Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

क्रीडा

माफी असावी
धोनीने देशवासीयांपुढे हात जोडले

जडेजाला फलंदाजीला पाठवून चूक केल्याची धोनीची कबुली
लंडन, १५ जून / पीटीआय

गतविजेत्या भारताकडून यावेळी साऱ्यांना जेतेपद कायम राखण्याच्या अपेक्षा होत्या. पण इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने भारताचे विश्वचषकातले आव्हान संपुष्टात आले आहे. या निराशाजनक पराभवाबद्दल संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने देशवासियांची माफी मागितली असून युवराज सिंगपुढे रवींद्र जडेजाला फलंदाजीला पाठविण्याची चूकही त्याने मान्य केली आहे. या पराभवाने आम्ही निराश झालो आहोत. प्रेक्षक आणि देशवासियांची अपेक्षापूर्ती आमच्याकडून झालेली नसून त्यासाठी मी त्यांची माफी मागतो. आम्ही सर्वस्व पणाला लावून मैदानात उतरलो होतो.

टीकाकारांनी धोनीला धोपटले
क्षेत्ररक्षणाचा निर्णय,जडेजाचा क्रम यावर तोंडसुख

नवी दिल्ली, १५ जून / पीटीआय

‘कॅप्टन कूल’ म्हणून गेले अनेक दिवस प्रसिद्धीच्या झोतात असलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारताच्या पराभवामुळे आता टीकेचे चटके सहन करीत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याच्या निर्णयाबरोबरच युवराजसिंगच्या आधी रवींद्र जडेजाला फलंदाजीसाठी मैदानात उतरविण्याच्या निर्णयाबद्दल धोनीवर माजी क्रिकेटपटूंनी टीकेची झोड उठविली. स्पर्धेतील अस्तित्वाची झुंज असताना असे निर्णय धोनीने घेतल्याने त्याला सर्वांनी लक्ष्य केले.

भारत ‘आऊट’; इंग्लंडचा भारतावर मोठा विजय
लंडन, १५ जून / पीटीआय

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा संभाव्य विजेता म्हणून गणल्या गेलेल्या गतविजेत्या भारतीय संघावर उपान्त्य फेरीपूर्वीच मायदेशी परतण्याची नामुष्की ओढविली. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात तीन धावांनी पराभव स्वीकारावा लागला आणि उपान्त्य फेरीत प्रवेश करण्याचे भारताचे स्वप्न उद्ध्वस्त झाले.

कसोटी क्रिकेट हाच माझा मुख्य आहार - तेंडुलकर
लंडन, १५ जून/पीटीआय

ट्वेन्टी २० क्रिकेट हे जेवणानंतर येणाऱ्या ‘डेझर्ट’प्रमाणे आहे. ते कितीही रुचकर वाटले तरी त्याने पोट भरत नाही. कसोटी क्रिकेट हेच मुख्य जेवणाप्रमाणे असते आणि कसोटी क्रिकेटशिवाय मी जगूच शकत नाही, असे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने म्हटले आहे. शेवटी कुठल्याही क्रिकेटपटूसाठी कसोटी क्रिकेट हेच अव्वलस्थानी असेल, असेही त्याने सांगितले. कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाज हे सतत फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला यात वर्चस्व गाजविण्यासाठी पाचही दिवस चांगला खेळ करायला लागतो.

पाकिस्तानचा उपान्त्य फेरीत प्रवेश
लंडन, १५ जून/ पीटीआय

सलामीवीर कामरान अकमलच्या स्फोटकी अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने आर्यलडला ३९ धावांनी पराभूत करून उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. या विजयाने पाकिस्तानने आर्यलडवर २००७ च्या विश्वचषकामधील पराभवाचा बदला घेतला असून ‘एफ’ गटातून दक्षिण आफ्रिकेबरोबर उपान्त्य फेरी गाठली आहे.

लाज राखण्याची भारताला शेवटची संधी
आज दक्षिण आफ्रिकेशी भिडणार

नॉटिंगहॅम, १५ जून/ पीटीआय

जेतेपद पटकाविण्याचे दडपण, आपीएलमध्ये खेळून शरिराला आलेला शीण, दुखापती आणि सेहवाग प्रकरण या सर्वाचा फटका यावेळी भारतीय संघाला बसला. यामुळे अपेक्षेनुरूप कामगिरी न झाल्याने भारतीय संघाचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. उद्या भारताचा ‘सुप एट’ मधील अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होणार असून लाज राखण्यासाठी भारतीय संघांला ही शेवटची संधी असेल. या सामन्याचा दोन्हीही संघांवर काहीही परिणाम होणार नाही. कारण भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडला असून दक्षिण आफ्रिकेचा संघ उपान्त्य फेरीत दाखल झाला आहे.

भारतीय व्हॉलीबॉल संघासाठी परदेशी प्रशिक्षक नेमणार - मुरुगन
पुणे, १५ जून/प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतास अव्वल दर्जाचे यश मिळावे यासाठी भारतीय संघांसाठी लवकरच परदेशी प्रशिक्षक नियुक्त केला जाणार आहे, असे भारतीय व्हॉलीबॉल महासंघाचे सचिव के.मुरुगन यांनी ‘लोकसत्ता’ च्या प्रतिनिधीस सांगितले. शिवछत्रपती क्रीडानगरीत जुलै महिन्याच्या अखेरीस कनिष्ठ गटाची जागतिक अिजक्यपद स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी मुरुगन यांच्यासह महासंघाचे अनेक पदाधिकारी आज पुण्यात आले होते. स्पर्धेचे संचालक रमणा राव तसेच जागतिक व्हॉलीबॉल महासंघाच्या तांत्रिक समितीचे अध्यक्ष शॉनरीट वॉंगप्रेस्ट हेही आले आहेत. त्यांनी स्पर्धेच्या स्टेडियमची पाहणी करीत समाधान व्यक्त केले. भारतीय संघांसाठी परदेशी प्रशिक्षक नेमण्याबाबत मुरुगन म्हणाले, ब्राझील, चीन, रशिया, क्युबा आदी देशांमधील अव्वल दर्जाचे प्रशिक्षक नियुक्त करण्यासंबंधी आम्ही चाचपणी करीत आहोत.

मुंबई निवड जलद बुद्धिबळ स्पर्धा
मुंबई, १५ जून /क्री.प्र.

मुंबई बुद्धिबळ संघटनेतर्फे व्हिनस चेस अ‍ॅकॅडमीच्या सहकार्याने मुंबई निवड जलद बुद्धिबळ स्पर्धा रविवार दि. २१ जून २००९ रोजी आयोजित केली आहे. स्पर्धेचे प्रवेश शुल्क रु. ३५० असून प्रवेश फी स्वीकारण्याची अंतिम तारीख शुक्रवार दि. २० जून २००९ असेल. पहिले ४ खेळाडू राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा खेळण्यास पात्र ठरतील. अधिक माहितीसाठी पुरुषोत्तम भिलारे (९८६९०१७२२१) विश्वनाथ माधव (९८२०१२१२४१) आणि एस. एस. हुले (९८३३७९८१८४) यांच्याशी संपर्क साधावा.