Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

आठशे कोटींच्या रेल्वे पतसंस्थेच्या संचालकपदासाठी चुरस
नागपूर, १५ जून/ प्रतिनिधी

 

मध्य रेल्वेतील आठशे कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या पतसंस्थेवर संचालक म्हणून निवडून येण्यासाठी कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे.
अविभाजित मध्य रेल्वेमधील या पतसंस्थेचे तब्बल दोन लाख भागधारक असून ते येत्या १८ जूनला होणाऱ्या निवडणुकीत प्रतिनिधी निवडणार आहेत. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागासह, पुणे, सोलापूर, मुंबई, जबलपूर, भोपाळ, झाशी, आग्रा या नऊ विभागात एकाचवेळी निवडणूक घेण्यात येणार आहे. सेन्ट्रल रेल्वे एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची १३ ऑगस्ट १९१३ रोजी स्थापन करण्यात आली. या पतसंस्थेच्या प्रत्येक विभागात शाखा आहेत. पतसंस्थेची वार्षिक उलाढाल ८०० कोटी रुपयांच्या घरात आहे.
पतसंस्थेचे भागधारक नागपुरात ७ हजार ४८० तर नागपूर विभागात सुमारे १६ हजार आहेत. नागपूर विभागात ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, परिवर्तन पॅनल (सेन्ट्रल रेल्वे मजदूर संघ, रेल्वे कामगार सेना व ट्रॅकमन असोसिएशन) आणि एससी/ एसटी असोसिएशन या तीन आघाडय़ा निवडणूक रिंगणात आहेत.
नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्यावतीने एस.आर. नेहारे, संजय भोयर, प्रमोद बोकडे, एस.एम. कापसे, मो. शकील, दीपक चौरीपांडे, देविनंदा मोठे, प्रदीप भगत, कुलदीप सोमकुंवर, अजय रगडे, शमन शामा, अनिल वामन असे १२ उमेदवार नशीब अजमावत आहेत. यापैकी एस.आर. नेहारे हे मावळत्या संचालक मंडळात देखील होते.
परिवर्तन पॅनलतर्फे खुद्द विभागीय अध्यक्ष विनोद चतुर्वेदी, आरती प्रधान, नितीन समर्थ, प्रेमिला राठोड, शेख उस्मान शेख चांद, वीरेंद्र सिंग, ताराचंद, लोखंडे आणि एससी/ एसटी असोसिएशनतर्फे मिलिंद रंगारी, विजय पखाले, रंगारी, नगराळे रिंगणात आहेत.