Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

आदिवासी आश्रमशाळा शिक्षकांचे आंदोलन
नाशिक, १५ जून / प्रतिनिधी

आदिवासी विकास खात्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी येथे आदिवासी विकास भवनसमोर आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेतर्फे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले.

 

कोहोर आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांनी वार्षिक परीक्षेचे पेपर न तपासता निकाल जाहीर केल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ करावे ही मागणी प्रश्नमुख्याने करण्यात आली असून त्यांचे समर्थन करणाऱ्या नाशिक प्रकल्प अधिकाऱ्यांनाही बडतर्फ करा व ही गोष्ट ज्यांनी पुढे आणली त्यांचे निलंबन रद्द करा, अशी आंदोलनकर्त्यांनी भूमिका घेतली आहे. २००९ मधील बदली बाबत ‘बदली धोरण’ नुसार पारदर्शी पध्दतीने काम व्हावे, अन्यायकारक बदल्यांचे समायोजन करा, रोजदांरी कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेत सामावून घ्या, त्यांना वाढीव मानधन फरकांसह अदा करा, वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीचा लाभ सर्व पात्र कर्मचाऱ्यांना देण्यात यावा, अधीक्षक, अधिक्षिका, मुख्याध्यापक व इतर संवर्गाची रिक्त पदे त्वरीत भरण्यात यावी, सचिवांच्या आदेशानुसार प्रतिनियुक्त्या रद्द करा, व्यवसाय प्रशिक्षण केंद्रातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न तात्काळ सोडवा, निलंबित कर्मचाऱ्यांना त्वरीत कामावर घेऊन त्यांची विभागीय चौकशी चार महिन्यांत पूर्ण करा, अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या मान्यता प्रस्तावांना मंजुरी देण्यात यावी या मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.