Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

माफी असावी
धोनीने देशवासीयांपुढे हात जोडले
जडेजाला फलंदाजीला पाठवून चूक केल्याची धोनीची कबुली
लंडन, १५ जून / पीटीआय

गतविजेत्या भारताकडून यावेळी साऱ्यांना जेतेपद कायम राखण्याच्या अपेक्षा होत्या. पण

 

इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने भारताचे विश्वचषकातले आव्हान संपुष्टात आले आहे. या निराशाजनक पराभवाबद्दल संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने देशवासियांची माफी मागितली असून युवराज सिंगपुढे रवींद्र जडेजाला फलंदाजीला पाठविण्याची चूकही त्याने मान्य केली आहे.
या पराभवाने आम्ही निराश झालो आहोत. प्रेक्षक आणि देशवासियांची अपेक्षापूर्ती आमच्याकडून झालेली नसून त्यासाठी मी त्यांची माफी मागतो. आम्ही सर्वस्व पणाला लावून मैदानात उतरलो होतो. प्रयत्नांमध्ये कोणतीही कसर आम्ही सोडली नव्हती. पण जे घडायचे ते घडलेच. आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक नऊ महिन्यांमध्ये होणार असून त्यावेळी आम्ही स्वत:ला सिद्ध करून दाखवू, असे मत संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सामन्यानंतर व्यक्त केले आहे.
इंग्लंडविरूच्या सामन्यात भारताने विजय मिळविला असता तर भारताला उपान्त्य फेरीत पोहोचण्याची संधी मिळाली असती. पण या सामन्यात अवघ्या तीन धावांनी पराभव झाल्याने भारताचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे.
काही वेळेला पुढे काय होणार हे तुम्हाला माहीत नसते. गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर दमदार फलंदाजी करून रवींद्र जडेजा संघाचा ‘मॅचविनर’ होईल असे मला वाटले होते. त्याने प्रयत्नही चांगले केले, पण त्याला जलदगतीने धावा जमविण्यात अपयश आले. हे फार दुर्देवी असून त्याला पाठविण्याचा प्रयोग आमचा साफ फसला, असे धोनीने यावेळी सांगितले.
पण धोनीने यावेळी प्रज्ञान ओझाला वगळून रवींद्र जडेजाला संघात स्थान दिले होते. पण या निर्णयाबद्दल आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याच्या निर्णयाबद्दल धोनीला वाईट वाटत नाही.
फलंदाजीमध्ये जास्तीत जास्त खोली असावी यासाठी मी प्रयत्नशील होतो.
तळाच्या फळीतही चांगली फलंदाजी कशी होईल यावर मी विचार करत होतो. ओझा हा चांगला गोलंदाज असला तरी जडेजा हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. त्याचबरोबर तो एक चांगला फलंदाज आणि गोलंदाजसुद्धा आहे. तो पुढे म्हणाला की, संघाला फलंदाजीमध्ये सपशेल अपयश आले. जर प्रतिस्पर्धी संघाने १५३ धावांचे आव्हान तुमच्यापुढे ठेवले असेल तर ते आव्हान तुमच्यासाठी कठिण नसते. आमचा पराभव हा फक्त फलंदाजीमुळेच झालेला आहे. तर गोलंदाजांच्या कामगिरीवर मी समाधानी आहे.
त्याचबरोबर धोनीने इंग्लंडच्या विजयाचे श्रेय त्यांच्या गोलंदाजांना दिले आहे.
तो या बद्दल म्हणाला की, गोलंदाजांनी इंग्लंडला चांगली सुरूवात करून दिली. त्यांच्या आक्रमणाला चांगलीच धार होती आणि त्यांनी बाऊन्सरचा चांगलाच उपयोग केला. पण आमच्या फलंदाजांना गोलंदाजीनुसार खेळात बदल करायला जमले नाही.
या पराभवामुळे भारतात उद्रेक होईल असे मला वाटत नाही. २००७ च्या विश्वचषाकामध्ये आम्ही पराभूत झालो होतो आणि तो एक लाजीरवाणा पराभव होता. पण त्यानंतर आम्ही चांगले पुनरागमन केले होते, असे धोनी यावेळी म्हणाला. तो पुढे म्हणाला की, या पराभवामुळे चूका सुधरण्याची संधी आम्हाला असेल. खेळमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी असायला हवी, असे या पराभवाने आम्हाला शिकविले आहे. ‘सुप एट’ फेरीमधले सलग दोन सामने आम्ही गमावले असून हा पराभव आमच्या जिव्हारी लागलेला आहे.
वीरेंद्र सेहवागच्या दुखापतीवर प्रसारमाध्यमांनी केलेल्या आरोपांचा ड्रेसिंगरूमध्ये कोणताही परिणाम झाला नसल्याचे धोनीने सांगितले आहे.
आम्हाला माहिती आहे की प्रसारमाध्यमांनी चालवलेल्या बातम्यांमध्ये काहिही तथ्य नव्हते. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम ड्रेसिंगरूमवर पाहायला मिळाला नाही. या पराभवाने सारे काही संपलेले नाही. वेस्ट इंडिजविरूद्धच्या सामन्यात आम्ही काही गोष्टी सिद्ध केल्या असून आगामी दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या सामन्यात आम्हा चांगली कामगिरी करू, असे धोनीने सांगितले आहे.