Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पाटणसावंगीच्या लाहोरी बारवर छापा; बारा जोडप्यांना अटक
नागपूर, १५ जून / प्रतिनिधी

 

सावनेरपासून बारा किलोमीटर अंतरावरील पाटणसावंगीच्या लाहोरी बारमध्ये पोलिसांनी रविवारी रात्री छापा मारून अश्लील चाळे करणाऱ्या बारा प्रेमीयुगलांना पकडले.
शहरातील प्रेमी युगलांची शहराजवळील अनेक हॉटेल्समध्ये प्रेमाचे चाळे करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ग्रामीण पोलीस अधीक्षक छगन वाकडे यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत याबाबत तीव्र नापसंती व्यक्त करून कारवाईचे आदेश दिले होते. पाटणसावंगीच्या लाहोरी डिलक्स बार अँड रेस्टॉरेंटमध्ये पोलिसांनी पाळत ठेवली. खात्री पटताच उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण भादीकर, सावनेरचे ठाणेदार आणि प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रविवारी रात्री अचानक तेथे छापा मारला.
आमच्या सावनेरच्या वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना पाहताच हॉटेलमध्ये धावाधाव झाली. तरुण- तरुणी तोंड लपवून पळून जाऊ लागले. मात्र, पोलिसांनी गराडा घातल्याने कुणीच पळून जाऊ शकले नाही. बारा प्रेमी युगलांना पकडून सावनेर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांचा छापा पडल्याचे वृत्त ग्रामीण भागात पसरायला वेळ लागला नाही. पाटणसावंगी तसेच सावनेरमध्ये मध्यरात्रीही त्यांना बघ्यांची गर्दी झाली. मुंबई पोलीस कायद्यान्वये प्रेमी युगलांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे हॉटेल चालकांचेही धाबे दणाणले आहेत.