Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

नवनीत

शब्द आपल्याकडे असलेले संपर्काचे साधन आहे. मात्र शब्द प्रतीक आहेत. शब्दांनी सूचित केलेली वस्तुस्थिती खूप भिन्न असते. त्या अर्थाने, शब्द बापुडे केवळ वारा आहेत. शब्दांच्या तोकडेपणाबद्दल ब्रह्मवेत्ता थॉमस अक्वायनस ‘भाषेचे दारिद्रय़’ असा शब्दप्रयोग करीत असत. येशू देवाचा अवतार होता. देव वाणी, तर तो शब्द होता. देव बिंब, तर तो प्रतिबिंब

 

होता. येशू म्हणजे देवाचा मानवी चेहरा. येशू देवाला पिता (अरेबिक भाषेत अब्बा) या नावाने संबोधित असे. जनक आणि जनित यांच्यातील आत्यंतिक जिव्हाळय़ाचे नाते व्यक्त करणारे ते रूपक होते. येशूचा फिलीप नावाचा शिष्य एकदा त्याला म्हणाला, ‘गुरुजी, आम्हाला पित्याचे दर्शन घडवा. म्हणजे आमच्या जगण्याचे सार्थक होईल.’ येशूने त्याला उत्तर दिले, ‘फिलीप, मी इतका काळ तुमच्याजवळ असूनही तू मला ओळखत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने परमपित्यालाही पाहिले आहे. तर मग ‘आम्हाला पित्याचे दर्शन घडवा’ असे तू कसे म्हणतोस? मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये वास करीत आहे.’ (जॉन १४:८-११) परमेश्वराबरोबर येशूचे अद्वैत स्वरूपाचे नाते होते. येशूची या जगातून निघून जाण्याची वेळ आली. त्यामुळे शिष्य खूप खिन्न झाले. त्यांचे सांत्वन करताना येशू म्हणाला, ‘जो पित्यापासून निघतो त्या कैवारी पवित्र आत्म्याला (Holy Spirit) मी तुमच्याकडे पाठवीन.’ (जॉन १५:२६) आपल्या स्वर्गारोहणावेळी येशूने शिष्यांना आदेश दिला, ‘तुम्ही सर्व राष्ट्रांत संचार करा आणि त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावे बाप्तिस्मा (दीक्षा) द्या. पाहा, युगान्तापर्यंत मी तुमच्याबरोबर आहे.’ पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा असे देवाचे स्वरूप आहे, असे येशूने शिकविले. यावरून ख्रिस्ती धर्मात देवाला त्रक्यस्वरूप (TRINITY) मानले जाते. पिता आपले सर्वस्व पुत्राला बहाल करतो, पित्याने दिलेले सर्व काही पुत्र पुन्हा त्याला परत करतो. ही निरपेक्ष देवाणघेवाण म्हणजे पवित्र आत्मा होय. देव म्हणजे प्रेमाचा त्रिकोणच!
फादर फ्रान्सिस दिब्रिटो
francisd43@gmail.com

नित्योदित व नित्यास्त तारे म्हणजे काय?
आपली पृथ्वी स्वत:भोवती फिरते आहे. पृथ्वीचा स्वत:भोवती फिरण्याचा अक्ष आकाशातल्या ज्या बिंदूकडे रोखला आहे त्या बिंदूला ध्रुवबिंदू म्हणतात. सर्वच तारे हे या ध्रुवबिंदूभोवती फिरताना दिसतात. (ध्रुवतारा हा या ध्रुवबिंदूच्या अगदी जवळ वसला आहे.) ताऱ्यांच्या या ध्रुवबिंदूभोवतालच्या प्रदक्षिणेला पृथ्वीच्या स्वत:भोवतीच्या प्रदक्षिणेइतकाच काळ लागतो. तारा या बिंदूच्या जितका जवळ तितकं या ताऱ्याचं या बिंदूभोवतालच्या प्रदक्षिणेचं वर्तुळ छोटं. ज्या ताऱ्यांच्या ध्रुवबिंदूभोवतालच्या प्रदक्षिणेची वर्तुळं क्षितिजाच्या पूर्णपणे वर असतात, ते तारे सतत क्षितिजाच्या वर राहातात. अशा ताऱ्यांना नित्योदित तारे म्हणतात. आकाशाचा उत्तरेकडचा जेवढा भाग सतत क्षितिजाच्या वर असतो तेवढाच दक्षिणेकडचा भाग हा सतत क्षितिजाखाली असतो. आकाशाच्या या दक्षिणेकडील प्रदेशातील तारे कधीही आपल्याला दर्शन देत नाहीत. त्यांना नित्यास्त तारे म्हटलं जातं. एखाद्या ठिकाणी कोणते तारे हे नित्योदित आहेत वा नित्यास्त आहेत हे त्या ठिकाणच्या अक्षांशांवर अवलंबून असतं. प्रत्येक ठिकाणच्या ध्रुवबिंदूची क्षितिजापासूनची उंची ही त्या जागेच्या अक्षांशाइतकी असते. त्यामुळे विषुववृत्तावर ध्रुवबिंदू हा क्षितिजावरच असतो. इथे क्षितिज आणि ध्रुवबिंदू यातील अंतर शून्य असल्यामुळे विषुववृत्तावरची नित्योदित ताऱ्यांची, तसंच नित्यास्त ताऱ्यांची संख्याही शून्य असते. आपण जसे उत्तरेकडे जाऊ लागतो तसा हा ध्रुवबिंदू वर सरकू लागतो आणि नित्योदित (तसंच दक्षिणेकडील नित्यास्त) ताऱ्यांची संख्याही वाढू लागते. उत्तर ध्रुवावर ध्रुवबिंदू हा डोक्यावर असतो. या ठिकाणी सर्वच आकाश हे क्षितिजाला समांतर अशा वर्तुळातून, डोक्यावर असणाऱ्या या ध्रुवबिंदूभोवती फिरत असते. त्यामुळे या ठिकाणी क्षितिजावरचा प्रत्येक तारा हा नित्योदित असतो आणि क्षितिजाच्या खाली असलेला प्रत्येक तारा हा नित्यास्त असतो.
राजीव चिटणीस
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

१९६० च्या दशकात अमेरिका आणि रशिया यांच्यात अवकाश स्पर्धा सुरू झाली. १९५७ साली रशियाने ‘स्पुटनिक’ अवकाशात सोडून बाजी मारली. लगेच अमेरिकेने ‘व्हॅगार्ड’ अवकाशात सोडला. यानंतर रशियाने युरी गागारिन याला अंतराळात पाठवून चमत्कार घडवला. त्यापाठोपाठ अमेरिकेनेही जॉर्न ग्लेन याला अंतराळात पाठवून बरोबरी साधली. तथापि १६ जून १९६३ रोजी रशियाने व्हॅलेन्टिना तेरेश्लोव्हा या महिलेला अंतराळात पाठवून पुन्हा एकदा बाजी मारली. कारण अंतराळात जाणारी पहिली महिला अशी अंतराळाच्या इतिहासात तिची नोंद झाली. व्होस्टोक-६ या अवकाशयानातून १६ जून १९६३ रोजी व्हॅलेन्टिना ने अंतराळात झेप घेतली. त्यावेळेस तिचे वय होते फक्त २६ वर्षे. त्याआधी दोन दिवस १४ जून १९६३ रोजी व्होस्टोक-५ हे यान रशियाने सोडले होते. ही दोन्ही याने परस्परांपासून पाच किलोमीटरचे अंतर ठेवून पृथ्वी प्रदक्षिणा करीत होते. तेरेश्लोव्हा ४८ पृथ्वी प्रदक्षिणा करून तीन दिवसांनी पृथ्वीवर सुखरूप परतली. मुख्य म्हणजे दोन्ही याने १९ जून १९६३ रोजी सुखरूप पृथ्वीवर आली. तेरेश्लोव्हाने १९६३ च्या सुमारास अंतराळवीर आन्द्रियन निकोलोयेव्हशी विवाह केला.
संजय शा. वझरेकर

सागर आणि त्याचे मित्र फुटबॉल खेळण्यात दंग होते. खेळ चांगलाच रंगात आला होता. सागरचे लक्ष घराबाहेर उभ्या असलेल्या शाळेच्या शिपायाकडे गेले. तो दचकला. शाळेचा शिपाई घरी का बरे आला असावा? त्याचे खेळातले लक्षच उडाले. गल्लीतले मित्र खेळ थांबला म्हणून वैतागले. काय रे सागर? असा खांबासारखा मधेच काय उभा राहिला आहेस? खेळतोस ना? शरद खेकसला, पण त्याचे शब्द सागरच्या कानापर्यंत मुळी पोहोचलेच नाहीत. तो म्हणाला, ‘ए, मला लगेच घरी जायला पाहिजे. तो बघ शाळेचा शिपाई घरी आलाय’ आणि तो धावत सुटला. घरी बाबांना शिपायाने पत्र दिले, सही घेतली आणि तो परत निघाला होता. सागरने त्याला थांबवले, ‘शंकरकाका, अहो कसलं पत्र आहे. माझा रिझल्ट का?’ त्याने धापा टाकत विचारले. ‘माहीत नाही!’ खांदे उडवून शंकर सायकलला पायडल मारत निघून गेला. सागर घराबाहेर थांबला. बाबा मोठय़ाने पत्र वाचत होते. ‘सागर खैरनार याच्यासंदर्भात त्याच्या पालकांनी शाळेत समक्ष येऊन मुख्याध्यापकांना भेटावे.’ सागरच्या डोक्यात थैमान माजले. बापरे! म्हणजे नववीची परीक्षा मी नक्कीच नापास झालो आहे. बाबांना, आईला मुख्याध्यापक बोलावून रागावतील, जाब विचारतील. दुर्लक्ष केले मुलाच्या अभ्यासाकडे म्हणून दूषणे देतील आणि मग बाबा आणि आई आपल्यावर भयंकर संतापतील. नापास झाला म्हणून मित्र कुचेष्टा करतील. सागर विलक्षण घाबरला आणि आल्या पावली परत फिरला. त्याने थेट जयश्री हार्डवेअरचे दुकान गाठले. घरात साठलेली रद्दी विकून यायला सांगितले होते. खिशात ६५ रुपये होते. हार्डवेअरच्या दुकानातून सागर तडक घरी आला. घरातले वातावरण चांगलेच तापलेले असणार. बातमी गल्लीतल्या सगळय़ा मित्रांपर्यंत गेली असणार, असे अंदाज बांधत तो थेट आतल्या खोलीत कुणाशीही न बोलता गेला. त्याची कानशिले तापली होती. डोके भणभणत होते. डोळय़ांतून घळाघळा पाणी वाहत होते. हार्डवेअरच्या दुकानातून आणलेल्या ‘थिनरच्या’ बाटल्या कुठल्यातरी एका सणकीने त्याने भराभरा तोंडात मोकळय़ा केल्या. नाक दाबून पिऊन टाकल्या. त्याचा थोरला भाऊ दत्ता बारावीत शिकत होता. शिकवणीहून तो परत आला आणि वहय़ा ठेवायला आतल्या खोलीत गेला. सागर जमिनीवर वेडावाकडा पसरलेला होता. जीभ बाहेर आली होती. डोळे पांढरे झाले होते. त्याने तोंडावर पालथा हात घेतला. सारे धावत आले. रडारड, आरडाओरडा ऐकून गल्ली जमली. जवळच्या सहय़ाद्री हॉस्पिटलमध्ये आयसीयुत सागरने मृत्यूशी झुंज दिली. तो हळूहळू शुद्धीवर आला. वॉर्डमध्ये त्याच्या शेजारच्या कॉटवरचे पोरेकाका सागरला म्हणाले, ‘बाळा, अरे पुस्तके वाचत जा. तुला कळेल नापास होणे हा आयुष्याचा शेवट नसतो.’ शेजारी बसलेली आई म्हणाली, ‘अहो, नापास कुठे? त्याचे नववीच्या परीक्षेत चांगले मार्क पाहून शाळेने दहावीला त्याच्याकडे लक्ष द्यायचे ठरवले अन् चर्चा करायला आम्हाला पत्र पाठवून बोलावले होते.’
अपयश ही एक घटना असते. अशा घटना आयुष्यात घडतात. जे काही करण्यासाठी धडपडतात त्यांनाच अपयश येऊ शकते. अपयशाने खचून कशाला जायचे? कदाचित आपण ज्याला अपयश समजून बसतो ते यशही असू शकते. आजचा संकल्प- अपयश ही जोमाने पुन्हा प्रयत्न करण्याची मी संधी मानेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com