Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

टीकाकारांनी धोनीला धोपटले
क्षेत्ररक्षणाचा निर्णय,जडेजाचा क्रम यावर तोंडसुख
नवी दिल्ली, १५ जून / पीटीआय

‘कॅप्टन कूल’ म्हणून गेले अनेक दिवस प्रसिद्धीच्या झोतात असलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारताच्या पराभवामुळे आता

 

टीकेचे चटके सहन करीत आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याच्या निर्णयाबरोबरच युवराजसिंगच्या आधी रवींद्र जडेजाला फलंदाजीसाठी मैदानात उतरविण्याच्या निर्णयाबद्दल धोनीवर माजी क्रिकेटपटूंनी टीकेची झोड उठविली. स्पर्धेतील अस्तित्वाची झुंज असताना असे निर्णय धोनीने घेतल्याने त्याला सर्वांनी लक्ष्य केले.
भारताचे फिरकी गोलंदाज इरापल्ली प्रसन्ना यांनी सांगितले की, चौथ्या क्रमांकावर हरभजनसिंगला पाठविले असते तरीही चालले असते. ते पुढे म्हणाले की, या महत्त्वाच्या सामन्यात धोनीने नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडला फलंदाजीला उतरविण्याचा निर्णय घ्यायला नको होता. ती मोठी चूक होती. आपल्या फलंदाजांचा क्रमही योग्य नव्हता. युवराज व स्वत: धोनीच्या आधी जडेजाला पाठविण्याचा निर्णयही चुकीचा होता. त्याऐवजी हरभजनसिंगला जरी पाठविले असते तरी चालण्यासारखे होते. भारतीय संघाकडे क्षमता होती, पण दडपण सहन करण्यात हा संघ अपयशी ठरला.
भारताचे माजी यष्टीरक्षक सय्यद किरमाणी यांनीही प्रसन्ना यांच्याच सुरात सूर मिसळून टीका केली. ते म्हणाले की, वीरेंद्र सेहवागच्या ऐवजी त्याच क्षमतेचा सलामीवीर भारताला मिळाला नाही. सेहवागची अनुपस्थिती भारताला प्रश्नमुख्याने जाणवली. तुमच्याकडे गुणवत्ता होती, तुम्ही संभाव्य विजेते म्हणून गणले गेले होतात, पण मोक्याच्या क्षणी तुमची कामगिरी दिसली नाही तर काय होऊ शकते, हे कालच्या निकालाने दिसले.
किरमाणी म्हणाले की, ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या या झटपट प्रकारात सलामीच्या जोडीने पाया रचण्याची गरज असते. त्या पायावर नंतरचे फलंदाज कळस चढवितात. पण जडेजा आणि गंभीर फलंदाजी करीत असताना भारताची धावगती खूप खाली आली.
भारताचे माजी सलामीवीर अरुण लाल यांनी धोनीच्या नेतृत्वावर टीका केली. जडेजाला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठविण्याच्या निर्णयात अतिआत्मविश्वासाची झलक दिसली आणि बचावाचा पवित्रा दिसला असे लाल म्हणाले. व्ही. बी. चंद्रशेखर यांनी सांगितले की, जडेजाला तर संघातही स्थान द्यायला नको होते. त्याशिवाय, इंग्लंडला प्रथम फलंदाजी करण्याची संधी देणेही चुकीचे होते. प्रज्ञान ओझाऐवजी जडेजाला संधी देऊन भारताने आणखी एक चूक केली. हरभजनसिंगनेही आपल्या क्षमतेला साजेशी कामगिरी काल केली नाही. जडेजा या स्पर्धेत एकही सामना खेळलेला नसताना त्याला युवराजसिंगच्या आधी फलंदाजीस पाठविण्याचा निर्णय घ्यायला नको होता. त्याशिवाय, युवराजसिंगवर आपण खूप अवलंबून राहिलो. जर तो याआधी खेळला नसता तर आपण आधीच गारद झालो असतो. चंद्रशेखर यांनी सेहवागची अनुपस्थिती भारताला प्रश्नमुख्याने जाणवल्याचेही सांगितले. त्याच्याजागी उत्तम असा पर्याय भारताला हवा होता.
इंग्लंडसारख्या संघाला आपण नमवायला हवे होते. वेस्ट इंडिजविरुद्ध प्रथम फलंदाजी घेतल्यानंतर पराभूत झाल्यामुळे भारतीय संघ दबावाखाली आला आणि त्यांनी इंग्लंडला फलंदाजीचे निमंत्रण दिले, असेही चंद्रशेखर म्हणाले. भारताचे माजी कर्णधार कपिलदेव यांनी मात्र प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. कपिलच्या आईचे नुकतेच निधन झालेले असल्यामुळे त्याने भारताच्या पराभवावर बोलण्यास नकार दिला. कपिलने सांगितले की, माझ्या आईचे देहावसान झाल्यामुळे मी क्रिकेटपासून काही काळ दूर गेलो आहे. मी क्रिकेट गेले काही दिवस पाहिलेले नाही. त्यामुळे मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. मदन लालने मात्र धोनीच्या निर्णयांला पाठिंबा दर्शविला. क्षेत्ररक्षण घेण्याचा धोनीचा निर्णय योग्य होता, असे मदनलाल यांनी म्हटले आहे. भारतीय संघातील खेळाडूंमध्ये मात्र विजिगिषु वृत्तीचा अभाव होता, हे मात्र मदनलाल यांनी कबूल केले. १५४ धावांचे लक्ष्य कठीण नव्हते. इंग्लंडला फलंदाजीस निमंत्रित करून धोनी एकप्रकारे जुगारच खेळला होता. पण आपण केलेले डावपेच व फलंदाजी ऐन मोक्याच्या वेळेस फळली नाही. चंदू बोर्डे यांनीही धोनीलाच जबाबदार धरण्यास नकार दिला. ते म्हणाले, ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये नेमका अंदाज वर्तविणे कठीण असते. भारतीय संघ बळकट वाटत होता, पण दुर्दैवाने त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरी होऊ शकली नाही.