Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

गुहागर येथे सुविधांची वानवा
चिपळूण, १५ जून/वार्ताहर

गुहागर येथील ग्रामीण रुग्णालयात सर्वच सुविधांचा अभाव असल्याने, सामान्य रुग्ण खासगी रुग्णालयाकडे वळत आहेत. यामुळे या ग्रामीण रुग्णालयाची अवस्था बिकट बनली आहे.

 

चार वर्षांपूर्वी दिवसाला याच रुग्णालयात २५० ते ३०० रुग्ण येऊन उपचार करून घेत होते, आता २०-३० रुग्णही येत नाहीत. योग्य त्या अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि व्यवस्थापन विभाग कार्यान्वित नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात किमान स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी व सात स्टाफ परिचारिका असणे आवश्यक आहे. येथे यापैकी कोणीही तज्ज्ञ नसल्याने येथे प्रसूतीचे पेशंट येण्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होत आहे. सामान्य प्रसूतीसाठी आज माणसाला चार ते पाच हजार रुपये खासगी रुग्णालयाला मोजावे लागतात. एखाद्या वेळी रुग्णालयात तातडीची प्रसूतीनिगडित निर्णयाची वेळ आली असताना येथील वैद्यकीय अधिकारी जबाबदारी न घेता रत्नागिरी शासकीय रुग्णालयात जाण्याचा निर्णय देतात. या कल्पनेनेच त्या रुग्णाची वाईट अवस्था असेल हे दिसून येते.
रुग्णालयातील या ढिसाळ व्यवस्थापनामुळे रुग्णवाहिका गेले दोन महिने टायर नाही म्हणून बंद अवस्थेत पडून आहे. चालक मात्र बसून पगार घेत आहे. यात भरीस भर म्हणून तातडीच्या विजेच्या सोयीसाठी घेतलेला इन्व्हर्टर काही दिवसांपूर्वी बंद पडला असून, रात्री वीज गेल्यावर रुग्णालय अंध:कारमय बनते.
सध्या शासन विकास निधीतून लाखो रुपये खर्च करून पुन्हा ही नवीन इमारत बांधण्यात येत आहे. सोनोग्राफी, क्ष-किरण अशी लाखो रुपयांची मशिनरी येथे आणण्यात आली आहे, मात्र ती कार्यान्वित करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने धूळ खात पडली आहे. या सर्वच समस्यांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. याकडे रुग्ण कल्याण समिती व लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देऊन लोकांना मूलभूत सुविधा मिळवून द्याव्यात, अन्यथा येथील नागरिक आंदोलन करून रुग्णालयाला टाळे ठोकतील, असा इशारा देण्यात आला आहे.