Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

उड्डाणपुलाच्या मागणीसाठी रास्ता रोको; आंदोलकांच्या दगडफेकीत वाहनांचे नुकसान
धुळे, १५ जून / वार्ताहर

तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर पुरमेपाडा गावाजवळ उड्डाणपूल बांधावा या मागणीसाठी लोकसेनेतर्फे आज सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. काही वाहने थांबविण्यात आल्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी यावे, अशी मागणी आंदोलकांनी करीत वाहनांवर तुफान

 

दगडफेक केली. या दगडफेकीत राज्य परिवहन महामंडळाच्या दहा गाडय़ांचेही नुकसान झाले.
महामार्गाचे सध्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. महामार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या सुसाट वाहनांमुळे या मार्गावरील पुरमेपाडा गावाजवळ लहान-मोठे अपघात होतात. महामार्ग ओलांडूनच शेतावर जावे लागत असल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी ग्रामस्थांनी पुरमेपाडा गावाजवळ उड्डाणपूल बांधण्याची मागणी केली होती. अनेकदा अधिकाऱ्यांशी या मागणीवर चर्चा झाली असली तरी प्रत्यक्षात कुठलाही निर्णय न झाल्याने ग्रामस्थ संतप्त होते. महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले की, पुन्हा उड्डाणपुलाची मागणी मागे पडेल, अशी ग्रामस्थांना खात्री आहे. त्यामुळे आताच उड्डाणपूल तयार करून घेणे गरजेचे असल्यावर सर्वाचे एकमत झाले. त्यासाठी मग रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी प्रशासनाला इशारा दिल्यानंतर ग्रामस्थ आज एकजुटीने महामार्गावर उतरले. सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास एका पाठोपाठ एक असे शेकडो जण रस्त्यावर आले. तेव्हाच या महामार्गावरील वाहने जागोजागी थांबण्यास सुरूवात झाली. पाहता पाहता घटनास्थळाच्या दुतर्फा वाहनांची लांबच लांब रांग लागली आणि वाहतूक पुरती खोळंबली. महामार्ग अधिकाऱ्यांनी म्हणणे ऐकून घेण्यासाठी घटनास्थळी यावे, अशी मागणी करीत जमावातील काही जणांनी थांबलेल्या वाहनांवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. त्यातून बसेस्ही सुटल्या नाहीत. दरम्यान, भगवान अहिरे, किशोर डांबळे व हरीओम गांगुर्डे यांनी अंगावर घासलेट ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. नेत्यांनी मध्यस्थी करीत त्यांना रोखले. अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यावर १५ दिवसात निर्णय घेऊ असे आश्वासन यावेळी देण्यात आले.