Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

घरगुती नळाला दुर्गंधीयुक्त पाणी
नागपूर,१५ जून/प्रतिनिधी

 

नागसेन नगरातील वसाहतीत अनेक घरातील नळांमधून दुर्गंधीयुक्त पाणी येत असून ते आरोग्यासाठी अपायकारक असल्याची तक्रार वॉर्ड सुधार कृती समितीने महापालिकेकडे केली आहे.
वॉर्डम् क्रमांक १० नागसेन नगर मधील एमआयजी, एलआयजी, हुडको कॉलनी व लगतच्या वस्त्यांमध्ये मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु असल्याचा दावा समितीने केला आहे. या भागातील मुलांना विविध आजारांनी ग्रासले आहे. याबाबत आशीनगर झोनमधील जलप्रदाय विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता तेथील अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप समितीने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकातून केला आहे.
एमआयजी कॉलनी व एलआयजी कॉलनी, हुम्डको कॉलनीतील इमारत क्रमांक १ ते १२ पर्यंत मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम मागील दोन महिन्यापासून कासव गतीने सुरु आहे. पूर्वी २० फुटाचा हा रस्ता होता. आता ४० फुटांचा करण्यात आला आहे. या रस्त्यासाठी एलआयजी आणि एमआयजी कॉलनीतील तळ मजल्यावरील गाळेही पाडण्यात आले. ही दुकाने तोडतांना जलवाहिनी आणि मलवाहिनीही फुटली त्यामुळे दूषितपाणी जलवाहिन्यांच्या माध्यमातून नळाव्दारे येत आहे, असा समितीचा आरोप आहे. रस्त्यासाठी खोदण्यात आलेल्या जागेवर पाणी साचले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल महापौरांनी घ्यावी, असे आवाहन समितीचे प्रमोद भाटकर यांनी केले आहे.