Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

साताऱ्यात डॉ. मुळीक यांचे बेमुदत उपोषण सुरू
सातारा, १५ जून/प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे एक खासदार सीबीआयच्या कोठडीची हवा खात असताना साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जनचळवळ उभारली असून त्यांच्या नेतृत्वाखाली कृषिरत्न डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करो या मरोची घोषणा

 

करून बेमुदत उपोषणाचे आंदोलन सुरू केले आहे.
उदयनराजे व त्यांचे चाहते कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष रंजना रावत यांच्यासह सातारा विकास आघाडीचे पदाधिकारी नगरसेवक भूमाताचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सहभागी झाले होते.
शेती व शेतकरी यांना सर्व मानवी, नैसर्गिक आपत्तीपासून वाचविण्यासाठी शेती उत्पन्नातील जोखमींचे व्यवस्थापन करणारी ‘इर्मा’ (इन्कम रिस्क मॅनेजमेंट इन अ‍ॅग्रिकल्चर) योजना अमेरिका ब्राझिलसारख्या प्रगत देशांप्रमाणे संसदेत कायदा करून राबविण्यात यावी या प्रमुख मागणीबरोबरच भूमाता गौरव दिंडीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करून त्यांच्यावर दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्राला जीवनदायी व उर्जादायनी कोयना प्रकल्पातील शेतकऱ्यांचे अपुरे राहिलेले पुनर्वसन विनाविलंब पूर्ण करावे. कोयना विद्युत प्रकल्पातील एकूण निर्मितीपैकी दहा टक्के वीज जिल्ह्य़ासाठी राखून ठेवावी व जिल्हा वीज भार नियमन मुक्त करावा. कृष्णा खोऱ्यातील सिंचन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करावा. शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी. शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा. सेझऐवजी साझ प्रकल्प द्या, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना हुतात्मा जाहीर करून त्यांच्या कुटुंबांना हुतात्मा पेन्शन द्यावा, पाणी पाझर कर रद्द करा या मागण्या भूमाता गौरव दिंडीच्या माध्यमातून करण्यात आल्या होत्या.