Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

विदर्भातील १७ नगराध्यक्षांची आज निवडणूक
नागपूर, १५ जून / प्रतिनिधी

 

विदर्भातील १८ नगर पालिकांच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक उद्या १६ जूनला होणार असून सत्ताधारी पक्षांनी पालिकेवरील वर्चस्व कायम राखण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. तर विरोधी गटांनी सत्ता बळकावण्यासाठी व्यूहरचना आखली आहे.
नगरपालिकांच्या अध्यक्षांच्या अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने नवीन नगराध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया १६ जूनपासून प्रारंभ होत आहे. १६ ते २३ जूनपर्यंत विदर्भात ठिकठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्षांची निवडणूक पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात उद्या, २० नगरपालिकांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडले जाणार असून त्यापैकी वर्धा जिल्ह्य़ातील पुलगाव, वर्धा येथील अध्यक्ष-उपाध्यक्षांची बिनविरोध निवड झाली असून सिंदीरेल्वेच्या नगराध्यक्षाची बिनविरोध निवड झाली असली तरी उपाध्यक्ष पदासाठी मात्र उद्या, निवडणूक होणार आहे. आर्वीतील निवडणूक स्थगित झाली आहे. उर्वरित नगरपालिकांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष उद्या निवडले जाणार आहेत.
अमरावती जिल्ह्य़ातील वरूड, शेंदुरजनाघाट, दर्यापूर, अचलपूर, धामणगावरेल्वे, चांदूर बाजार व चांदूर रेल्वे; अकोला जिल्ह्य़ातील आकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर व मूर्तीजापूर; वर्धा जिल्ह्य़ातील देवळी व हिंगणघाट, आणि गडचिरोली जिल्ह्य़ातील गडचिरोली नगरपालिकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष मंगळवारी निवडण्यात येणार आहेत. तर देसाईगंजच्या नगराध्यक्षपदासाठी डॉ. महेश पापडकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित असली तरी अधिकृत घोषणा मंगळवारी करण्यात येणार आहे.
यवतमाळ जिल्ह्य़ात १७ जूनला नगराध्यक्षांची निवडणूक होणार आहे. पैकी यवतमाळ, घाटंजी आणि दिग्रसच्या नगराध्यक्षपदासाठी एक-एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने येथील अध्यक्षाची निवड बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यवतमाळात भाजप समर्थित निर्मला हातगंडे, घाटंजीत सेनेच्या वत्सला धुर्वे तर दिग्रस येथे श्याम पाटील यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध वर्णी लागली आहे. उमरखेड, पुसद, वणी, दारव्हा नगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठी मात्र चुरस आहे.
चंद्रपूर जिल्ह्य़ातील चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा व मूल या चारही नगरपालिकांच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक १८ जूनला होणार आहे. तर वाशीम जिल्ह्य़ातील कारंजा लाडला १९ जूनला, वाशीमला २० जूनला तर २३ जूनला मंगरूळपीर नगर पालिकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड होणार आहे.
बुलढाणा जिल्ह्य़ातील बुलढाणा, खामगाव, शेगाव, चिखली, मेहकर, जळगाव, जामोद, देऊळगावराजा, मलकापूर व नांदुरा या ९ नगरपालिकांच्या अध्यक्ष- उपाध्यक्ष पदाची निवडणूक २० जूनला होणार आहे. उद्या होणाऱ्या निवडणुकीसाठी तीर्थाटनाला गेलेले नगरसेवक थेट सभागृहातच दाखल होणार असून इतर ठिकाणच्या नगरसेवकांचे ‘भारत भ्रमण’ मात्र सुरूच आहे.