Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

साडेचार लाखांच्या वीजचोऱ्या पकडल्या ; शहर वीज भरारी पथकाची धडक मोहीम
नागपूर, १५ जून / प्रतिनिधी

 

वीज महावितरण कंपनीच्या शहर भरारी पथकाने आजपासून वीजचोरांविरुद्ध धडक मोहिमेला प्रारंभ केला असून पहिल्याच दिवशी सुमारे साडेचार लाख रुपयांच्या वीजचोऱ्या पकडल्या आहेत.
भरारी पथकाने गांधीबाग, सिव्हिल लाईन्स, महाल आणि काँग्रेसनगर या चारही विभागांमध्ये धडक मोहीम राबवून १८४ मीटरची तपासणी करून एकूण ८४ वीजचोऱ्या पकडल्या. पोलिसांचा सहभाग असलेल्या ८६ कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. गांधीबाग विभागात सर्वाधिक ३३ वीजचोऱ्यांच्या प्रकरणात २ लाख ७ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. सिव्हिल लाईन्स विभागातील नवी वस्ती, टेका नाका, हबीबनगर, सिद्धार्थनगर, बारसे घाट या वस्त्यांमध्ये १६ वीजचोऱ्या पकडून ७८ हजार रुपये, महाल विभागात वीजचोरीच्या ३० प्रकरणांमध्ये ९० हजार, काँग्रेसनगर विभागातील तकिया व धंतोली येथे ५ प्रकरणात ६१ हजार रुपये अशा सुमारे साडेचार लाखांच्या वीजचोऱ्या पकडण्यात आल्या. वीज महावितरणचे कार्यकारी संचालक अनिल खापर्डे, मुख्य शहर अभियंता डी.एस. तलवारे यांच्या नेतृत्वाखाली शहराचे अधीक्षक अभियंता एम.एस केळे, सिव्हिल लाईन्स विभागाचे कार्यकारी अभियंता एस.आर. गंदेवार, महाल विभागाचे कार्यकारी अभियंता पी.एस. दानोलीकर, गांधीबाग विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.बी. निचळे यांच्यासह वीज महावितरणचे कर्मचारी आणि पोलीस अशी ८६ जणांच्या पथकाने आज दिवसभर ही मोहीम राबविली. महावितरणच्या या धडक मोहिमेमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.