Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

उदंड जाहले रोगी
संगमेश्वर, १५ जून/वार्ताहर

अन्न, वस्त्र, निवारा या जशा माणसाच्या गरजा आहेत, तद्वत वाढत्या प्रदूषणामुळे माणसाचे आरोग्य धोक्यात येऊ लागल्याने औषधोपचार ही गरजही तेवढीच महत्त्वाची असल्याचे गेल्या काही वर्षांत स्पष्टपणे अधोरेखित झाले आहे. जिल्ह्याचा विचार करता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक ग्रामीण

 

रुग्णालय कार्यरत असते, परंतु अपुरा कर्मचारी वर्ग, भौतिक सुविधांचा अभाव, निधीची कमतरता यासारख्या अनेक कारणांना ग्रामीण रुग्णालय हा चर्चेचा विषय होत असतो. संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयालाही अपुऱ्या कर्मचारी वर्गाच्या समस्येने ग्रासले आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सर्वाधिक महत्त्वाचे रुग्णालय म्हणून संगमेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयाकडे पाहिले जाते. १८७१ मध्ये हे रुग्णालय तळमजला व पहिला मजला या स्वरूपात उभे राहिले. आता ३८ वर्षांनंतर या रुग्णालयाची जागा कमी पडू लागली आहे. तळमजल्याला महिला रुग्ण विभाग, कर्मचारी कार्यालय, वैद्यकीय अधिकारी कक्ष असे विभाग कार्यरत आहेत, तर पहिल्या मजल्यावर पुरुष रुग्ण विभाग, क्ष-किरण तपासणी, चेंजिंग रूम आदी विभाग आहेत.
बावनदी ते आरवली या ३६ कि.मी. लांबीच्या अपघातप्रवण क्षेत्रात सातत्याने होणाऱ्या अपघातांमधील गंभीर जखमी प्रवाशांना प्रत्येक वेळी संगमेश्वर येथेच आणले जाते, मात्र आधुनिक वैद्यकीय सुविधा, तंत्रज्ञान व त्या-त्या क्षेत्रांतील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची कमतरता प्रत्येक वेळी भासत असल्याने गंभीर जखमी प्रवाशांना रत्नागिरी अथवा डेरवण येथे अधिक उपचारांसाठी हलवावे लागते.
सुमारे १३ वर्षांपूर्वी मंजूर झालेले ट्रॉमा केअर सेंटर अद्याप लालफितीमध्ये अडकल्याने अपघाताप्रसंगी प्रत्येक वेळी ट्रॉमा केअरची गरज या विषयावर चर्चा होते, परंतु लोकप्रतिनिधी या विषयाकडे आवश्यक व अपेक्षित गांभीर्याने पाहात नसल्याची खंत वाहनचालक व्यक्त करीत आहेत. जखमी प्रवाशांना दाखल करून घेण्यास जागा पुरत नाही, अशी येथील परिस्थिती असते. याचबरोबर भूलतज्ज्ञ, हाडांचे, स्त्रीरोगतज्ज्ञ अशा प्रकारचे वैद्यकीय अधिकारी येथे कार्यरत नसल्याने गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी अन्यत्र पाठविण्याशिवाय पर्याय राहात नाही.
संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दररोज ६० ते ७० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी असतात. त्यांची तपासणी पूर्ण होईपर्यंत दुपारचे तीन वाजतात. त्याच्या जोडीला प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या महिला आणि अन्य विविध प्रकारचे रुग्ण तपासताना येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची धावपळ तर होतेच, परंतु त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताणही येतो.
अशा प्रसंगातून काहीवेळा नाहक रोष पत्करण्याची वेळ येते. अपघातादरम्यान तर बाह्यरुग्ण विभागातील रुग्ण, दाखल रुग्ण, महिला रुग्ण, अपघातामधील जखमी, गंभीर जखमी या साऱ्या आघाडय़ा सांभाळताना कार्यरत असलेल्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याची तारांबळ उडते. त्यातच अपघातामध्ये कोणी मृत झाले असेल तर त्याचे शवविच्छेदन करण्यास आणखी चार ते पाच तासांचा कालावधी लागतो.
ग्रामीण रुग्णालयात केवळ परिचारिका, शिपाई, मिश्रक आदी कर्मचारी वर्ग दिला म्हणजे काम होत नाही, तर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी देणे महत्त्वाचे आहे, हे संगमेश्वरच्या बाबतीत स्पष्ट झाले आहे.