Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

पाचगाव वनविहाराजवळ आढळले
मृतावस्थेतील पांढरे ससे
पुणे, १५ जून / खास प्रतिनिधी
पाचगाव पर्वती वनविहाराच्या परिसरात आज सकाळी मृत तसेच मलूल होऊन पडलेले अनेक ससे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आजारी असलेले २२ ससे ताब्यात घेऊन उपचारासाठी कात्रज येथील प्राणी अनाथालयात पाठविले आहेत. तर, मृत सशांच्या मृत्यूचे कारण जाणून घेण्याकरिता तसेच त्यापासून टेकडीवरील मोरांमध्ये व जंगली सशांमध्ये संसर्गजन्य रोगाचा फैलाव होऊ शकतो की काय, याची माहिती घेण्यासाठी ते औंध येथील रोग संशोधन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

विवेक खरवडकरांसह तिघांना अटक
दुप्पट ‘टीडीआर’ दिल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
पुणे, १५ जून / प्रतिनिधी
कसबा पेठ येथील नदीकिनारी असलेल्या ‘हरितपट्टय़ा’तील जागेच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट ‘ हस्तांतरीय विकास हक्क’ (टीडीआर) दिल्याप्रकरणी महापालिकेच्या अतिरिक्त नगर अभियंता, निवृत्त सहायक अभियंता व बांधकाम व्यावसायिक अशा एकूण तिघाजणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी आज सायंकाळी चारच्या सुमारास अटक केली.

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेद भ्रम अमंगळ ।।

‘पंढरीची वारी’ आणि ज्ञानोबा-तुकोबांचा पालखी सोहळा हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे. श्री विठ्ठल भक्तीनं भारलेला लाखो वैष्णवांचा महामेळा ‘जीवाचे जीवन’ असणाऱ्या विठुरायाच्या भेटीसाठी आळंदी ते पंढरपूर असा दीर्घप्रवास मोठय़ा आनंदात पार करतात हे जगातलं महादाश्चर्य आहे. ‘पंढरीची वारी’ हा केवळ धार्मिक सोहळा नाही तर ती सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनाची लोकचळवळ आहे आणि या चळवळीला अधिष्ठान आहे, वैष्णव धर्माचं ।

वाहतूक सुधारण्यासाठी त्रिस्तरीय उपाययोजना
‘लोकसत्ता वाहतूक मंच’ च्या बैठकीत आयुक्त झगडे यांचे प्रतिपादन
पुणे, १५ जून/प्रतिनिधी
पुणेकरांचा रोजच्या प्रवासाचा वेळ कमीतकमी कसा करता येईल याचा अधिकाधिक विचार करून त्यासाठी तातडीच्या, तसेच अल्प व दीर्घ मुदतीच्या उपाययोजना हाती घेण्याला माझे प्राधान्य राहील, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त महेश झगडे यांनी आज केले. रस्ते व पदपथांचा वापर त्याच कारणांसाठी होईल याकडे तातडीने लक्ष देणार असल्याचेही ते म्हणाले.
शहराच्या वाहतूक सुधारणेसंबंधी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहभागातून ‘लोकसत्ता वाहतूक मंच’ स्थापन करण्यात आला आहे.

पिंपरी पालिका कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू
आठ हजार कर्मचाऱ्यांना लाभ; २८ कोटींचा बोजा
पिंपरी, १५ जून/प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग आणि समकक्ष वेतन श्रेण्या लागू करण्यास स्थायी समितीने आज मान्यता दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर भालेराव होते. या निर्णयामुळे कामगार व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या निर्णयामुळे महापालिकेवर सुमारे २८ कोटींचा बोजा पडणार आहे.

सागर संशोधिका मेरी थार्प
सागरविज्ञान हे बराच काळ पुरुषांची मक्तेदारी मानलं जात होतं. याचं कारण दीर्घकाळ सागरभ्रमंती, बरेचदा अंगावर बेतणारे प्राणघातक प्रसंग. सागरावर आणि सागरजलांतर्गत करावी लागणारी शरीरकष्टाची कामं ही स्त्रियांना झेपणारी नाहीत, असं म्हटलं जात असे. त्यामुळे सागरशास्त्राशी संबंधित संशोधनात स्त्रियांना प्रवेश घेतानाच त्यांच्यापुढे अडचणीचा पाढा वाचला जायचा. त्या सागरशास्त्रात आल्याच तर त्यांना जमिनीवरची प्रयोगशाळेतली कामं दिली जायची. तरीही ज्या स्त्रियांनी सागरशास्त्रात नाव मिळवलं आणि ज्यांचा आघाडीच्या सागरशास्त्रज्ञांत समावेश होतो, त्यात मारी (किंवा मेरी) थार्प यांचं नाव अग्रभागी असतं.

‘मनकवडा’ यंत्रमानव
त्रमानव ज्याला आपण रोबोट असे म्हणतो त्याच्या निर्मितीत आता अधिकाधिक प्रगती होत आहे. यंत्रमानवांमुळे आज अनेक जोखमीची कामे करणे शक्य झाले आहे. विशेषत: जिथे माणसाला धोका आहे अशा ठिकाणी हे यंत्रमानव बिनदिक्कतपणे काम करू शकतात हे त्यांचे वेगळेपण आहे. अंतराळविज्ञानातील अनेक अशक्य गोष्टी यंत्रमानव विज्ञानाने साध्य झाल्या आहेत. हबल दुर्बिणीची जी दुरूस्ती अलिकडेच करण्यात आली त्यातही अशाच रोबोटिक आर्मचा वापर करण्यात आला होता. या शाखेत यंत्रमानवाचा मानवाशी असलेला संवाद अधिक सुकर व्हावा यासाठी युरोपीय वैज्ञानिकांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.

मायकेल फॅरेडे -२
कहाणी बिनतारी संदेशवहनाची - १५

इं ग्लंडला परतल्यावर काही काळ डेव्हीच्या हाताखाली काम करून १८२१ साली डेव्हीच्या शिफारशीवरून फॅरेडेला ‘रॉयल सोसायटी’मध्येच थेट नोकरी मिळाली. आता तो स्वतंत्रपणे आपलं रसायनशास्त्रातलं संशोधन करीत असे. त्याच वर्षी त्याची ओळख सारा बर्नार्डशी झाली आणि त्यांनी लग्न केलं. रसायनशास्त्रात फॅरेडेनं अनेक महत्त्वाचे शोध लावले, तसंच पदार्थविज्ञानातही त्यानं अतिशय मूलभूत कामगिरी केली. या सगळ्यांचा उपयोग त्याला आपल्या विजेच्या प्रयोगांमध्येही झाला. कारण रसायनशास्त्राच्या संशोधनासाठी त्यानं वीजप्रवाहाचे वाहक (कंडक्टर्स), विरोधक (इन्श्युलेटर्स) आणि बॅटरी यांचा सखोल अभ्यास केला.

न्यायिक मानववंशशास्त्र
एअर फ्रान्सच्या विमानाला अपघात किंवा घातपात होऊन सर्वच्या सर्व २२८ प्रवाशांना मृत्यू आला. त्यानंतर त्यांचे अवशेष मिळत नव्हते. ते आता अटलांटिकमध्ये मिळत आहेत. त्यात १६ मृतदेह मिळाल्याचे वृत्त आहे. तसेच विमानाचेही अवशेष, वस्तू विमानतल्याच मिळत आहेत. जे मृतदेह सुरक्षित आहेत त्यांची ओळख त्यांच्याजवळील वस्तूंवरून वा त्यांचे फोटो, पासपोर्ट इत्यादी जे पटविता येईल परंतु काहींची ओळख जलचर प्राण्यांनी खाल्ल्यामुळे वा जळून गेल्याने वा कुजल्याने पटणे अशक्य होते. असाच प्रकार रेल्वे अपघात वा वन्य प्राण्यांनी खाल्यामुळे वा दरोडा पडल्यावर दरोडेखोरांनी मारुन टाकून हात पाय तोडणे व शीर तोडणे हेही होऊ शकते. तसेच काही वेळा वन्य प्राणीही हे खातात व फक्त हाडे वा सापळा शिल्लक राहतो. अशा वेळी विज्ञान मदतीला येते ते त्या व्यक्तीची ओळख पटविण्यास! त्यात, न्याय वैद्य तज्ज्ञ असतात.

‘गानवर्धन’ स्पर्धेत शोभा टिळक, वसंत ओक विजयी
पुणे, १५ जून / प्रतिनिधी
अभिजात संगीतास सातत्याने प्रोत्साहन देणाऱ्या ‘गानवर्धन’ या संस्थेने वय वर्ष ४० पुढील हौशी नवकलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने शास्त्रीय आणि सुगम गायनाच्या स्पर्धेचे आयोजन नुकतेच केले होते. यात शास्त्रीय गायन विभागात शोभा टिळक, तर सुगम गायनात वसंत ओक विजेते ठरले आहेत, असे संस्थेचे विश्वस्त प्रसाद भडसावळे यांनी कळविले आहे. या स्पर्धेत वय वर्ष ४० ते वय वर्ष ८६ मधील ७५ हौशी कलाकार सहभागी झाले होते. स्पर्धेतील अन्य विजेत्यांमध्ये शास्त्रीय गायन विभागात मानसी देशपांडे यांनी द्वितीय क्रमांक तर विजयश्री मुश्रीफ, सिमंतीनी दांडेकर यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले, सुगम गायन विभागात माधवी तळणीकर यांनी द्वितीय क्रमांक तर नंदकुमार कोरे, सुधा जोशी, माया मठकर यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले, विशेष म्हणजे दोन्ही विभागातील प्रथम आलेले स्पर्धक हे वय वर्ष ६५ पुढील कलाकार आहेत. परीक्षक म्हणून विमल लिमये, मुकुंद मराठे व अश्विनी टिळक उपस्थित होते. स्पर्धेचे संयोजन लता साठे यांनी केले, स्पर्धेची संकल्पना संस्थेचे अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी यांची होती.

शाळेच्या पहिल्या दिवशी जुन्नरमध्ये विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक
जुन्नर, १५ जून/वार्ताहर
शाळेच्या पहिल्याच दिवशी खरं तर एक अनाहूत हुरहूर शालेय विद्यार्थ्यांना असते ती वर्गात जाऊन बसण्याची.. पण ही अनोखी अनुभूती विद्यार्थ्यांसाठी जर वेगळेपण देणारी असेल तर..असाच एक उपक्रम खामगावच्या ग्रामस्थांनी राबवला. शालेय विद्यार्थ्यांची पहिल्या दिवसाचे औचित्य साधून बैलगाडीतून मिरवणूक काढली. महिलांनी विद्यार्थ्यांना औक्षण केले. त्यानंतर पुस्तक, गणवेश, खाऊ वाटप असे कार्यक्रमही पार पडले. शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत जव्हेरी, खामगावचे सरपंच बाळासाहेब दुधवडे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशोक घोलप, शालेय समिती अध्यक्ष गुलाब घोलप, उपाध्यक्ष गोरक्षनाथ जाधव, अतुल घोलप, राजेंद्र जाधव, मच्छिंद्र जाधव, स्थानिक शिक्षक खंडेराव ढोबळे, माधुरी शेलार, कोंडीभाऊ डावखर, कोंडीबा लांडे, राजेश दिवेकर, सत्यवान म्हस्के आदी यावेळी उपस्थित होते.

माणमधील जमीन धारकांना वाढीव मोबदल्याचे वाटप
पुणे, १५ जून/प्रतिनिधी
राजीव गांधी इन्फोटेक पार्कसाठी संपादित करण्यात आलेल्या मौजे माण येथील जमीन धारकांना जमिनीचा वाढीव मोबदला देण्यात आला आहे. शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमाच्या कलम ३३ (२) खालील वाटाघाटींमध्ये १७ लाख ५० हजार प्रति हेक्टरी नुकसान भरपाई निश्चित केली होती. परंतु काही शेतक ऱ्यांनी बाजार भाव मान्य नसल्यामुळे कलम ३३ (३) अंतर्गत वाढीव भरपाईची मागणी केली होती. त्यानुसार शेतक ऱ्यांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून जिल्हाधिकारी, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यांच्यात वाटाघाटी घडवून आणल्या. तत्कालीन बाजारभावाचा विचार करता शेतक ऱ्यांना रुपये १९ लाख ५० हजार प्रति हेक्टरी वाढीव बाजारभाव मंजूर करण्यात आला. त्यामुळे शेतक ऱ्याने एकूण ३७ लाख प्रति हेक्टरी बाजारभाव देण्यात आला आहे

हॉटेलवर दरोडा
लोणावळा, १५ जून/वार्ताहर
पवनानगर (ता. मावळ) येथील बालाजी रेस्टॉरंट व बारमध्ये काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास परिसरातील दहा-बारा तरुणांनी दरोडा घालत बारची म्नासधूस करत तिजोरीतील ३२ हजारांच्या रोख रकमेसह सुमारे ४९ हजार आठशे रुपये किमतीची दारू व बिअर लुटल्याचे सांगितले. संतोष मधुकर कोकाटे (वय २७, रा. मूळ बाजार भूगाव, पन्हाळा, ता. कोल्हापूर, सध्या राहणार पवनानगर) याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. कोकाटे याच्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलिसात रामदास घाग (वय २५), दत्ता शिंगारे (वय २७), नवनाथ भोकरे (वय २२), सर्व राहणार कडदे, पवनानगर, ता. मावळ यासह त्याच्या आठ ते दहा साथीदारांविरुद्ध दरोडय़ाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, नवनाथ भोकरे यास ताब्यात घेण्यात आले आहे.

डॉक्टरांच्या संरक्षणाचा कायदा मंजूर करण्याची राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलची मागणी
पुणे, १५ जून / प्रतिनिधी

डॉक्टरांवरील हल्ल्यांसंदर्भात संरक्षणाच्या होणाऱ्या अध्यादेशास राज्यपालांनी मान्यता दिल्यानंतर विधानसभेत हा कायदा एकमताने मंजूर व्हावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्या डॉक्टर्स सेलने केली आहे. डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांसंदर्भात शासनाने गांभीर्याने दखल घेऊन डॉक्टरांच्या संरक्षणाचा अध्यादेश राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठविला होता. त्याला राज्यपाल एस. सी. जमीर यांनी यापूर्वीच मंजुरी दिली होती. त्यानंतर या अध्यादेशाचे आता कायद्यात रुपांतर होणार आहे. याची प्रक्रिया विधिमंडळात होणार असून डॉक्टरांवरील संरक्षणाचा कायदा विधानसभेत मंजूर होणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यातील सर्व शाखांच्या डॉक्टरातर्फे राज्याच्या विधिमंडळातील सर्व सदस्यांना हा कायदा एकमताने मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आल्याचे पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

‘अतिमहत्त्वाकांक्षेमुळे हृदयरोग’
पुणे, १५ जून/प्रतिनिधी
जागतिकीकरण व वाढत्या स्पर्धेमुळे तरुण अतिमहत्त्वाकांक्षा व नैराश्यातून हृदयरुग्ण होत आहेत, असे मत डॉ. अभिजित वैद्य यांनी व्यक्त केले.डॉ. मोहन परांजपे यांच्या आईच्या स्मरणार्थ मंगला फाउंडेशनने १५ ते २५ जूनदरम्यान ठेवलेल्या मोफत नेत्रतपासणी शिबिराचे उद्घाटन डॉ. वैद्य यांनी केले. डॉ. परांजपे यांच्या ‘डोळ्यांविषयी थोडक्यात पण महत्त्वाचे’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. वैद्य यांच्या हस्ते झाले. यावेळी विनय कुलकर्णी उपस्थित होते.