Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

जय हो !
प्रतिनिधी / नाशिक

वाढत्या गुंडगिरीचा समर्थपणे बंदोबस्त करू पाहणाऱ्या पोलीस आयुक्तांची उचलबांगडी करणाऱ्या सरकारला नाशिककरांच्या एकीपुढे झुकावे लागले असून दुसऱ्या-तिसऱ्या कुणाचा नव्हे तर हा सर्वसामान्य नागरिकांचा विजय आहे. कोणीतरी येईल, आपले नेतृत्व करेल आणि आपल्याला न्याय मिळवून देईल याची वाट न पाहता नाशिककर एकदिलाने रस्त्यावर उतरल्याने ही ‘न भूतो’ अशी कारवाई करणे सरकारला भाग पडले असून त्याबाबत सर्वसामान्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.

जनमताचा असाही रेटा !
प्रतिनिधी / नाशिक

नाशिकचे पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रा यांच्या बदलीच्या निर्णयाविरोधात सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी शहरात संतप्त पडसाद उमटत असून बदलीचा हा निर्णय त्वरित रद्द करावा या मागणीसाठी विविध संघटनांनी संयुक्तपणे जोरदार निदर्शने करतानाच ठिकठिकाणी स्वाक्षरी मोहीम, रास्ता रोको, राज्य शासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून आपल्या भावना व्यक्त केल्या. या शिवाय, गंगापूर रोडवरील सोमेश्वर येथे होम व अभिषेक करून ही बदली रद्द करण्यासाठी साक्षात सोमेश्वराला साकडे घालण्यात आले.

मुर्दाडांना जेव्हा जाग येते..
अभिजीत कुलकर्णी

लोकक्षोभाचा वणवा पेटल्याने त्यात मी मी म्हणवणाऱ्यांचा अहंकार कसा खाक होतो, त्याची प्रचिती नाशिकमध्ये पोलीस आयुक्तांच्या बदली अध्यायावरून आली आहे. सोशिक असणाऱ्या नाशिककरांची संभावना बऱ्याचदा गरीबबिचारे, निरुपद्रवी व खरे तर मुर्दाड अशीच केली जाते, पण या निमित्ताने नाशिककरांनी जी सजगता आणि एकी दाखवली त्यामुळे राजकारणाच्या आखाडय़ात भल्याभल्यांना अंगावर घेण्यात माहीर असणाऱ्या छगन भुजबळांना देखील ‘बॅकफूट’वर जाणे भाग पडले. गेल्या दोन दिवसांत जे भुजबळ आपल्या प्रत्येक विधानातून आयुक्तांच्या बदलीचे समर्थन करत होते, त्याच भुजबळांना अखेर राज्याच्या गृहमंत्र्यांकडे आयुक्तांच्या बदलीला स्थगिती देण्याची मागणी करावी लागावी, यातच नाशिककरांचा आणि नैतिकतेचाही विजय आहे.

‘भयमुक्त नाशिक’ हेच उद्दिष्ट - मिश्रा
प्रतिनिधी / नाशिक

शहर भयमुक्त करणे हे आपले पहिले उद्दिष्ट आहे. ते आपण करीत असतानाच आपल्या बदलीचे उद्भवलेले प्रकरण क्लेशदायक असले तरी जोवर आपण पदावर राहू तोवर कायद्याचे पालन न करणाऱ्या गुंडांविरुद्ध कठोर कारवाई, सुरळीत वाहतूक व्यवस्था यासाठी आपण कटिबद्ध राहू अशी भावना पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रा यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना व्यक्त केली. लोकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन चोरी, घरफोडय़ांचे सत्र रोखण्यासाठी अभिनव योजना राबविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड अत्यंत धोकादायक - डॉ. डिकॉस्टा
नाशिक / प्रतिनिधी

भारतातील ऑनलाइन बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड, ऑनलाइन टिकट बुिकंग व ऑनलाइन शॉपिंगचा होणारा वाढता वापर अत्यंत धोकादायक आहे, असे मत शासनाचे सायबर क्राईम विषयाचे सल्लागार व महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षक डॉ. हेरॉल्ड डिकॉस्टा यांनी येथे अभिनव कॉलेज ऑफ इंजिनीयरिंगतर्फे आयोजित ‘सायबर क्राइम’ या परिसंवादात व्यक्त केले.

महिला बचतगटाचा त्र्यंबकेश्वर तालुकास्तरीय मेळावा
नाशिक / प्रतिनिधी

कृषी क्षेत्रात महिलांचा अधिक कार्यक्षम सहभाग वाढविण्याच्या हेतूने त्र्यंबकेश्वर तालुका कृषी अधिकारी व सर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटाचा तालुकास्तरीय मेळावा त्र्यंबकेश्वरच्या अमृतकुंभ सभागृहामध्ये नुकताच झाला. मेळाव्यास उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी आमले, गटविकास अधिकारी ए. पी. पिंगळे, सामाजिक कार्यकर्त्यां निलीमा साठे, प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मुसमाडे, सर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष अविनाश पाटील तसेच कृषी सेवक माधुरी बागूल, मुख्य महिला प्रवर्तिका शितल भूतडा, कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच सर्च फाऊंडेशनचे सहकारी, २५ बचत गटातील ५०० महिला या मेळाव्यास उपस्थित होत्या.

आयटी क्षेत्रात करिअरच्या लाखो संधी - गायकवाड
नाशिक / प्रतिनिधी

आयटी या करिअर क्षेत्राचे महत्व येत्या काही वर्षांत अनेकपटींनी वाढत जाणार असल्याने या क्षेत्रात करिअरच्या लाखो संधी आजच्या तरुणांना उपलब्ध होणार आहेत. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या क्षेत्रात आपला देश ज्या अफाट वेगाने प्रगती करीत आहे, ते बघता या क्षेत्रात युवकांचे भवितव्य उज्ज्वल राहील यात शंकाच नाही, असे प्रतिपादन सिलिकॉन व्हॅलीचे संस्थापक संचालक तथा आयटी तज्ज्ञ नीलेश गायकवाड यांनी केले. ‘तरुणांसाठी आयटी क्षेत्रात करिअरच्या संधी’ या विषयावर महाकवी कालिदास कलामंदिरात सिलिकॉन व्हॅलीतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

केंद्राकडून राज्याकडे १०० कोटी रूपये वर्ग; डाळिंब उत्पादकांना दिलासा
नाशिक / प्रतिनिधी

मर व तेल्या रोगामुळे संकटात सापडलेल्या डाळिंब उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्राकडून राज्य शासनाकडे १०० कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती खा. प्रतापदादा सोनवणे यांनी दिली आहे. कृषी भवनात केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार व कृषी अधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. डाळिंब उत्पादकांच्या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर घट होऊन शेतकरी अडचणीत आल्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी सोनवणे यांनी आमदार असल्यापासून प्रयत्न सुरू केले होते. राज्य सरकारकडे याबाबत पाठपुरावा करून व विधान परिषदेतही या प्रश्नास त्यांनी वाचा फोडली होती. राज्य शासनाचे प्रतिनिधी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व डाळिंबाच्या लागवडीत वाढ होण्यासाठी ५० हजार प्रति हेक्टर खर्चापैकी २५ टक्के रक्कम राज्य सरकार व ५० टक्के रक्कम केंद्र सरकार देणार असल्याचे पॅकेज राज्य सरकारच्या वतीने जाहीर केले होते. दोन वर्ष होऊनही या विषयात फारशी प्रगती झाली नाही. केंद्र सरकार सहाय्यता रक्कम मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यास विलंब होत आहे, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली. ही बाब सोनवणे यांनी कृषीमंत्री शरद पवार यांच्या लक्षात आणून दिली. पवार यांनी या विषयात तत्काळ बैठकीचे नियोजन करून राज्य शासनाकडे १०० कोटी रूपयांचा निधी तत्काळ वर्ग करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

‘रासबिहारी’ची आंतरराष्ट्रीय कार्यशाळा
नाशिक / प्रतिनिधी

नाशिक येथील रासबिहारी इंटरनॅशनल स्कुलमध्ये शिक्षकांसाठी तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पी.वाय.पी. अभ्यासक्रमा संदर्भात आणि पी.वाय.पी. च्या मूल्यमापनासंदर्भात शिक्षकांचा व्यावसायिक विकास करणे या हेतुने सदर कार्यशाळा आयोजित केली होती. इंडस इंटरनॅशनल बेंगलोर येथील मोनिका सेन आणि ओव्हरसिज कोंलबो येथील गॅरेथ जेकबसन यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.