Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

पालघर कृषी बाजार समितीमधील भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता
पालघर, १५ जून/वार्ताहर

पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीचे शासकीय लेखापरीक्षण मागील पंधरवडय़ापूर्वीपासून सुरू झाले असून, लेखापरीक्षणातून नवीन भ्रष्टाचार व गैरव्यवहार उघडकीस येण्याबद्दल येथे कुजबुज

 

सुरू झालेली आहे. तसेच चौकशी अधिकाऱ्यांनी शोधून काढलेल्या भ्रष्टाचार-गैरव्यवहाराबाबत हे लेखापरीक्षण तितकीच कठोर भूमिका घेणार की नरमाईचे धोरण स्वीकारणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन सभापती व संचालक मंडळावर भ्रष्टाचार-गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर सहकार खात्यामार्फत त्याची रीतसर चौकशी झाली. कॅशबुक बदलून बोगस कॅशबुक बनविल्याचे या चौकशी समितीत उघडकीस आले. इतकेच नव्हे तर समितीच्या आवारात न झालेल्या रस्त्याच्या कामावर खर्च झाल्याचे दाखविण्यात आले. सभापतीसह संचालकांनी प्रवासासाठी तसेच आवारातील साफसफाई, जकात नाका केबिन्स इ. विविध कामांमध्ये अनाठायी खर्च केल्याचे अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले असून, नाकेबंदी व हंगामी कर्मचारी नेमणूक व गाळे बांधकामात मोठी अनियमितता केल्याचे व इतरही अनेक गैरव्यवहार चौकशीदरम्यान उघडकीस आले. तद्नंतर सभापतींसह संचालकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देऊन त्यानुसार त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर चौकशी अधिकाऱ्यांनी हे आरोप कायम केले. शासकीय लेखापरीक्षकामार्फत आता त्याही कालावधीचे लेखापरीक्षण सुरू असून, चौकशी अधिकाऱ्यांनी शोधून काढलेल्या भ्रष्टाचाराबाबत लेखापरीक्षक काय भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.