Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

संघ कार्यालयामागील ट्रान्सफॉर्मरला आग
नागपूर, १५ जून/ प्रतिनिधी

 

महालातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाच्या मागे असलेल्या ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीने परिसरात खळबळ उडाली असून अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेने आग नियंत्रणात आणल्यामुळे या भागात मोठी घटना टळली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाच्या चारही बाजूनी कडेकोट बंदोबस्त असल्यामुळे जागोजागी पोलीस कैनात आहेत. दुपारी साडेचार वाजता कार्यालयाच्या मागे असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधून आगीचे लोट दिसू लागताच त्या परिसरात सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनी कार्यालयात उपस्थित असलेल्यांना सूचना दिली. लगेच अग्निशामक विभागाला सूचना देण्यात आली. सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला पण आगीने रौद्र रुप धारण केले होते. बडकस चौकातून आगीच लोळ व धूर दिसू लागला.
परिसरात आगीची बातमी पसरताच अनेक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक विभागाच्या दोन गाडय़ा घटनास्थळी पोहोचल्यावर कर्मचाऱ्यांनी वीस मिनिटात आग नियंत्रणात आणली. ज्या ठिकाणी ट्रान्सफार्मर होता, त्याला लागून संघाचा भांडार विभाग आहे. बाजूलाच गोदाम आणि व्यायामशाळा आहे. अग्निशामक विभागाच्या गाडय़ा वेळेवर पोहोचल्या नसत्या तर मोठी घटना घडली असती, अशी चर्चा परिसरात होती. ट्रान्सफार्मर पूर्ण जळाल्यामुळे कार्यालय परिसरातील वीज पुरवठा पाच तास बंद करण्यात आला होता. ल्ल