Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

धुळे परिसरातील रस्ता दुरूस्तीसाठी १६ कोटी रूपये मंजूर
वार्ताहर / धुळे

शहर व परिसरातील सुमारे २० रस्त्यांचे रूप आगामी काळात पालटणार असून त्यासाठी शासनाकडून तब्बल १६ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. प्राप्त निधीतून केवळ रस्तेच नव्हे तर गटारी, दुभाजक, चौक दुरूस्ती, विद्युत खांबांचे स्थलांतर, दुरूस्ती अशी विकास कामे पूर्ण केली जाणार आहेत. विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून आता जवळपास सर्वच राजकीय नेते, लोकप्रतिनिधी कामाला लागले आहेत. गेल्या काही वर्षांत शहरातील रस्ते, जलवाहिन्या, पाणी वितरण व्यवस्थेसह परिसरातील गावांमध्ये आ. राजवर्धन कदमबांडे यांनी काही विकास कामे केली आहेत.

अस्वच्छतेच्या फेऱ्यात महापौरही
वार्ताहर / जळगाव

संपूर्ण शहरातील नागरिकांकडून अस्वच्छतेसंदर्भात ओरड सुरू असतानाही कान बंद करून बसलेल्या महापौर व उपमहापौरांना त्यांच्याच प्रभागांमधून घरचा आहेर मिळू लागला आहे. अस्वच्छतेबद्दल आता या दोघांच्या प्रभागांमधूनच अधिक तक्रारी होऊ लागल्या आहेत. कचऱ्याचे ढिग पडून राहणे, गटारींची स्वच्छता न झाल्याने तुंबणे, उघडय़ावर शौचालयास बसणे, यासारख्या आरोग्याला घातक सवयींमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

भुसावळ पालिकेतील काही नगरसेवकांच्या अपहरणाची तक्रार
जळगाव / वार्ताहर

जिल्ह्य़ातील १२ पालिकांच्या नगराध्यक्षांची निवड २० जून रोजी होणार असून भुसावळ पालिकेतील सत्ताधारी गटाचे काही नाराज नगरसेवक विरोधकांना जाऊन मिळाले असताना ते गायब झाल्याची चर्चा सुरू होती. परंतु आता त्यांचे अपहरण करण्यात आल्याच्या तक्रारी पोलिसात दाखल होऊ लागल्याने अनेक तर्क-वितर्क करण्यात येत आहेत.

उमेदवारी नाही मिळाली तरी निवडणूक लढविणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप नाईक संतप्त
साक्री / वार्ताहर
विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहाव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दापूरपैकी जामखेडी येथे आयोजित आदिवासी मेळाव्यात प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस दिलीप नाईक यांनी आपल्या मनातील अस्वस्थता व्यक्त करून आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांच्या भूमिकेविषयी प्रश्न उपस्थित केले. विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी नाही मिळाली तरी आपण नवापूर मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचेही त्यांनी जाहीर करून टाकले.

झेडबीपी महाविद्यालयाचे सामाईक परीक्षेत यश
धुळे / वार्ताहर

वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशासाठी राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेत येथील जयहिंद शैक्षणिक संस्थेच्या झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाने घवघवीत यश संपादन केले आहे. वैद्यकीय शाखेसाठी १८७ पैकी ८४ विद्यार्थी व अभियांत्रिकी शाखेसाठी ३३४ पैकी १८१ विद्यार्थी प्रवेश पात्र ठरले आहेत. वैद्यकीय शाखेत प्रवेश पात्र ठरलेली सनिरा संजय वाघमारे ही २०० पैकी १९० गुण मिळवून ओबीसी प्रवर्गात राज्यात द्वितीय व पुणे विभागात प्रथम आली.

गैरव्यवहारप्रकरणी सरपंच व मुख्याध्यापकाकडून वसुलीचे निर्देश
वार्ताहर / वणी

सुरगाणा पंचायत समितीच्या शाळांमधील बांधकामात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी सरपंच व मुख्याध्यापक यांना दोषी धरून जिल्हा परिषदेने उभयतांकडून प्रत्येकी दोन लाख ६० हजार रूपये वसूल करण्याचे निर्देश दिले आहे. सदरची रक्कम मुख्याध्यापकांच्या उपदानातून वसूल करावी तर सरपंचाकडील वसुली कार्यवाही सुरू करावी असे निर्देश देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या या निर्देशामुळे शैक्षणिक व राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सुरगाणा येथील शाळा क्रमांक एकमध्ये सर्वशिक्षा अभियानांतर्गत सहा शाळांच्या खोलीच्या बांधकामात हा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. या बांधकामासाठी सरपंच व तत्कालीन मुख्याध्यापक मयत गंगाराम हरी बागूल यांच्या नावाने संयुक्त खाते असून त्याबाबत दोघेही सारखेच जबाबदार आहेत. या बांधकामात कनिष्ठ अभियंता सर्व शिक्षा अभियान यांच्या मुल्यांकनानुसार बांधकामाचा खर्च तीन लाख ३१ हजार ५२ इतका खर्च झाला आहे. या कामास आठ लाख ५१ हजार ररूपये अनुदान उपलब्ध करून देण्यात आले होते. या अनुदानातून झालेला खर्च वजा जाता पाच लाख २० हजार रूपये एवढी रक्कम वसूल होणे बाकी आहे. सदरची वसूली सुरगाण्याचे सरपंच व तत्कालीन मुख्याध्यापक यांच्याकडून वसूली करण्यात यावी असे नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने पत्रात म्हटले आहे. त्यानुसार सरपंच व मुख्याध्यापकांकडून प्रत्येकी दोन लाख ६० हजार २०४ रूपये वसूल करण्यास सांगण्यात आले आहे. शिक्षण विभागाच्या निर्देशामुळे राजकीय व शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ट्रॉमा केअर सेंटरसाठी निधीची तरतूद - संजय चव्हाण
सटाणा / वार्ताहर

नाशिक जिल्ह्य़ातील पहिल्याच ट्रॉमा केअर सेंटरच्या उभारणीसाठी या आर्थिक वर्षांत एक कोटी ६३ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली असून पहिल्या टप्प्याचा निधी ८७ लाख रूपये उपलब्ध झाला असून आठवडय़ात सदर सेंटरच्या बांधकामाची निविदा निघून प्रत्यक्ष बांधकामास सुरूवात करण्यात येईल, असे आ. संजय चव्हाण यांनी सांगितले.ग्रामीण रूग्णालयास उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळावा व ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी व्हावी या मागणीसाठी चव्हाण यांनी सतत पाठपुरावा केला आहे. तत्कालीन आरोग्य राज्यमंत्री विमल मुंदडा यांनी ही मागणी मंजूर केली होती. मात्र अर्थसंकल्पात निधीची तरतूद नसल्याने काम रेंगाळले होते. ताहाराबाद रोडवरील गटविकास अधिकाऱ्यांच्या निवास स्थानाची जागा ट्रामा केअर साठी हस्तांतरीत करण्यात आली असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

जोडप्याची आत्महत्या
भगूर / वार्ताहर

लहवित शिवारात अनोळखी जोडप्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे उघड झाले असून कोणतेही ओळखीचे पुरावे सापडत नसल्याने पोलीस त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. महिलेचे वय अंदाजे २८ तर मुलाचे वय २५ वर्षे आहे. दरम्यान या घटनेनंतर लहवित येथील ग्रामस्थांना मृतदेह ओळखण्यासाठी बोलविण्यात आले होते. मात्र हे दोघेही त्या भागातील नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

तिसगावात शौचालये दोन वर्षांपासून बंद
देवळा / वार्ताहर

तालुक्यातील तिसगाव येथील दोन वसाहतीतील शौचालये दोन वर्षांपासून पाण्याअभावी बंद असून ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेमुळे राज्याच्या हागणदारी मुक्ती योजनेचा बट्टय़ाबोळ उडाला आहे.
दोन वर्षांपूर्वी गावालगत पाच व इंदिरानगर वस्तीजवळ चार शौचालये ग्रामपालिकेने संपूर्ण ग्रामीण योजनेंतर्गत बांधलेली आहेत. गावालगत बांधलेले शौचालय हे रस्त्यावरच असून जवळ घरेही आहेत. पाण्याअभावी शौचालये सुरू होऊ शकली नाहीत असा दावा केला जात असला तरी गटारीची व्यवस्था नसणे हे एक कारणही दिले जात आहे. ग्रामपालिकेने शौचालयांसाठीचा निधी वाया घालविला असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. अशीच परिस्थिती इंदिरानगर वस्तीजवळ बांधलेल्या शौचालयांची सदर शौचालय गावठाणच्या हद्दीत न बांधता महसुली भागात बांधल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.