Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

काँग्रेस आघाडीत पनवेलमध्ये बिघाडी!
पनवेल/प्रतिनिधी

 

निवडणूकपूर्व आघाडी करून सत्तेत आलेल्या पनवेल नगरपालिकेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमध्ये बिघाडी निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या १९ तारखेला होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या अंतर्गत निवडणुकीसाठी विद्यमान नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी काँग्रेसतर्फे, तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुनील मोहोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना आणि भाजप या विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी मोहोड यांना पाठिंबा दिल्याची चर्चा असून प्रत्यक्ष निवडणुकीत या प्रकारे मतदान झाल्यास पनवेलमधील सत्तेची समीकरणे बदलणार आहेत.
अडीच वर्षांंपूर्वी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीने शेकाप- शिवसेना- भाजपचा पराभव करीत सत्ता प्राप्त केली होती. एकूण ३८ नगरसेवकांपैकी काँग्रेसचे १५, राष्ट्रवादी काँग्रेसचे सात, शेतकरी कामगार पक्षाचे नऊ, शिवसेनेचे चार आणि भाजपचे तीन नगरसेवक निवडून आले. काँग्रेस- राष्ट्रवादीची निवडणूकपूर्व युती असल्याने या आघाडीने गेली अडीच वर्षे सत्ता गाजवली. पहिल्या अडीच वर्षांंसाठी नगराध्यक्षपद इतर मागासवर्गीयांसाठी राखीव होते. त्यावेळी काँग्रेसचे प्रशांत ठाकूर निवडून आले होते. उर्वरित अडीच वर्षांंसाठी नगराध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी असून यावेळीही ठाकूर यांना विरोध होणार नाही, असे दिसत होते, परंतु सोमवारी ठाकूर यांच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोहोड यांनी अर्ज भरल्याने चर्चेला उधाण आले. विशेष म्हणजे त्यांच्या अर्जावर शेकापच्या नगरसेवकांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल यावेळी उपस्थित असल्याने राष्ट्रवादीने ही निवडणूक खूपच गांभीर्याने घेतल्याचे दिसत आहे. मंगळवारी दुपारी चार वाजेपर्यंत अर्ज मागे घ्यायची मुदत आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत माघार न घेण्याच्या मन:स्थितीत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. सत्ताप्राप्तीसाठी २० नगरसेवकांचा पाठिंबा आवश्यक असल्याने काँग्रेसला आणखी पाच नगरसेवकांना गळाला लावावे लागणार आहे. मावळ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार रिंगणात असूनही पनवेलमधील प्रचाराची सारी सूत्रे काँग्रेसच्या नेत्यांकडेच होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या आझम पानसरेंचा दारुण पराभव झाल्याने आघाडीत कुरबुर सुरू होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही हा नवा पनवेल पॅटर्न महत्त्वाचा ठरणार आहे. शेकापच्या नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना गाफील ठेवून प्रथमदर्शनी तरी बाजी मारल्याचे चित्र आहे.