Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सावंतवाडीतील रोग्यांचे हाल
आजारी इस्पितळे
सावंतवाडी, १५ जून/वार्ताहर

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात २५ पदे रिक्त असल्याने रुग्णांचे नातेवाईक आणि रुग्णालयीन

 

कर्मचारी यांच्यात वरचेवर ताणतणाव निर्माण होत आहेत. औषध निर्माता वर्ग-३ साठी तीन पदे भरण्यात आली असली तरी त्यातील दोन औषध निर्माता प्रतिनियुक्तीवर मुंबई व पेण येथे काम करीत असूनही त्यांचा पगार मात्र येथील रुग्णालयातून काढण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक वर्ग-१ पद रिक्त आहे. त्याचा पदभार स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्याकडे आहे. त्यांच्यासह अपघात कक्ष विभागात डॉ. श्रेयस मांगेलकर व डॉ. उमेश सावंत हे दोनच डॉक्टर सध्या रुग्णालयात कार्यरत आहेत.
या रुग्णालयात डॉक्टर्सची १५ पदे मंजूर असून, आठ पदे भरली आहेत, तर सात रिक्त आहेत. त्यातील डॉ. मुल्ला, डॉ. सूर्यवंशी, डॉ. दत्तात्रय सावंत, डॉ. कश्यप देशपांडे, डॉ. वंदना शिंदे हे अर्जित रजेवर, तर काहीजण राजीनामा देण्याच्या मन:स्थितीत आहेत.
या रुग्णालयाच्या अपघात कक्षासाठी चार वैद्यकीय अधिकारी मंजूर आहेत. त्यातील दोन पदे रिक्त असून, दोन कार्यरत आहेत. त्यामुळे डॉक्टर्सना ४८ तास डय़ुटी करावी लागते. अपघात कक्षात रुग्णांची वाढ होतच असते, पण साधी मलमपट्टी करून रुग्णांना अत्याधुनिक सुविधा पुरेशी उपलब्ध नसल्याने गोवा मेडिकल कॉलेजच्या बांबुळी रुग्णालयात पाठविले जाते. त्यावेळी रुग्णांचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांत ताणतणाव निर्माण होतो.
या रुग्णालयात शस्त्रक्रिया, भूलतज्ज्ञ, भिषक, बालरोगतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, नेत्रशल्य या महत्त्वाच्या पदावर डॉक्टर्स कार्यरत नसल्याने उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा खालावला आहे.
औषध निर्माता वर्ग-३ च्या पदी तिन्ही जागा भरण्यात आल्या आहेत. मात्र दोन औषध निर्माता प्रतिनियुक्तीवर मुंबई व पेण येथे कार्यरत आहेत. त्यांचा पगार या रुग्णालयातून काढला जातो. या पदाबाबत सिंधुदुर्गातील अन्य रुग्णालयांत हीच अवस्था आहे, असे सांगण्यात येते. बालरोगतज्ज्ञ व अपघात कक्ष वैद्यकीय अधिकारी यांची ११ महिन्यांची अस्थायी नियुक्ती आहे.
या रुग्णालयात कर्मचाऱ्यांची ९५ पदे मंजूर असून, त्यापैकी ७० पदे भरण्यात आली आहेत. मात्र महत्त्वाच्या डॉक्टर्स पदासह २५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णालयात सावळागोंधळ निर्माण होतो.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाची दैनावस्था झाल्याने रुग्णांची संख्या घटत आहे. सध्या तीनच डॉक्टर्स कार्यरत असून, ४८ तास सेवा बजावीत आहेत.