Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

काँग्रेस आघाडीत पनवेलमध्ये बिघाडी!
पनवेल/प्रतिनिधी

निवडणूकपूर्व आघाडी करून सत्तेत आलेल्या पनवेल नगरपालिकेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमध्ये बिघाडी निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या १९ तारखेला होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या अंतर्गत निवडणुकीसाठी विद्यमान नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी काँग्रेसतर्फे, तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुनील मोहोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना आणि भाजप या विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी मोहोड यांना पाठिंबा दिल्याची चर्चा असून प्रत्यक्ष निवडणुकीत या प्रकारे मतदान झाल्यास पनवेलमधील सत्तेची समीकरणे बदलणार आहेत.

बंदुकीच्या टोकावर ऐरोली
नवी मुंबई, / प्रतिनिधी

ऐरोली सेक्टर दोनमधील एका उद्यानात शिवसेनेचे उपशाखाप्रमुख कृष्णा नाडर यांच्यावर रविवारी सायंकाळी झालेल्या गोळीबारामुळे या परिसरातील गुन्हेगारी चेहरा पुन्हा एकदा पुढे आला असून हे उपनगर कायम बंदुकीच्या टोकावर असते, हेच स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, या भागातील विशी-पंचविशीतील तरुणही परदेशी बनावटीची बंदूके, रिव्ह्ॉल्वर यांसारखी हत्यारे बाळगू लागल्याचे धक्कादायक वास्तव परवाच्या हल्ल्यामुळे पुढे आले आहे. काही गुंड टोळ्यांचा आशीर्वाद लाभलेल्या या तरुण मुलांना अगदी सहजगत्या पिस्तूलांसारखी हत्यारे मिळू लागल्याने चॉपर-गुप्त्यांचे दिवस ऐरोलीतील या नव्या भाईमंडळींसाठी आता जुने झाले आहेत, असे मत वरिष्ठ पोलिस अधिकारीही व्यक्त करू लागले आहेत.

पावसाळ्यात समुद्रमार्गे अतिरेकी येण्याची भीती;राज्य गुप्तचर विभागाचे पोलिसांना सतर्कतेचे आदेश
उरण/वार्ताहर - पावसाळ्यात कोकण किनारपट्टीवरून समुद्रमार्गे अतिरेकी घुसखोरी करून मोठय़ा शस्त्रसाठय़ासह येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, त्यानुसार किनारपट्टीवरील गावे व पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश राज्य गुप्तचर विभागाने दिले आहेत.२६/११ चे दहशतवादी सागरी मार्गेच आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सागरी सुरक्षा वाढविण्याचे प्रयत्न शासनाकडून झाले होते, मात्र तरीही शासनाकडूनच सागरी सुरक्षिततेबाबत ढिलाई होत आहे. राज्याच्या ७२० किमी सागरी किनारपट्टीवर सुरक्षेच्या दृष्टीने फारशी उपाययोजना करण्यात आलेली दिसून येत नाही.

शैक्षणिक शुल्कवाढीविरुद्ध शिवसेनेचा मोर्चा
बेलापूर/वार्ताहर - शैक्षणिक शुल्कवाढ रद्द करण्याचे आदेश देऊनही काही शाळांनी मनमानीपणे शुल्कवाढ रद्द न केल्याने सोमवारी शिवसेनेतर्फे तुर्भे येथील आय. सी. एल्स. मोनामी हायस्कूलवर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख मनोहर गायखे, शहरप्रमुख डॉ. राजेश पाटील, उपशहरप्रमुख प्रकाश पाटील, शत्रुघ्न पाटील, ज्येष्ठ नगरसेवक हरिभाऊ म्हात्रे यासह शेकडो शिवसैनिक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
शाळेच्या व्यवस्थापनाने छोटा व मोठा शिशुचे वार्षिक शैक्षणिक शुल्क सहा हजारांवरून आठ हजार केले होते. तसेच पहिली ते दहावीच्या इंग्रजी माध्यमाच्या मासिक शुल्कात १०० रुपये वाढ करण्यात आली होती. तुर्भे कॉलनी हे अल्पउत्पन्न गटात मोडणारे क्षेत्र असल्याने पालकांना ही शुल्कवाढ परवडणारी नाही. वाढीव शैक्षणिक शुल्क घेण्यास शासनाने परवानगी नाकारली असतानाही शाळेने शैक्षणिक शुल्क घेणे सुरू ठेवले होते, असे शिवसेनेचे म्हणणे होते. शासनाच्या नवीन अध्यादेशाप्रमाणे वाढीव शुल्क घेणे स्थगित केल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका मॅगो मॅडम यांनी सांगितले. शाळेमार्फत देणग्या घेतल्या जात असल्याच्या आरोपाचे त्यांनी शिवसेना शिष्टमंडळासमोर खंडन केले. या शाळेच्या परिसरात शुल्कवाढ रद्द केल्याचे श्रेय घेणारे फलक मनसे, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसने लावल्याने शिवसेनेने आज थेट आंदोलन करीत आपणही यात मागे नसल्याचा संदेश जनतेत पोहोचविला.