Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘मंदी व पर्यावरणवाद्यांच्या विरोधाचा खाण उद्योगावर परिणाम’
नागपूर, १५ जून/प्रतिनिधी

 

सध्या अर्थव्यवस्थेवर असलेले मंदीचे सावट आणि पर्यावरणवादी संस्थांकडून होणारा विरोध हे भारतीय खाण उद्योगाच्या विकासातील प्रमुख अडथळे असल्याने सध्या एकूणच व्यवसायावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादन क्षमता, खनिजांच्या किमती आणि निर्यात व्यवसायावरही याचा विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे या उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारने काही सकारात्मक पावले उचलण्याची गरज असल्याचे आवाहन इंडियन ब्युरो ऑफ माईन्सचे खनिज अर्थतज्ज्ञ प्रा.के.के. चॅटर्जी यांनी केले.
इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअर्स आणि भारतीय खाण ब्यूरो यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय खनिज क्षेत्राच्या विकासाची गरज विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. गेल्या काही दिवसात खनिज आणि त्यावर आधारित उत्पादनांच्या किमती मोठय़ा प्रमाणात खाली आल्या आहेत. ज्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. सुरुवातीला मंदीचा खनिज क्षेत्रातील निर्यात कमी होण्यावर परिणाम झाला. मात्र, स्थानिक बाजारपेठेतील व्यवसायावर याचा विशेष परिणाम झाल्याचे दिसून येत नसल्याचे चक्रवर्ती यांनी सांगितले.
खनिज उद्योगाला या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी काही उपाययोजना सुचविताना चक्रवर्ती म्हणाले, खनिज उद्योगाची विस्कटलेली घडी पुर्ववत करण्यासाठी यातील गुंतवणूकदारांनी भविष्याचा विचार करून गुंतवणुकीचे नियोजन करावे. सोन्याच्या किमतीत झालेली वाढ ही खनिज उद्योगात गुंतवणूक करण्यासाठी चांगले संकेत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी खनिज उद्योगात गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावे, असे आवाहन चॅटर्जी यांनी केले. केंद्र सरकारने खनिज उद्योगाच्या अडचणी लक्षात घेत काही चांगल्या योजना सादर केल्या आहेत, ज्या गुंतवणूकदारांच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी आहेत. तसेच या नव्या धोरणांमुळे विदेशी गुंतवणूक होण्याचीही मोठी अपेक्षा असल्याचे चॅटर्जी यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला भारतीय खाण ब्युरोचे मुख्य खनिज अर्थतज्ज्ञ आर.एन. मेश्राम, डॉ. सी.एस. सिंघल, एस.व्ही.अली यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.