Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

मेडिकलच्या १५० कोटी रुपयांसाठी सुधारित प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश
नागपूर, १५ जून/ प्रतिनिधी

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आधुनिकीकरणासाठी १५० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे शपथपत्र केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केले आहे. यासाठीचा सुधारित प्रस्ताव ताबडतोब केंद्राला पाठवावा, असे निर्देश खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत १२० कोटी मिळायला हवे होते.

मृगाचा पहिला आठवडा कोरडाच!
नागपूर, १५ जून / प्रतिनिधी

मृग नक्षत्र लागून आठवडा उलटला तरी पाऊस नसल्याने मोठे संकट उभे झाले असून पाण्यासाठी सारी जीवसृष्टी तडफडत आहे. पाऊस सतत हुलकावणी देत असल्याने उन्हाळाभर पाणीटंचाईला तोंड देणारे ग्रामस्थ रडकुंडीला आले आहेत. आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांची अवस्था सर्वात बिकट झाली आहे. मध्यंतरी विदर्भाच्या काही भागात गारपीटीसह पाऊस झाला. त्यानंतर अनेक दिवस सायंकाळी पावसाची एखादी सर येत होती.

नगराध्यक्षपदाच्या मुदतीचा वाद; कायद्यातील दुरुस्तीला आव्हान
हाय कोर्टाची महाधिवक्त्यांना दाखलपूर्व नोटीस
नागपूर, १५ जून/ प्रतिनिधी
नगराध्यक्षपदाची मुदत कमी करण्याचा निर्णय पूर्वीच्या नगराध्यक्षांनाही लागू करण्याच्या कायद्यातील दुरुस्तीला वर्धेच्या नगराध्यक्षांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले असून, खंडपीठाने याप्रकरणी राज्याच्या महाधिवक्तयांच्या नावे दाखलपूर्व नोटीस जारी करण्याचा आदेश दिला आहे. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक शहरे कायद्याच्या कलम ५२ मधील तरतुदीनुसार, नगराध्यक्षपदाची मुदत पूर्वी पाच वर्षे होती.

आता ग्रामीण पोलिसांची छापामार कारवाई
ती ‘रेव्ह पार्टी’ नव्हतीच!
नागपूर, १५ जून / प्रतिनिधी
िहगणाजवळील घोटी येथील एका फार्म हाऊसवर शनिवारी मध्यरात्रीनंतर घातलेल्या छाप्यानंतर ग्रामीण पोलिसांचे डोळे उघडले असून पोलिसांनी आता छापामार कारवाई सुरू केली आहे. मात्र, त्या फार्म हाऊसवर ‘रेव्ह पार्टी’सारखे काहीही आढळले नसल्याचे हिंगणा पोलिसांनी सांगितले.

भाज्याही महागल्या..
नागपूर, १५ जून/प्रतिनिधी

जून महिन्याचा पंधरवडा संपूनही अजूनही पावसाला सुरूवात न झाल्याने वातावरणावर याचा मोठय़ा प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. पावसाअभावी बाजारात भाज्यांची आवक कमी झाल्याने सध्या भाज्यांच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. त्यातच वातावरणात अजूनही उकाडा कायम असल्याने ज्या काही प्रमाणात भाज्या येत आहेत, त्याही खराब होत असल्याने व्यापाऱ्यांनाही मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे भाजी उत्पादन करणाऱ्या शेतक ऱ्यांसह व्यापारीही पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत.

शहरातील अनेक वस्त्या पाण्यापासून वंचित
नागपूर,१५ जून/ प्रतिनिधी

एकीकडे मान्सूनचे आमगन लांबले असताना दुसरीकडे शहरातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. उत्तर, पूर्व आणि पश्चिम नागपुरातील अनेक वस्त्यांना गेल्या काही दिवसांपासून पाणी मिळत नसल्याने नागरिक संतापले आहेत. नागपूर शहराला पेंच प्रकल्पातून १४० एमएलडी, पेंच टप्पा दोन मधून १४२ एम.एल.डी, पेंच टप्पा तीन मधून ११८ एमएलडी, जुना गोरेवाडा येथून १६ एमएलडी, कन्हान येथून १२६ एमएलडी असा एकूण ५४२ एम.एल.डी. पाणी पुरवठा होत आहे. पुरवठा होत असलेल्या पाण्यापेक्षा शहराची पाण्याची गरज कमी असतानाही पाण्याच्या चोरीमुळे शहारील बहुतांश वस्त्या तहानलेल्या आहेत.

आत्राम यांच्याकडून केवळ कराराचा भंग
बांबू-तोड प्रकरण
नागपूर, १५ जून/ प्रतिनिधी
माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी जंगलातील बांबू तोडून कराराचा भंग केला असला, तरी वनकायद्यानुसार कुठलाही गुन्हा केला नाही, असे शपथपत्र राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिले आहे. धर्मरावबाबा आत्राम यांनी बांबू उत्पादनांच्या विक्रीसाठी एक कंपनी स्थापन केली. गडचिरोली भागातील जंगलातील बांबू तोडून त्यांचे वेगवेगळे उत्पादन तयार करायचे आणि वापरायचे यासाठी त्यांनी वनविभागासोबत करार केला होता.

रेशन दुकानातील ‘गोडवा’ हरवला
नितीन तोटेवार
नागपूर, १५ जून

स्वस्त धान्य दुकानातून तीन रुपये किलो भावाने तांदूळ आणि गहू देण्याच्या दिशेने सरकारची वाटचाल सुरू असली तरी, मे मध्ये पूर्व विदर्भातील रेशन कार्डधारकांना मात्र साखरेपासून वंचित रहावे लागले. जूनमध्येही अशीच स्थिती राहण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. साखर कारखाने आणि लेव्ही साखरेच्या परवानाधारकांच्या (नॉमिनी) दुर्लक्षामुळे ही स्थिती उद्भवली. अशा परवानाधारकांवर नोटीसेस बजावण्यात आल्या असून साखर कारखानेदेखील बदलवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

विकासासाठी झटणारा तरुण लोकप्रतिनिधी
सुरेश सरोदे

गडचिरोली जिल्ह्य़ातील आरमोरी विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या उमेदवारासाठी राखीव असून या मतदारसंघात आरमोरी, देसाईगंज (वडसा), कुरखेडा व कोरची या तालुक्यांसह धानोरा तालुक्यातील मुरुमगाव महसूल मंडळाचा समावेश आहे.या मतदारसंघाचे नेतृत्व आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी चळवळीत सक्रिय राहून, त्यांच्या समस्यांना वाचा फोडून राजकारणात उडी घेतलेले आनंदराव गेडाम करीत आहेत. आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात राहून शिक्षण घेत असताना आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांचे नेतृत्वगुण, संघटन कौशल्य विकसित झाले. त्यानंतर जिल्ह्य़ाचे ज्येष्ठ काँग्रेस नेते, सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांना राजकीय गुरू मानून त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

स्वराधिराज
कलावंत केवळ कलावंतच असतो!

नागपूरच्या काही कलावंतांनी सादर केलेल्या ‘स्वराधिराज’ या कार्यक्रमाचे जे समीक्षण ‘लोकसत्ता’त प्रकाशित झाले त्याविषयी नाराजी व्यक्त करणारी प्रतिक्रिया आणि त्यावर ‘लोकसत्ता’च्या संगीत समीक्षकाचे उत्तर प्रकाशित करून हा वाद येथेच संपवत आहोत. विनोद वखरे यांची प्रतिक्रिया संपादित आहे; त्यांची भाषा जशास तशी प्रकाशित करणे सुसंस्कृतपणाचे ठरले नसते!

हलबा समाजाच्या समस्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधणार
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मुकुल वासनिक यांचे आश्वासन
नागपूर, १५ जून / प्रतिनिधी
हलबा समाजाच्या समस्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधून या समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मुकुल वासनिक यांनी दिले. हलबा समाजाच्या विविध समस्यांबाबत आदिवासी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुकुल वासनिक यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी समितीचे संयोजक वसंत पारशिवणीकर यांनी मुकुल वासनिक यांचा सत्कार करून अभिनंदन केले.

वेतनश्रेणी लागू करण्यात शासनाची टाळाटाळ
विद्यापीठ शिक्षण मंचचा आरोप
नागपूर, १५ जून/ प्रतिनिधी

केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या वेतनश्रेणीची विद्यापीठ अनुदान आयोगाने शिफारस केल्यानंतही महाराष्ट्र शासन मात्र, विद्यापीठ व महाविद्यालयीन प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ती लागू करण्यात टाळाटाळ व विलंब करीत आहे, असा आरोप विद्यापीठ शिक्षण मंचने केला आहे. हिवाळी अधिवेशनात अशा प्रकारचे आश्वासन शिक्षक मंत्र्यांनी विद्यापीठ शिक्षक मंचाला दिले असतानाही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी महाराष्ट्र शासनावर नाराज आहेत. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावा, अशी मागणी विद्यापीठ शिक्षण मंचाने केली आहे. तसेच हिवाळी अधिवेशनात आश्वासन देऊनही नेट, सेट व एम.फिल. पदवीधारकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. म्हणून प्राध्यापकांशी निगडित सर्व प्रश्नांची सोडवणूक शासनाने लवकरात लवकर करावी, अन्यथा १ जुलैला विद्यापीठ शिक्षण मंच तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.

स्वस्त धान्य दुकाने बचतगटांनाच देण्यास स्थगिती
नागपूर, १५ जून/ प्रतिनिधी

राज्यातील स्वस्त धान्य दुकाने बचतगटांनाच चालवण्यासाठी देणाऱ्या शासकीय आदेशाच्या अंमलबजावणीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. राज्यात यापुढे स्वस्त धान्य दुकाने फक्त स्वयंसहायता बचत गटांनाच दिली जातील, असा आदेश राज्य सरकारने ३ नोव्हेंबर २००७ रोजी काढला होता. हा निर्णय एककल्ली असल्याची तक्रार करून त्याला आव्हान देणाऱ्या २७ याचिका वेगवेगळ्या दुकानदारांनी उच्च न्यायालयात केल्या होत्या. राज्य सरकार फारतर या संदर्भात परिपत्रक काढू शकते, परंतु असा आदेश काढण्याचा सरकारला अधिकारच नसल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. अशी आणखी प्रकरणे सर्वोच्च न्यायालयासमोर आहेत. शिवाय शासनाने नेमलेली वाधवा समिती नव्या दुकानांना परवाने देण्यावर लक्ष ठेवून आहे, याचा त्यांनी उल्लेख केला होता.न्या. सिन्हा व न्या. भंगाळे यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर राज्य सरकारच्या या संदर्भातील आदेशाला स्थगिती दिली. नव्या स्वस्त धान्य दुकानांना परवानगी देण्याबाबतचे धोरण तयार करण्याची परवानगी मागण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावे, असे निर्देश त्यांनी दिले. सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यास राज्य सरकारला नवे धोरण राबवता येईल. मात्र तोपर्यंत सरकारने कोणत्याही नव्या दुकानांना परवाने देऊ नयेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. याप्रकरणी याचिकाकर्त्यांतर्फे फिरदोस मिर्झा व अजय सोमानी, तर सरकारतर्फे नितीन सांबरे व भारती डांगरे या वकिलांनी काम पाहिले.

मोजताना नोटा लांबवण्याचा प्रयत्न; भामटय़ास अटक
नागपूर, १५ जून / प्रतिनिधी
नोटा मोजताना त्या चलाखीने लांबवण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका भामटय़ास धंतोली पोलिसांनी शनिवारी दुपारी एका बँकेत सापळा रचून पकडले. अली राजा गुलाम राजा (रा. हमालपुरा कामठी) हे त्याचे नाव आहे. नोटा मोजून देतो, नोटा फाटलेल्या आहेत, अशी बतावणी करून चलाखीने त्या लांबवल्याच्या घटना शहरात वाढतच आहेत. या आरोपींच्या तपासासाठी धंतोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील, हवालदार संजय ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पंचशील टॉकीजसमोरील आर्य वैश्य बँकेत सापळा रचला. राजेंद्र बघेल व संजय ठाकूर हे दोघे साध्या वेषात होते. त्यांच्याजवळ शंभरांच्या नोटांचे बंडल होते. रोखपालाच्या कॅबिनजवळ ते नोटा मोजत असताना आरोपी अली राजा तेथे आला. नोटा मोजून देतो असे म्हणत त्याने बंडल हातात घेतले. मोजता मोजता त्याने शंभराच्या काही नोटा चलाखीने लांबवल्या. दबा धरून बसलेल्या पोलिसांनी लगेचच त्याला पकडले. त्याच्याजवळील नोटा जप्त करण्यात आल्या.

राज ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात
नागपूर, १५ जून/प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वर्धमान नगरमधील हनुमान मंदिरात बुंदीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मनविसेचे शहर सचिव शशिकांत चमके, शहरप्रवक्ता महेंद्र कठाणे यांच्यातर्फे महाआरती करण्यात आली. याप्रसंगी बगडगंज शाखेजवळ सभासद नोंदणीचा कार्यक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उत्तर नागपूर विभागातर्फे राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाल येथील शिवाजी महाराजांच्या व रिजर्व बँक चौकातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळय़ाला अभिवादन करण्यात आले. यावेळी उत्तर नागपूर विभाग अध्यक्ष संजय फुलझेले, उमेश बोरकर, महेश माने, राजेश हेडाऊ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

पुरोहितांचे ‘एकटा’ आज आकाशवाणीवर
नागपूर, १५ जून/ प्रतिनिधी
नागपूर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी जालंदर पुरोहित लिखित ‘एकटा’ या श्रुतिकेचे प्रसारण नागपूर आकाशवाणीवर उद्या, मंगळवारी रात्री १० वाजता सादर केले जाणार आहे.
पुरोहित यांनी आकाशवाणीसाठी विपुल लेखन केले आहे. तसेच विविध वृत्तपत्रांमध्ये स्तंभ लेखन केले आहे. वैचारिक लेखांचा संग्रह ‘दुसरी बाजू’, बालमानसशास्त्रावरची कादंबरी ‘शाळेचे दिवस’ आणि जनसंपर्कावरील पाठय़पुस्तक ‘जनसंपर्क- काळाची गरज’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेचे उद्यापासून प्रशिक्षण शिबीर
नागपूर, १५ जून / प्रतिनिधी
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटना व सांख्यिकी संचालनालयातर्फे १७ ते १९ जूनदरम्यान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. केंद्रीय सरकारी कार्यालय परिसरात हे शिबीर होणार आहे. तरुण पिढीला अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी धोरण आखण्यात येत असून त्यासाठी सरकार रोजगार व बेरोजगारीच्या आकडय़ांचे संग्रहण करणार आहे. कुटुंबांपासून माहिती घेण्याच्या कार्यपद्धतीचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हे शिबीर घेतले जाणार असून या शिबिरात विभागीय व उपविभागीय कार्यालयांचे ७५ कर्मचारी आणि अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे अधिकारी सहभागी होणार आहेत. विभागीय सहसंचालक आर. किरण आणि त्यांची चमू हे प्रशिक्षण देणार आहे. उपमहासंचालक एस.ए. भोयर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार आहे.

कास्ट्राईब शिक्षक संघटनेची सभा
नागपूर, १५ जून/प्रतिनिधी
कास्ट्राईब शिक्षक संघटनेची सभा १३ जूनला धंतोली पार्क येथे पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष देवेंद्र घरडे होते. सभेत वेतन विसंगती, सेवाज्येष्ठता यादीमधील घोळ, सहाव्या वेतन आयोगातील अग्रिम राशीबाबतचे घोळ आदी बाबींवर विस्तृत चर्चा करण्यात आली. मागासवर्गीय शिक्षक कर्मचाऱ्यांवर होणारे अन्याय शिक्षक संघटना खपवून घेणार नाही, असे मत दीपक सातपुते यांनी व्यक्त केले. सभेत विस्तृत कार्यकारिणीबाबत चर्चा करण्यात आली. सभेला कैलाश चांदवे, गुलाब मेश्राम, सुभाष गायकवाड, राजेंद्र पुसेकर, मनोज बारसागडे, योगराज रंगारी आदी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी पुन्हा जाहिरात देणार
नागपूर १५ जून/ प्रतिनिधी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात कुलसचिव पदासाठी झालेल्या मुलाखतीत सहा उमेदवारांपैकी एकाही उमेदवार पात्र न ठरल्याने पुन्हा जाहिरात देऊन हे पद भरले जाणार आहे. त्यामुळे विद्यमान कुलसचिव सुभाष बेलसरे यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. एकूण ११ अर्ज विद्यापीठात दाखल झाले. त्यापैकी २ अर्ज बाद केल्याने ९ उमेदवारांच्या मुलाखती रविवारी घेण्यात येणार होत्या. त्यापैकी ६ उमेदवार हजर असल्याने त्यांच्या मुलाखती ३ वाजता घेण्यात आल्या. उपस्थित उमेदवारांवर निवड समिती सदस्यांचे एकमत न झाल्याने मुलाखती आटोपत्या घेण्यात आल्या. या पदासाठी नव्याने जाहिरात देण्याचा निर्णय घेण्यात आला.

गुणवंतांना आवाहन
नागपूर, १५ जून / प्रतिनिधी

समाजक्रांती (पाक्षिक) व कर्मचारी शिक्षक वेलफेअर असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावीत प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार १९ जुलैला रविवारी आयोजित करण्यात आला आहे. बहुजन समाजातील प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी व पालकांनी पाल्याचे रंगीत छायाचित्र, गुणपत्रिकेची झेरॉक्स ३० जूनपर्यंत पाठवण्याचे आवाहन केले आहे. पाल्यास ७५ टक्क्यांवर गुण असल्यास खालील पत्त्यावर अर्ज करावा. राजू महादेव वंजारी ४७९, नेहरूनगर, तिरंगा चौक, डॉ. राजगिरे हॉस्पिटलच्या बाजूला, नागपूर. ९८२३९९४९७३, ९३७३७१९३७३ किंवा भाऊसाहेब सुपारे, म्हाडा कॉलनी, १४/३, के.डी.के. कॉलेज मेन रोड, नागपूर. (९८२३८१४७६०).

ओबीसी सुशिक्षित बेरोजगारांच्या मागण्यांचे निवेदन गडकरींना सादर
नागपूर, १५ जून/प्रतिनिधी

ओबीसी आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने भाजपा प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांना ओबीसी सुशिक्षित बेरोजगारांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. विधिमंडळ अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ५० टक्क्यांवरून १०० टक्के करण्यासाठी तसेच, इतर मागासवर्ग वित्त व विकास महामंडळाचे भागभांडवल ५० कोटी रुपयांवरून १०० कोटी रुपये करण्याची कसल्याही प्रकारची तरतूद करण्यात आली नसून, ओबीसीच्या अनेक प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्याचे निवेदनातून सांगण्यात आले. ओबीसींवर हा अन्याय असून सरकारच्या या कृतीचा निषेध समितीने केला. यावेळी गडकरी यांनी, एक-दोन दिवसातच विधिमंडळामध्ये ओबीसींच्या प्रश्नावर लक्षवेधी मांडण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष नानाभाऊ उमाठे यांच्यासह समितीचे कोषाध्यक्ष मुरली भोले, नरेश भावळकर, नंदकिशोर अंतुरकर, भाजपा हलबा आघाडीचे भास्कर पराते यांचा समावेश होता.

निवडणुकीच्या कामात व्यस्त शिक्षकांना प्रशिक्षणापासून सवलत
नागपूर,१५ जून/ प्रतिनिधी
निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या शिक्षकांना प्रशिक्षणापासून सवलत देण्यात आल्याचा दावा महाराष्ट्र शिक्षक सेनेने केला आहे. सध्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीत जिल्हाप्रशासन जुंपले आहेत. अनेकशिक्षकांना मतदारयादी तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. काही शिक्षक ओळखपत्र तयार करण्याच्या कामात व्यस्त आहेत. या दरम्यान मंगळवारपासून शिक्षकांच्या प्रशिक्षणास सुरुवात झाली. ते २४ जूनपर्यंत चालणार आहे. निवडणुकीच्या कामात गुंतलेल्या शिक्षकांना या प्रशिक्षणापासून सवलत देण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांच्या संघटनांनी केली होती, ती जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली असून ब्लॉक लेव्हल अधिकारी म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांना या प्रशिक्षणापासून सवलत देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे शिक्षक सेनेचे सुरेश ठाकरे यांनी कळविले आहे.

बी.एड.चा निकाल जाहीर
नागपूर १५ जून/ प्रतिनिधी
नागपूर विद्यापीठाचा बी.एड. आणि अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्सच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि अंतिम सत्राचा निकाल घोषित करण्यात आला आहे.