Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पावसाळ्यात समुद्रमार्गे अतिरेकी येण्याची भीती;राज्य गुप्तचर विभागाचे पोलिसांना सतर्कतेचे आदेश

 

उरण/वार्ताहर - पावसाळ्यात कोकण किनारपट्टीवरून समुद्रमार्गे अतिरेकी घुसखोरी करून मोठय़ा शस्त्रसाठय़ासह येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, त्यानुसार किनारपट्टीवरील गावे व पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश राज्य गुप्तचर विभागाने दिले आहेत.२६/११ चे दहशतवादी सागरी मार्गेच आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सागरी सुरक्षा वाढविण्याचे प्रयत्न शासनाकडून झाले होते, मात्र तरीही शासनाकडूनच सागरी सुरक्षिततेबाबत ढिलाई होत आहे. राज्याच्या ७२० किमी सागरी किनारपट्टीवर सुरक्षेच्या दृष्टीने फारशी उपाययोजना करण्यात आलेली दिसून येत नाही. त्यातच पावसाळ्यात किनारपट्टीवर असलेली पोलीस व कस्टम विभागाची गस्त थंडावते. कारण पावसाळ्यातील महाकाय व उसळत्या सागरी लाटांशी मुकाबला करणाऱ्या गस्ती नौका शासकीय यंत्रणेकडे अद्याप तरी उपलब्ध नाहीत. या कारणास्तव पावसाळ्यात पोलीस व कस्टम विभागाची गस्त बंद केली जाते. यामुळे कोकण किनारपट्टीवरून सागरीमार्गे दहशतवादी मोठय़ा प्रमाणात शस्त्रास्त्रांसह येण्याची भीती राज्य गुप्तचर विभागाने व्यक्त केली आहे. याआधीही कोकण किनारपट्टीवरून आरडीएक्स आणून १९९३ मध्ये मुंबईत महाभयंकर बॉम्बस्फोट मालिका अतिरेक्यांनी घडवून आणली होती. २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानातून समुद्रमार्गेच अतिरेक्यांनी शस्त्रसाठय़ांसह घुसखोरी करून मुंबईलाच नव्हे, तर देशाला हादरवून टाकणारे अतिरेकी हल्ले केले. याची दखल घेऊन कोकण किनारपट्टीवरून पुन्हा दहशतवादी कारवायांसाठी घातक शस्त्रसाठा समुद्रमार्गेच येण्याची भीती राज्य गुप्तचर विभागाने व्यक्त केली आहे.
सध्या भारतीय तटरक्षक (कोस्टगार्ड) यांच्याकडे सागरी किनारपट्टीच्या सुरक्षेचे काम सोपविण्यात आले असले, तरीही पोलिसांना सागरी किनाऱ्यावरील हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना राज्य गुप्तचर विभागाने दिल्या आहेत. याकामी किनारपट्टीवरील गावांतील नागरिकांची मदतही घ्यावी, असेही बजाविण्यात आले आहे.
कोकण किनारपट्टीवरील सागरी गस्त पावसाळ्यात थंडावणार असल्याने, या ढिलाईचा फायदा घेऊन अतिरेकी घुसखोरी करतील, अशी भीती ‘नवी मुंबई वृत्तान्त’ने ७ जूनच्या अंकात व्यक्त केली होती. राज्य गुप्तचर विभागाने याची दखल घेऊन त्यानुसार सूचना देऊन या वृत्तास एकप्रकारे दुजोराच दिला आहे.