Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

जकात चुकविल्याचा महापालिकेचा आरोप ‘एसीसी’ने फेटाळला
नागपूर,१५ जून/ प्रतिनिधी

 

जकात कर चुकविल्याचा महापालिकेचा आरोप एसीसी सिमेन्टने फेटाळला असून कंपनीवर आकारण्यात आलेला दंडही बेकायदेशीर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. नागपूर येथे आतापर्यंत आलेल्या सर्व सिमेन्टवरील जकात नियमाप्रमाणे जमा करण्यात आल्याचेही कंपनीतर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष प्रवीण भीसीकर आणि जकात विभगाच्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जकात चुकविल्याबद्दल एसीसी सिमेन्ट कंपनीला ७१ हजार रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती दिली होती. ही कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कारही भीसीकर यांनी त्यांच्या कक्षात केला होता. यासंदर्भात आज एसीसी सिमेन्ट कंपनीतर्फे पत्रक प्रसिद्धीला देण्यात आले आहे, त्यात कंपनीतर्फे कधीही जकात चुकवण्यात आली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. केवळ किरकोळ रक्कमेवरून महापालिकेशी वाद होता, जकात विभागाने जो फरक निदर्शनास आणून दिला तो मुल्यवर्धित करासंदर्भात होता. तो नाक्यावर सादर करण्यात आलेल्या कागदपत्रात नमूद करण्यात आला नव्हता.
जकाततील फरकाचे जे मुल्यमापन केले गेले ते ६.८ लाख रुपयांचे आहे. कंपनीही रक्कम देण्यास तयार आहे, पण जकात विभागाने चुकीच्या पद्धतीने फरकाच्या मुल्यांवर दहापट दंड आकारला, त्यामुळेच दंडाची रक्कम ७१ लाखावर गेली, ही रक्कम अवाजवी असून नियमाला अनुसरुन नाही, जकात विभागाच्या नियमानुसार जकात नाक्यावर करचोरी सिद्ध झाली तरच जप्त केलेल्या मालाच्या रक्कमेच्या दहापट दंड आकारण्यात येतो, या प्रकरणात आकारण्यात आलेला दंड हा गेल्या काही काळापासूनच्या थकित फरकावर आहे.
याशिवाय फरकाची रक्कम ही करचोरीच्या १२.५ टक्यापेक्षा अधिक असेल तर दहापट दंड आकारण्यात येतो. या प्रकरणात फरकाची रक्कम ही १२.५ टक्क्क्यापेक्षा अधिक नाही, असा असा दावाही कंपनीतर्फे करण्यात आला आहे. जकात वाचविण्यासाठी सिमेन्टची किंमत कमी दाखविल्याचा महापालिका प्रशासनाच्या आरोपाचाही कंपनीतर्फे इन्कार करण्यात आला आहे.
महापालिकेतर्फे आकारण्यात आलेला दंड बेकायदेशीर असल्याने याविरोधात राज्यशासनाकडे दाद मागणार असल्याचे एसीसीचे कार्पोरेट कम्युनिकेशनन्सचे प्रमुख आर. नंदकुमार यांनी कळवले आहे.