Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

भारत ‘आऊट’; इंग्लंडचा भारतावर मोठा विजय
लंडन, १५ जून / पीटीआय

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा संभाव्य विजेता म्हणून गणल्या गेलेल्या गतविजेत्या भारतीय संघावर उपान्त्य फेरीपूर्वीच मायदेशी परतण्याची नामुष्की ओढविली. महेंद्रसिंग धोनीच्या

 

नेतृत्वाखालील भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात तीन धावांनी पराभव स्वीकारावा लागला आणि उपान्त्य फेरीत प्रवेश करण्याचे भारताचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची अखेरची झुंज शिल्लक असली तरी त्यातून भारताच्या हाती काहीही लागणार नाही. कारण वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील लढतीत जो विजयी ठरेल तो संघ उपान्त्य फेरीत प्रवेश करणार आहे. दक्षिण आफ्रिकेने तर दोन सामने जिंकून उपान्त्य फेरीत जवळपास प्रवेश केलेला आहेच.
भारताने इंग्लंडविरुद्ध नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयापासून भारताचे सारे आडाखे चुकत गेले. इंग्लंडला तरीही १५३ धावांवर रोखण्यात भारताला यश आले. पण ही धावंसख्या गाठताना भारताची चांगलीच दमछाक झाली. फलंदाजीचा क्रम निवडताना झालेल्या चुकीमुळे भारतीय संघ अपेक्षित धावगती राखू शकला नाही आणि त्यांना विजयासाठी तीन धावा कमी पडल्या. गतविजेता भारतीय संघ पराभूत होत असल्याचे लॉर्ड्सवरील असंख्य भारतीय चाहत्यांना पाहावे लागले. इंग्लंडने ठेवलेले १५४ धावांचे आव्हान पेलताना भारताला अपेक्षित सलामी मिळू शकली नाही. सेहवागच्या अनुपस्थितीत सलामीची जबाबदारी स्वीकारणारा रोहित शर्मा लवकर बाद झाला. त्यानंतर गौतम गंभीर (२६) व रवींद्र जडेजा (२५) यांना धावगती वाढविता आली नाही. त्यामुळे हळूहळू भारतीय संघ दबावाखाली आला. ही जोडी फुटल्यावर युवराजसिंगही (१७) स्वानच्या फसव्या चेंडूवर यष्टीचीत झाला आणि भारताच्या आव्हानाला सुरुंग लागला. धोनीही या संपूर्ण स्पर्धेत फॉर्मात नसल्यामुळे शिल्लक राहिलेला फलंदाज होता युसूफ पठाण (नाबाद ३३) पण तोपर्यंत धावगती ठेवताना भारतीयांची चांगलीच दमछाक झाली होती. आवश्यक धावा आणि उरलेले चेंडू यातील फरक वाढतच गेला व भारतीय संघ तीन धावांनी पराभूत झाला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना केव्हिन पीटरसन (४६), रवी बोपारा (३७) व दिमित्री मॅस्कारेन्हास (२५) यांच्या जोरावर १५३ धावांपर्यंत मजल मारली. भारतीयांचा क्षेत्ररक्षणातील गलथानपणा, १४ वाइड चेंडूंसह दिलेल्या १६ अवांतर धावा भारताला नडल्या.