Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बंदुकीच्या टोकावर ऐरोली
नवी मुंबई, / प्रतिनिधी

 

ऐरोली सेक्टर दोनमधील एका उद्यानात शिवसेनेचे उपशाखाप्रमुख कृष्णा नाडर यांच्यावर रविवारी सायंकाळी झालेल्या गोळीबारामुळे या परिसरातील गुन्हेगारी चेहरा पुन्हा एकदा पुढे आला असून हे उपनगर कायम बंदुकीच्या टोकावर असते, हेच स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, या भागातील विशी-पंचविशीतील तरुणही परदेशी बनावटीची बंदूके, रिव्ह्ॉल्वर यांसारखी हत्यारे बाळगू लागल्याचे धक्कादायक वास्तव परवाच्या हल्ल्यामुळे पुढे आले आहे. काही गुंड टोळ्यांचा आशीर्वाद लाभलेल्या या तरुण मुलांना अगदी सहजगत्या पिस्तूलांसारखी हत्यारे मिळू लागल्याने चॉपर-गुप्त्यांचे दिवस ऐरोलीतील या नव्या भाईमंडळींसाठी आता जुने झाले आहेत, असे मत वरिष्ठ पोलिस अधिकारीही व्यक्त करू लागले आहेत.
ऐरोली सेक्टर दोनमधील एका उद्यानात सायंकाळच्या सुमारास नाडर या शिवसेनेच्या उपशाखाप्रमुखावर गोळीबार करण्यात आला. नाडर याच्या पोटाच्या डावीकडील बाजूस ही गोळी लागली. त्यांना तातडीने मुलुंड येथील वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने सध्याच्या घडीस नाडर याची प्रकृती स्थिर आहे. असे असले तरी नाडर याच्यावर अत्यंत क्षुल्लक कारणांवरून हल्ला झाल्याचे स्पष्ट झाल्याने टोळक्यांमधील भांडणाने थेट गोळीबारापर्यंत मजल गाठल्याने ऐरोलीतील कायदा-सुव्यवस्थेविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या हल्ल्यात तिशीच्या आत असलेल्या चार तरुणांचा सहभाग असल्याचे सांगितले जाते. यापैकी डोळस तसेच संतोष नावाच्या दोघा तरुणांनी हा हल्ला केला आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.
नाडर हा ऐरोलीतील रूपेश कोटकर या गुडांशी संबंधित आहे. असे असले तरी प्रत्यक्षात टोळीयुद्धाशी थेट त्याचा संबंध आलेला नाही. नाडर याच्यावर हल्ला करणारे युवक गुंड टोळीशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. नाडर व त्याच्यावर हल्ला करणारे तरुण हे एकेकाळी एकमेकांचे चांगले मित्र होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून त्यांचे बिनसले. हा वाद एवढा विकोपाला गेला की थेट नाडर याच्यावर गोळीबार करण्यात आला. व्यक्तिगत हेव्यादाव्यातून ऐरोलीतील विशी-पंचविशीतील तरुण थेट गोळीबारापर्यंतची मजल गाठतात, हे चित्र येथील सर्वसामान्यांना अस्वस्थ करू लागले आहे.
ऐरोलीत गेल्या काही वर्षांत सुजीत सुतार, रूपेश कोटकर, अन्नू आंग्रे, देविदास चौगुले अशा काही गुडांनी तसेच त्यांच्या हस्तकांनी अक्षरश धुमाकूळ घातला आहे. साधारण दीड वर्षांपूर्वी देविदास चौगुले यांची अशाच वैमनस्यातून हत्या झाली. या सर्व गुडांशी संबंधित असलेली पोरं आता गल्लोगल्ली भाई बनून फिरत आहेत. विशेष म्हणजे, या गुंडांचे हस्तक बनून फिरणाऱ्या या पोरांकडे कट्टे, पिस्तूल यासारखी शस्त्रे अगदी राजरोसपणे पहावयास मिळत आहेत. नाडर यांच्यावर काल झालेला हल्ला वरवर पहाता टोळक्यामधील भांडणातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
मात्र गल्लीतील या भांडणाने थेट गोळीबारापर्यंत मजल मारल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पोरांना बंदुकीसारखी शस्त्रे उपलब्ध होतात तरी कुठून, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. ऐरोलीतील एका उद्यानात राजरोसपणे मद्यपान केले जाते, या मद्यपी तरुणांना कुणी साधे हटकतही नाही. त्यात भर उद्यानात हवेत गोळीबार केला जातो, गाडय़ा पेटविल्या जातात. अशा प्रकारामुळे या भागात पोलिसांचा वचक राहिला आहे किंवा नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.