आणि रवी बुंदे यावेळी उपस्थित होते. नास्नुकर म्हणाले, १०० विद्यार्थ्यांनी पहिलीत प्रवेश घेतल्यानंतर दहावीत केवळ १० मुले पोहोचतात. तर पदवीपर्यंत केवळ ३ मुले शिल्लक राहतात. अशा परिस्थितीत बिना अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये भरमसाठ फी वाढ करण्याचे अधिकार शिक्षण सम्राटांना बहाल करणे भारतीय संविधानाचा अपमान करणे असून समान अधिकार नाकारण्याचा कुटील डाव आहे. त्यामुळे सार्वत्रिक शिक्षणाचा बोजवारा उडणार आहे. राज्य सरकारच्या या घटना विरोधी धोरणाचा तीव्र विरोध म्हणून राज्यभर २६ जूनला शाहू महाराज यांच्या जन्मदिनापासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. संचालन अरुण चुरड यांनी केले, तर रवी बुंदे यांनी आभार मानले.