Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पत्रकार आणि लेखकांसाठी ठाणेदार फाऊंडेशनची शिष्यवृत्ती
नागूपर, १५ जून/ प्रतिनिधी

 

भारतातल्या बदलत्या समाजचित्राचा अभ्यास करण्यासाठी संशोधनाच्या वाटेने जाऊ इच्छिणाऱ्या मराठी लेखकांना दरवर्षी सुमारे पाच लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्याची योजना अमेरिकेतील ‘ठाणेदार फाऊंडेशन’ने आखली आहे. ख्यातनाम उद्योजक आणि फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांनी आज मुंबईत ही घोषणा केली. आर्थिक औद्योगिक आघाडय़ांवरील वेगवान बदलांना सामोऱ्या जाणाऱ्या समाजाची वीण बदलत राहते. व्यक्तिगत आणि कौटुंबिक स्तरांवरही वेगाने स्थित्यंतरे घडतात. आर्थिक उदारीकरणानंतरच्या भारतात ही प्रक्रिया नव्या टप्प्यात पोहोचली आहे. या बदलांनी निर्माण केलेल्या नव्या संधी, उभी केलेली आव्हाने आणि प्रश्न यांच्या अभ्यासासाठी मराठी लेखकांना, पत्रकारांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी ही योजना आखण्यात आल्याचे डॉ. ठाणेदार म्हणाले. मराठी साहित्य व्यवहाराचा आर्थिक आवाका एकूणच मर्यादित आहे. एखाद्या सामाजिक, सांस्कृतिक विषयाचा सखोल अभ्यास, त्यासाठी प्रवास करू इच्छिणाऱ्या लेखकांपुढे आर्थिक मर्यादांचा अडसर उभा असतो. ही कोंडी फोडून अभ्यासू लेखकांना पाठबळ पुरवावे आणि मराठी साहित्यातील सामाजिक- संशोधनात्मक लेखनाची परंपरा बळकट करावी, असा उद्देश या योजनेमागे आहे.
पुढील महिन्यात अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे होणाऱ्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाचे प्रायोजकत्व ठाणेदार फाऊंडेशनने स्वीकारले आहे. मराठी संस्कृती-साहित्य आणि कला जागतिक व्यासपीठावर नेणाऱ्या अशा उपक्रमांना यापुढेही सक्रिय प्रोत्साहन देण्याची फाऊंडेशनची योजना असल्याचे डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांनी सांगितले. मराठी लेखकांना संशोधन प्रकल्पासाठी आर्थिक पाठबळ देणारी ठाणेदार फाऊंडेशनची पहिली वार्षिक शिष्यवृत्ती या वर्षअखेरीस जाहीर होईल. या शिष्यवृत्तीसाठी लेखक पत्रकारांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव १५ ऑगस्टपर्यंत पाठवायचे आहेत. या शिष्यवृत्ती योजनेची अधिक माहिती आणि प्रस्तावाचा विहित नमुना मागवण्यासाठी पुरेशी तिकिटे लावलेला लिफाफा ‘दत्ता सराफ, ए-७, ज्युबिली पार्क, भोसला मिलिटरी कंपाऊंड, नासिक-४२२००५’ या पत्त्यावर पाठवावा. या प्रस्तावांच्या छाननीनंतर मान्यवरांची निवड समिती पात्र उमेदवारांची निवड करेल. ठाणेदार फाऊंडेशनच्या या योजनेसंबंधीची अधिक माहिती www.thanedar.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.