Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

केडगावला भुयारी मार्गाचा प्रस्ताव
नगर, १५ जून/प्रतिनिधी

नगर-पुणे रस्त्यावर केडगाव येथे भुयारी मार्ग करण्याचा प्रस्ताव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबईत बांधकाम विभागाच्या सचिवांकडे पाठवला असून, याबाबत लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा आहे. नगर-पुणे रस्ता चारपदरी झाला आहे. केडगाव हद्दीत येणाऱ्या या रस्त्याचा काही भाग गर्दीचा आहे. त्यामुळे येथे भुयारी मार्ग करण्याची गरज होती. माजी महापौर संदीप कोतकर त्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळे बांधकाम विभागाने आता याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे.

आरोपींकडून सव्वाचार लाखांचे सोने जप्त
डॉ. कवडे गोळीबारप्रकरण
श्रीरामपूर, १५ जून/प्रतिनिधी
सुपारी घेऊन डॉ. प्रमोद कवडे यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींनी सुभाष नन्नवरे याच्या कार्यालयावर दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार केला होता, असे तपासात निष्पन्न झाले. तसेच आरोपींनी धूमस्टाईल मंगळसूत्राच्या दहा चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून सव्वाचार लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले.

बेशिस्त रिक्षांवरील कारवाईमुळे रस्ते घेऊ लागले मोकळा श्वास!
नगर, १५ जून/प्रतिनिधी

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) व शहर वाहतूक शाखेने बेकायदा रिक्षांच्या विरोधात सुरू केलेल्या कारवाईमुळे शहरातील रस्ते मोकळा श्वास घेऊ लागले आहेत. गेल्या ४ दिवसांत १०० रिक्षांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईमुळे रिक्षाचालक-मालकांचे धाबे दणाणले आहे. पांढऱ्या रंगाची अँबेसिडर, एसआरपी व्हॅन आदी लवाजम्यासह हे पथक कारवाईला निघते. शहरातील प्रमुख रस्ते, बसस्थानक, तसेच प्रमुख चौकांत अनधिकृत रिक्षाअड्डय़ांवर हा ताफा येऊन धडकतो.

पाहिजे रक्त गटाचे!
श्रीगोंद्यातील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांने सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून काष्टीला रक्तदान शिबिर आयोजित केले होते. शिबिरार्थींना रक्तदानाचे महत्त्व विशद करण्यात आले. रक्तगट, रक्तातील विविध घटक, रक्त साठविण्याच्या व गोळा करण्याच्या पद्धती याबद्दल डॉक्टरांनी माहिती सांगितली. अखेरच्या टप्प्यात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. रक्तगट प्रमाणपत्रावर नमूद करण्यात आले होते. प्रमाणपत्र हातात पडताच विद्यार्थी उत्सुकतेने आपला रक्तगट क ोणता हे पाहत होते.

शिर्डीत नगराध्यक्षपदासाठी थोरात यांचाच एकमेव अर्ज
आज निवड घोषित होणार
राहाता, १५ जून/वार्ताहर
शिर्डी नगरपंचायतीच्या १९ जून रोजी होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी सत्ताधारी विखे गटाकडून जयश्री विष्णू थोरात यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. विरोधी गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याने शिर्डीच्या नगराध्यक्षपदी थोरात यांची बिनविरोध निवड झाल्यात जमा आहे.

समितीबाह्य़ हस्तक्षेप!
गेल्या आठवडय़ात झालेल्या स्थायी समितीच्या सभेत दोन विषयांवरून शाब्दिक खडाजंगी रंगली. एक विषय होता समितीबाह्य़ व्यक्तीने सभेस उपस्थित राहून केलेल्या आरोपांचा आणि दुसरा होता खरे-खोटेपणा तपासण्यासाठी समितीबाह्य़ व्यक्तींना सभेत बोलावण्याचा! स्थायी ही घटनात्मक उच्च अधिकार असलेली समिती आहे. सर्वसाधारण सभेखालोखाल स्थायीस अधिकार आहेत. नगर तालुक्यातील देहरे येथील शेतकरी कचरू काळे यांनी त्यांच्या शेतात लागवड केलेल्या बेजोशितल या कंपनीच्या सदोष बियाणामुळे काकडी चवीला कडू व काटेरी निघाली. काळे यांनी याची तक्रार जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे केली होती.

सर्वशिक्षा अभियानांतर्गत यंदा पहिल्याच दिवशी पुस्तकवाटप
वाडेगव्हाण, १५ जून/वार्ताहर
सर्वशिक्षा अभियानांतर्गत चालू शैक्षणिक वर्षांत शाळा सुरू झाल्याबरोबर पहिल्याच दिवशी इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत पुस्तके मिळाली.
पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील संत निळोबाराय विद्यालयात आज पाठय़पुस्तकांचे वाटप करण्यात आले. प्रयत्न शिक्षक संस्थेचे सचिव भास्करराव रासकर, सहसचिव रामराव पवार, मुख्याध्यापक ए. डी. भालेराव, देवीदास रासकर, शिक्षक, पालक या वेळी उपस्थित होते. गतवर्षी क्रमिक पुस्तके ऑगस्ट अखेर प्राप्त झाली होती. यंदा मात्र शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जातीने लक्ष घालून जातीने लक्ष घालून विद्यार्थ्यांची शैक्षणिक कुचंबना थांबविली, असे सांगून त्यांचे रासकर यांनी अभिनंदन केले. सूत्रसंचालन सुनील सोनवणे यांनी केले. दिलीप शिर्के यांनी आभार मानले.

मनसेच्या १०० कार्यकर्त्यांचा मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प
संगमनेर, १५ जून/वार्ताहर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेच्या येथील शंभर कार्यकर्त्यांंनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला. नेत्रदानाची इच्छापत्रेही त्यांनी भरून दिली.
राज ठाकरे यांनी स्वतच्या कुटुंबापासून मरणोत्तर नेत्रदान कार्यक्रमाची सुरुवात केली. तो आदर्श समोर ठेवून ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शंभर कार्यकर्त्यांनी नेत्रदानाचा संकल्प केला. मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण इथापे यांनी इच्छापत्रे भरण्याचा शुभारंभ केला. तालुकाध्यक्ष दत्ता जोर्वेकर, शहराध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष पप्पू शेख, संजय मंडलिक, विनायक गाडेकर यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

संजय काळे यांचे कोपरगावला आंदोलन
कोपरगाव, १५ जून/वार्ताहर
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येची सुपारी देणाऱ्यावर कारवाई व्हावी म्हणून सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन केले. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पाठवलेल्या निवेदनात त्यांनी समाजसेवक हजारेंनी सर्वसामान्यांना माहितीच्या अधिकार प्रदान करून लोकशाही मजबूत केली. त्यामुळे त्यांच्या हत्येची सुपारी देण्याऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी काळे यांनी केली.

चिचोंडी पाटीलला दूषित पाणीपुरवठा
नगर, १५ जून/वार्ताहर
तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील जनतेला अस्वच्छ पाण्याची समस्या भेडसावत आहे. दूषित पाण्यामुळे अनेकांना आजाराची लक्षणे दिसत आहेत. त्वरित स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात यावा; अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलनाचा इशारा पक्षाचे नगर तालुका अध्यक्ष बबन शेळके यांनी दिला आहे. चिचोंडी पाटील येथे पिण्याच्या पाण्यासाठी नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. मात्र, गावात येणारे पाणी दूषित आहे. येथील आरोग्य केंद्राचेही याकडे लक्ष नाही. पंचायत समिती प्रशासनाने या प्रश्नी लक्ष घालावे व स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश ग्रामपंचायतीस द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवासी नायब तहसीलदार कोल्हे राहात्यात रुजू
राहाता, १५ जून/वार्ताहर

येथील तहसील कार्यालयात टी. जी. कोल्हे यांची निवासी नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी नुकतीच आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. निवासी नायब तहसीलदार दत्ता शेजूळ यांचा तहसील कार्यालयात तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची राहुरी तहसील कार्यालयात महसूल नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या जागेवर श्रीरामपूर प्रांत कार्यालयाचे शिरस्तेदार टी. जी. कोल्हे यांची पदोन्नती होऊन निवासी नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली. कोल्हे यांनी तलाठी म्हणून महसूल सेवेत कारकीर्द सुरू केली. महसूल विभागातील कामकाजाचा त्यांना दांडगा अनुभव आहे.

नगराध्यक्षपदासाठी राहुरीत डॉ. तनपुरे, माळी यांचे अर्ज
राहुरी, १५ जून/वार्ताहर
नगराध्यक्षपदासाठी जनसेवा आघाडीतर्फे माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे, तर शहर विकास आघाडीतर्फे आशा माळी यांनी अर्ज दाखल केले. नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव आहे. या पदासाठी अर्ज दाखल करायच्या अखेरच्या दिवशी दुपारी १२ ते १दरम्यान दोन्ही गटांनी अर्ज दाखल केले. डॉ. तनपुरे यांच्या नावाची सूचना विद्यमान नगराध्यक्ष अनिल कासार, तसेच महिला बालकल्याण मंडळाच्या सभापती शीतल राऊत यांनी, तर अनुमोदन माजी नगराध्यक्ष प्रभाकर कोळपकर व द्वारकाबाई सरोदे यांनी दिले. शहर विकास आघाडीतर्फे माळी यांच्या नावाची सूचना डॉ. धनंजय मेहेत्रे, अनुमोदन रावसाहेब (चाचा) तनपुरे व विजयकुमार डौले यांनी दिले. दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज निवडणूक अधिकारी पी. आर. गाडे व सहायक अधिकारी रवींद्र जाधव यांच्याकडे सादर केले. दोन्ही गटांच्या नगरसेवकांच्या स्वतंत्र बैठका होऊन उमेदवार निश्चित करण्यात आले. जनसेवा मंडळाची बैठक प्रसाद तनपुरे व सभापती अरुण तनपुरे यांच्या उपस्थितीत झाली.

अंजली तांबे यांचे चार,बेबी शेख यांचे दोन अर्ज
संगमनेर, १५ जून/वार्ताहर
पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी सत्ताधारी काँग्रेसच्या विद्यमान नगराध्यक्ष अंजली तांबे, तर विरोधी शहर विकास आघाडीच्या वतीने बेबी हाजी शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
अडीच वर्षांपूर्वी झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने बहुमत मिळविले होते. नगराध्यक्षपद सर्वसाधारण जागेसाठी खुले झाल्यानंतर अंजली तांबे यांची वर्णी लागली. त्यानंतर पुढच्या अडीच वर्षांसाठी निघालेल्या सोडतीत नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव निघाले. त्यामुळे श्रीमती तांबे यांच्यासाठी दुग्धशर्करा योग आला.१५० वर्षे पूर्ण करीत असलेल्या पालिकेचे अध्यक्षपद सलग पाच वर्षे भूषविण्याचा मान श्रीमती तांबे यांना मिळणार आहे. तांबे यांनी आज स्वतंत्र चार अर्ज दाखल केले, तर शेख यांनी दोन अर्ज दाखल केले. दि. १९ रोजी होणारी निवडप्रक्रिया अंजली तांबे यांच्यासाठी केवळ औपचारिकता ठरणार आहे. मात्र, त्यानंतर होणाऱ्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत वाद संभवतो.

मालमोटारीखाली सापडून मोटरसायकलस्वार ठार
नगर, १५ जून/प्रतिनिधी
मालमोटारीखाली सापडून मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला. हा अपघात नगर-मनमाड रस्त्यावरील विळद शिवारात आज सकाळी साडेअकराच्या सुमारास झाला. दीपक मनोहर वंजारे (२९ वर्षे, रा. श्रीरामपूर, वॉर्ड दोन, शिंदे मळा) असे मृताचे नाव आहे. दीपकच्या बरोबर असलेला त्याचा मावसभाऊ अनिल दत्तात्रेय घोटकर (रा. श्रीरामपूर) यांनी फिर्याद दिली. दीपक व अनिल मोटरसायकलवरून श्रीरामपूरला जात होते. विळद घाटातील जोधपूर धाब्यानजीक मालमोटारीस ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या प्रयत्नात दीपक यांचा तोल जाऊन ते मालमोटारीखाली सापडून ठार झाले, तर अनिल जखमी झाले. एमआयडीसी पोलिसांनी मालमोटारचालक एन. विजय नागराज (रा. कृष्णगिरी, तामिळनाडू) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास हवालदार जावळे करीत आहेत.

अभियंता दगडे यांना विशेष पुरस्कार प्रदान
नगर, १५ जून/प्रतिनिधी
अभियंता अजय दगडे यांनी बांधलेल्या इको-फ्रेंडली वास्तूला आर्किटेक्टस्, इंजिनिअर्स अ‍ॅण्ड सव्‍‌र्हेअर्स संघटनेतर्फे विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रमोहन हंगेकर यांच्या हस्ते त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दिनेश चंद्रात्रे, महापालिका आयुक्त कल्याण केळकर आदी या वेळी उपस्थित होते. दगडे यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी बांधलेल्या श्री. बिदे यांच्या बंगल्यात नैसर्गिक गोष्टींचा वापर करून घरातील तापमान बाराही महिने आल्हाददायक राहील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

‘इंडस वर्ल्ड स्कूलमुळे नगरला शैक्षणिकदृष्टय़ा नवा चेहरा’
नगर, १५ जून/प्रतिनिधी

इंडस वर्ल्ड स्कूलसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे नगर शहराला शैक्षणिकदृष्टय़ा नवा चेहरा मिळेल, असा विश्वास स्कूलचे उपाध्यक्ष प्रा. आदित्य लोहाना यांनी येथे व्यक्त केला.
शाळेच्या पहिल्या शैक्षणिक वर्षांचा प्रारंभ प्रा. लोहाना यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. संचालक विनायक देशमुख, संचालिका छाया कर्डिले, प्राचार्य प्रगती कपूर, नेहा सिंग आदी या वेळी उपस्थित होते. प्रास्ताविकात देशमुख यांनी सांगितले की, इंडस स्कूलच्या रुपाने शहरात उच्च दर्जाचे शिक्षण देणारी संस्था स्थापन झाली आहे. प्रशस्त वर्ग, लॉन, अ‍ॅम्फीथिएटर, संगणक लॅब, लायब्ररी आदी सुविधांमुळे येथील शिक्षण आनंददायी होणार आहे. नर्सरी ते इयत्ता ६वीपर्यंतचे सीबीएसई पॅटर्नप्रमाणे चालणारे वर्ग या शाळेत आहेत. दरेवाडी-नारायणडोहो रस्त्यावर शहरापासून ६ एकर क्षेत्रावर २२ हजार चौरस फुट आकाराची भव्य इमारत उभारण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुकांनी संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती कर्डिले यांनी केले.