Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

सहकारी बॅंकिंगची विश्वासार्हता
कोल्हापूर जिल्ह्य़ातील अकरावी व इचलकरंजी शहरातील सहावी बँक परवाना रद्द होऊन काळाच्या पडद्याआड गेली. पुणे शहरातील एका नेत्याच्या नावे असणाऱ्या बँकेवर अवसायक नेमला गेला, तर सांगलीमधील एका दिवंगत नेत्याच्या नावाच्या बँकेचा परवाना रद्द झाला, तसेच ३३८ पतसंस्थांच्या १८०७ संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई झाली, खोटे लेखापरीक्षण अहवाल देणाऱ्या ९५ सनदी लेखा परीक्षकांची सनद रद्द करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असून, सहकार खात्याच्या आठ लेखा परीक्षकांवर कारवाई होणार आहे, असेही सूचित करण्यात आले. पासवर्ड वापरून लाखो रुपये हडप करणाऱ्या दोन जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली. वरील विवेचनावरून सहकारी बँकिंगची वाटचाल समृद्धीकडून विनाशाकडे होण्यासाठी प्रश्नमुख्याने दोन घटक जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिला घटक म्हणजे राजकीय लागेबांधे असलेले व बँकिंगचा गंध नसलेले, मनमानी व बेताल कारभार करणारे संचालक, त्यांनीच तर ही चळवळ राजकीय दावणीस बांधली आहे.

‘बालमुद्रा’च्या माध्यमातून संस्कृतीचे जतन
‘बाहुला-बाहुली’चे लग्न हा आपल्या संस्कृतीतील एक अस्तंगत होत गेलेला समारंभ. लहान मुलांचा ‘भातुकली’ चा खेळही आता केवळ ‘गाण्या’तच ऐकायला मिळतो. परंतु परवा पुण्यात ‘बाहुला-बाहुली’चे लग्न जाहीरपणे मोठय़ा थाटात साजरे करण्यात आले. निमित्त होते ‘बालमुद्रा’ या लहान मुलांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे. पुण्यातील एक छायाचित्रकार श्रीकृष्ण परांजपे हे दरवर्षी लहान मुलांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवितात. गेली आठ वर्षे त्यांच्या या ‘बालमुद्रा’चा उपक्रम चालू आहे.

बळीराजा धास्तावला..
नगर जिल्ह्य़ाला मागच्या वर्षी खरिपाचे पीक साधलेच नाही. याही वर्षी अजूनही पाऊस रूष्टच आहे. पहिले रोहिणी नक्षत्र कोरडे गेले. मृग नक्षत्र निम्मे संपले. मात्र, पावसाची चिन्हे दिसेनात. सलग दुसऱ्या वर्षी खरिपाबाबत साशंकता निर्माण झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. मेच्या उत्तरार्धात वळवाचा पाऊस आणि जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात मान्सूनचे आगमन अशी नगर जिल्ह्य़ाची साधारण परंपरा आहे. मुंबईनंतर आठ ते दहा दिवसांनी जिल्ह्य़ाच्या पश्चिम भागात मान्सून दाखल होतो. त्यानंतर जिल्ह्य़ात इतरत्र कमी-अधिक पावसाला सुरुवात होते. यंदा जूनचा दुसरा आठवडा उलटला तरी पाऊस तर नाहीच; मात्र त्याची चिन्हेही दिसत नाहीत. एक-दोन तालुक्यांचा अपवाद वगळता वळवाच्या पावसाचीही जिल्ह्य़ावर अवकृपाच होती. पावसाचे वातावरणच तयार न झाल्याने नगर जिल्हा अजूनही कडक उन्हाळ्यालाच तोंड देत आहे. ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्यास आणखी किमान आठ दिवस लागतील. राज्यात आगमन झाल्यानंतर तीन-चार दिवसांनी मुंबईत आणि त्यानंतर आठ दिवसांनी नगर जिल्ह्य़ात हे लक्षात घेतले तर अजूनही पंधरा दिवस पावसाची प्रतीक्षा करावी लागेल, असे दिसते. त्यामुळेच शेतकरी धास्तावला आहे. मागच्या वर्षी उन्हाळा जाणवलाच नव्हता. मेच्या दुसऱ्या आठवडय़ात जिल्ह्य़ात विस्तृत प्रमाणात वळवाचा पाऊस झाला. मान्सूनच्या आगमनापर्यंत तो सुरू होता. त्याच पावसावर बऱ्यापैकी पेरण्या झाल्या. मात्र, पुढे पावसाने मोठा ताण दिला होता. त्यावेळीही जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात जिल्ह्य़ात पावसाला सुरुवात झाली होती. मात्र, तोपर्यंत खरिपाची पिके हातची गेली. याही वर्षी पाऊस लांबल्याने त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. त्याचीच चिंता सर्वांना लागून राहिली आहे.